El Nino, La Nina, Drought, Food Security : अल-निनाे, ला-निना, दुष्काळ अन् अन्नसुरक्षा
1 min read
El Nino, La Nina, Drought, Food Security : भारतीय शेती माेसमी वाऱ्याच्या पावसावर अवलंबून असल्याने हवामान बदलांसाेबत अल-निनाे (El Nino) व ला-निना (La Nina) या वातावरणीय प्रणालींचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्राला बसताे. अल-निनाे सक्रिय झाल्यास अनियमित पाऊस व पावसाचा माेठा खंड पडताे. त्यामुळे खरीप पिकांना पाण्याच्या दीर्घ ताण सहन करावा लागत असल्याने पिकांची वाढ खुंटण्याची, ती सुकण्याची व त्यातून उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते. साेबतच काेरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण हाेते. ला-निना सक्रिय झाल्यास भरपूर पाऊस पडताे. अतिरिक्त पावसामुळे जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा हाेत नाही. शेतातील माती वाफसा स्थितीत यायला वेळ लागताे. अशा स्थितीत पिकांची मुळे गुदमरतात, त्यांना ऑक्सिजन व अन्नद्रव्ये व्यवस्थित शाेषूण घेता येत नाही. त्यामुळे मुळे सडण्याची व त्यातून उत्पादन घटण्याची शक्यता बळावते व ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण हाेताे. या दाेन्ही स्थितीमुळे शेतमालाच्या उत्पादनात माेठी घट हाेत असल्याने देशातील अन्नसुरक्षा (Food Security) धाेक्यात येत असली तरी या गंभीर व दूरगामी परिणाम करणाऱ्या समस्यांकडे सत्ताधारी व धाेरणकर्ते लक्ष द्यायला तयार नाही.
♻️ अल निनो
अल निनो ही एक अत्यंत महत्त्वाची व गुंतागुंतीची जागतिक हवामानशास्त्रीय घटना आहे. तिचा थेट संबंध पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान आणि वातावरणातील बदलांशी असतो. अल निनोचा अर्थ लहान बाळ किंवा बालक येशू असा होतो. पेरू देशातील मच्छिमारांना या बदलांचा अनुभव ख्रिसमसच्या सुमारास डिसेंबरमध्ये आल्याने याचा संबंध बालक येशू यांच्याशी जाेडण्यात आला.
सामान्य परिस्थितीत पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच दक्षिण अमेरिकेकडून आशिया व ऑस्ट्रेलियाकडे व्यापारी वारे (Trade Winds) वाहत असतात. हे वारे समुद्राच्या पाठीवरील गरम पाणी पश्चिमेकडे ढकलतात. त्यामुळे आशिया व ऑस्ट्रेलियाजवळ गरम पाण्याचा साठा तयार होतो. पेरू जवळील दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ समुद्राच्या तळातील थंड व पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पाणी वर येते. याला अपवेलिंग (Upwelling) म्हणतात. अल निनोच्या काळात नेमके उलटे घडते. हे व्यापारी वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा बदलते. त्यामुळे पश्चिमेकडे साठलेले गरम पाणी पुन्हा पूर्वेकडे म्हणजेच दक्षिण अमेरिकेकडे वाहू लागते. परिणामी, मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यापेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते. समुद्राच्या पाठीवरील पाण्याच्या तापमान वाढीलाच अल निनो म्हणतात.
♻️ अल निनो सदर्न ऑसिलेशन
📍 चक्रअल निनो ही एक स्वतंत्र वातावरणीय प्रणाली नाही. ती अल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO – El Nino-Southern Oscillation) या मुख्य प्रणालीचा जागतिक चक्राचा एक भाग आहे. यात अल-निनो, ला-निना व तटस्थ टप्पा (Neutral Phase) असे तीन टप्पे असतात.
📍 अल-निनो हा उबदार टप्पा असून, त्यात महासागराचे तापमान वाढते. त्यामुळे भारतात कमी पाऊस किंवा पावसाचा दीर्घ खंड निर्माण हाेताे.
📍 ला-निना हा थंड टप्पा असून यात महासागराचे तापमान सामान्यापेक्षा कमालीचे कमी होते. त्यामुळे भारतात सहसा चांगला पाऊस पडतो.
📍 तटस्थ टप्पा (Neutral Phase) यात महासागराचे तापमान सामान्य असते.
♻️ वॉकर सरक्युलेशन
महासागराच्या तापमानातील बदलामुळे वातावरणातील हवेच्या दाबाचे चक्र बदलते, याला वॉकर सरक्युलेशन (Walker Circulation) म्हणतात. सामान्यतः, आशियाई भागात कमी दाबाचा पट्टा असतो आणि हवेचे अभिसरण होऊन पाऊस पडतो. अल निनोच्या काळात, हवेच्या कमी दाबाचा हा केंद्रबिंदू पूर्वेकडे म्हणजेच मध्य पॅसिफिककडे सरकत असल्याने आशिया व ऑस्ट्रेलियाच्या भागावर हवेचा दाब वाढतो. ही हवा खाली बसत (Subsidence) असल्याने तिथे ढग निर्मितीची प्रक्रिया मंदावते.
♻️ अल निनोचा परिणाम
📍 अल-निनाेचे भारतासह जागतिक स्तरावर परिणाम जाणवतात. भारतात माेसमी वाऱ्यांमुळे पाऊस येत असल्याने अल-निनाेचा थेट परिणाम जाणवताे.
📍 प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) पश्चिम भागात (ऑस्ट्रेलिया व आशियाजवळ) गरम पाणी साठल्यामुळे तिथे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा पट्टा हिंदी महासागराकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना भारताकडे खेचून आणण्यास मदत करतो. परंतु, अल निनोच्या काळात हा गरम पाण्याचा साठा पूर्वेकडे (दक्षिण अमेरिकेकडे) सरकतो. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे केंद्रही भारतापासून दूर जाते. परिणामी, हिंदी महासागरावरून भारताकडे येणारे बाष्पयुक्त मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि त्यांची गती मंदावते.
📍 मान्सूनचे वारे कमकुवत झाल्यामुळे भारतातील पावसाचे वितरण विस्कळीत होते. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असते व देशात सर्वदूर मिळणाऱ्या पावसाचे एकूण प्रमाण लक्षणीयरित्या घटते.
📍 मान्सून वेळेवर आला तरी जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस अनेक दिवस गायब राहतो. या मोठ्या खंडामुळे (Monsoon Breaks) खरीप पिके करपण्याचा धोका वाढतो. जलाशयातील तसेच जमिनीतील पाणीपातळीत घट हाेत असल्याने रब्बी हंगामावरही परिणाम होतो.
📍 देशातील मध्य भारत, उत्तर-पश्चिम भाग तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
📍 अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे भारतात आगमन होण्यास अनेकदा विलंब हाेण्याची शक्यता असते. मान्सूनचा संपूर्ण देशातील प्रवास संथ गतीने होतो. मान्सून जेवढा उशिरा येईल आणि जेवढा लवकर परतताे. (Early Withdrawal), तेवढा पावसाचा कालावधी कमी होतो.
📍 उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये तापमान सामान्यापेक्षा अधिक राहते. तीव्र उष्णतेच्या लाटा (Heat Waves) येतात.
📍 जागतिक पातळीवर दक्षिण अमेरिका (पेरू व इक्वेडोर) येथे कमालीचा पाऊस पडताे. त्यामुळे पूर व भूस्खलन होते. समुद्राचे पाणी गरम झाल्यामुळे मासे स्थलांतर करतात व पेरूच्या मत्स्यव्यवसायाचे मोठे नुकसान होते.
📍 ऑस्ट्रेलिया व इंडोनेशियामध्ये तीव्र दुष्काळ पडतो व जंगलांना आगी (Bushfires) लागण्याचे प्रमाण वाढते.
♻️ अल निनोची तीव्रता
समुद्राचे तापमान किती अंशाने वाढते, यावर अल निनोची तीव्रता ठरवली जाते.
📍 सौम्य (Weak):- 0.5 डिग्री सेल्सिअस ते 0.9 डिग्री सेल्सिअस वाढ
📍 मध्यम (Moderate):- 1 डिग्री सेल्सिअस ते 1.4 डिग्री सेल्सिअस वाढ
📍 तीव्र (Strong):- 1.5 डिग्री सेल्सिअस ते 1.9 डिग्री सेल्सिअस वाढ
📍 अति-तीव्र (Super El Niño):- 2 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त वाढ (उदा. 1997-98 व 2015-16 ही वर्षे)
प्रत्येक अल निनो वर्ष भारतात दुष्काळ आणेलच असे नाही. जर त्याच वर्षी हिंदी महासागरात पॉझिटिव्ह (Positive) इंडियन ओशन डायपोल (IOD – Indian Ocean Dipole) सारखे इतर अरबी समुद्रातील घटक जर सकारात्मक (Positive) असतील, म्हणजेच अरबी समुद्राचे पाणी आफ्रिकेच्या किनारपट्टीजवळ जास्त गरम झाले, तर ही स्थिती अल निनोचा प्रभाव नष्ट करते किंवा कमी करते. त्यामुळे अल निनोचा प्रभाव कमी हाेऊन भारतात चांगला पाऊस पाडण्यास मदत करतात. (उदा. 1997 मधील परिस्थिती)
♻️ ला निना
ला-निना ही अल निनोच्या अगदी उलट असणारी व अत्यंत महत्त्वाची जागतिक हवामानशास्त्रीय प्रणाली आहे. स्पॅनिश भाषेत ला निनाचा अर्थ लहान मुलगी असा होतो. ही प्रणाली भारतीय मान्सूनसाठी अत्यंत लाभदायक मानली जाते. ला निना ही प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) विषुववृत्तीय भागातील पाठीवरील पाणी सामान्यापेक्षा जास्त थंड होण्याची प्रक्रिया आहे. सामान्य परिस्थितीत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे (Trade Winds) ला निनाच्या काळात कमालीचे शक्तिशाली बनतात. हे तीव्र वारे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील गरम पाण्याचा प्रचंड साठा वेगाने आशिया व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने पश्चिम प्रशांत महासागरात ढकलतात. त्यामुळे पेरूजवळील दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ समुद्राच्या तळातील अतिशय थंड आणि पोषक तत्वांनी समृद्ध पाणी मोठ्या प्रमाणावर वर (Upwelling) येते. मध्य व पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यापेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून कमी होते. पाण्याच्या या अतिरिक्त थंड होण्याच्या स्थितीलाच ला निना म्हणतात.
♻️ वॉकर सरक्युलेशन व ला निना
ला निनामुळे जागतिक वायू अभिसरण चक्र (Walker Circulation) तीव्र होते. त्यामुळे पश्चिम प्रशांत महासागरात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया व भारताजवळ गरम पाणी साठल्यामुळे या भागात हवेचा अति-कमी दाबाचा पट्टा तयार होतो. या कमी दाबामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो व हवेचे तीव्र ऊर्ध्वगामी प्रवाह (Updrafts) तयार होऊन ढगांची माेठ्या प्रमाणात निर्मिती होते. ला निनाच्या वर्षी नेहमीच मान्सूनचे वारे अत्यंत बलवान असल्यामुळे पाऊस वेळेवर किंवा वेळेआधीच दाखल होतो. मान्सूनचा हंगाम दीर्घकाळ म्हणजेच सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पाऊस सक्रिय राहताे. धरणे व भूजल पातळीत वाढ हाेते. ला निनाच्या प्रभावामुळे भारतात मान्सून उत्तम होतोच, त्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात उत्तर व मध्य भारतात नेहमीपेक्षा जास्त तीव्र थंडीची लाट (Cold Wave) अनुभवायला मिळते.
ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व मलेशिया या देशांमध्ये ला निनामुळे मुसळधार पाऊस पडतो व पुराची स्थिती निर्माण होते. अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात हवामान अत्यंत कोरडे आणि उष्ण होते, ज्यामुळे तिथे दुष्काळ पडतो. याउलट, उत्तरेकडील भागात (कॅनडा व अलास्का) प्रचंड बर्फवृष्टी होते. ला निना काळात अटलांटिक महासागरामध्ये तीव्र चक्रीवादळांची (Hurricanes) संख्या आणि त्यांची ताकद वाढते.
♻️ अन्नसुरक्षा
भारतातील शेती माेसमी वाऱ्याच्या पावसावर अवलंबून आहे. अल-निनाेमधील कमी पाऊस, पावसाचा दीर्घ खंड, खरीप पिकांना सहन करावा लागणारा पाण्याचा ताण तसेच ला-निनामध्ये भरपूर पाऊस, पाण्याचा निचरा न हाेणे, जमिनीची वेळेवर वाफसा स्थिती न हाेणे, पिकांची मुळे गुदमरून सडल्यागत हाेत असल्याने पिकांचे माेठे नुकसान हाेते व त्यातून देशाची अन्नसुरक्षा धाेक्यात येते. यावर उपाय म्हणून अल-निनाे काळात शेतकऱ्यांनी पाण्याचा अधिक ताण सहन करणारी व दुष्काळसदृश पिकांची निवड करणे गरजेचे आहे. ला-निना काळात शेतात चऱ्या तयार करून पावसाचे पाणी जमिनीवर अधिक काळ साचून राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणातील बदल आपल्या हाती नसल्याने शेतकऱ्यांनी क्राॅप पॅटर्न बदलण्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.