krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Poisoning while Spraying : फवारणी करताना विषबाधा का हाेते?

1 min read

Poisoning while Spraying : पिकांवरील राेग (Disease) व किडींच्या (Pests – Insect) व्यवस्थापनासाठी (Management) शेतकरी कीटकनाशकांची (Pesticide – Insecticide) फवारणी (Spraying) करतात. फवारणीदरम्यान (प्राशन करून नाही) विषबाधा (Poisoning) हाेऊन शेतकरी व मजुरांच्या मृत्यू हाेण्याच्या घटना दरवर्षी घडतात. आजवर सर्वाधिक मृत्यूची प्रकरणे जुलै ते ऑक्टोबर 2017 या काळात यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीवरील (Cotton) गुलाबी बाेंडअळीच्या (Pink bollworm) व्यवस्थापनासाठी फवारणी करताना घडली हाेती. शासन, प्रशासन आणि बहुतांश मंडळी या विषबाधेला शेतकरी (Farmer) अथवा मजुरांना (Labourer) जबाबदार धरत असल्याने यवतमाळ व इतर जिल्ह्यातील प्रकरणांवरून अनेकदा सिद्ध झाले आहे. सन 2017 पासून सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेच्या नाेंदी ठेवणेही बंद केले आहे. वास्तवात, शेतकरी काेणते कीटकनाशक किती प्रमाणात पिकावर फवारताे, फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू (pH) काय आहे, यावर कीटकनाशकाची तीव्रता व विषबाधेचे प्रमाण अवलंबून असते.

♻️ कीटकनाशकांचे प्रकार व गुणधर्म
📍 काॅन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड
स्पर्शजन्य कीटकनाशक अर्थात काॅन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड (Contact Insecticide) पानांच्या पृष्ठभागावर राहाते आणि कीड पानाच्या संपर्कात येताच त्यावर परिणाम करते. याचा किडींच्या शरीरावर थेट परिणाम हाेताे. ते त्वचेच्या माध्यमातून किडींच्या शरीरात शिरते. याचा वापर पिकांचे प्रतिबंधात्मक संरक्षण व नवीन प्रादुर्भाव राेखण्यासाठी केला जाताे. यात असलेल्या पायरेथ्रॉइड्स किंवा ऑर्गेनोफॉस्फेट्स व तत्सम घटकांमुळे कीटकांच्या मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम हाेत असल्याने त्यांच्या चेतातंतूंमधील संदेशवहन रोखले जाते किंवा सोडियम/पोटॅशियम चॅनेल विस्कळीत हाेते. मज्जासंस्था निकामी झाल्यामुळे कीटकांना झटका (Knockdown effect) येतो, त्यांना अर्धांगवायू (Paralysis) होतो व थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू होतो. सायपरमेथ्रिन (Cypermethrin), डेल्टामेथ्रिन (Deltamethrin), क्लोरपायरीफॉस (Chlorpyrifos), मॅलाथिऑन (Malathion), कार्बारिल (Carbaryl) यासारख्या कीटकनाशकांचा यात समावेश हाेता.

📍 सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड
अंतःप्रवाही कीटकनाशक अर्थात सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड (Systemic Insecticide) संपूर्ण झाडांत म्हणजेच पाने, खाेड व मुळांमध्ये शाेषून घेतले जात असल्याने ते झायलेम (Xylem) व फ्लोएम (Phloem) द्वारे झाडांच्या शरीरभर प्रवास करते आणि झाडांचे किडींपासून आतून रक्षण करते. याचा वापर रस शाेषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी केला जाताे. यातील रसायने किडींच्या पचनसंस्थेद्वारे मज्जासंस्थेवर परिणाम करतात. किडींवर काॅन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड सारखे कार्य करून किडी मृत्यूमुखी पडतात. सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडमध्ये इमिडाक्लोप्रिड (Imidacloprid), थियामेथॉक्सम (Thiamethoxam), ॲसिटामिप्रिड (Acetamiprid), डायमेथोएट (Dimethoate), ॲसिफेट (Acephate), स्पायरोटेट्रामॅट (Spirotetramat) या कीटकनाशकांचा समावेश हाेता.

📍 ट्रान्सलॅमिनार इन्सेक्टिसाइड
पारपर्ण किंवा पानांच्या आरपार जाणारे कीटकनाशक अर्थात ट्रान्सलॅमिनार इन्सेक्टिसाइड (Translaminar Insecticide) पानांच्या दाेन्ही बाजूंनी (वर-खाली) असलेल्या किडींवर एकसमान परिणाम करते. हे कीटकनाशक पूर्णपणे अंतःप्रवाही (Systemic) नसल्याने ते पानाची मेणचट त्वचा (Cuticle) भेदून पानांच्या मेसोफिल पेशींमध्ये (Mesophyll cells) साठवले जाते. फवारणीनंतर ते पानाच्या दुसऱ्या बाजूने जाते. किडींनी पाने खायला सुरुवात करताच विषबाधेमुळे त्या मरतात. यात ॲबामेक्टिन (Abamectin), एमामेक्टिन बेंझोएट (Emamectin Benzoate), क्लोफेनापायर (Chlorfenapyr), पायरिप्रोक्सीफेन (Pyriproxyfen), पिमेट्रोझिन (Pymetrozine), फ्लोनिकॅमिड (Flonicamid) या औषधांचा यात समावेश हाेताे.

📍 कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड
कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड हे दोन किंवा अधिक भिन्न रासायनिक घटकांचे (Active Ingredients) एकत्र मिश्रित केलेले असते. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा नायनाट करण्यासाठी किंवा एकाच कीटकावर वेगवेगळ्या मार्गांनी हल्ला करण्यासाठी हे कीटकनाशक तयार केले आहे. या वर्गातील कीटकनाशके झाडांच्या किडींपासून आतून-बाहेरून संरक्षण करते व किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण हाेऊ देत नाही. यातील रसायपने स्वतंत्रपणे काम करतात. याचे परिणाम जलद हाेऊन दीर्घकाळ टिकतात.

♻️ कीटकनाशकातील प्रमुख रासायनिक जोड्या
📍 अंतःप्रवाही + स्पर्शजन्य (Systemic + Contact) – पानावर असलेला कीटक स्पर्शजन्य घटकाने तात्काळ मरतो, तर झाडाच्या आत लपलेला किंवा रस शोषणारा कीटक अंतःप्रवाही घटकामुळे मारला जातो. हे कीटकनाशक दोन भिन्न चेतातंतू प्रणालींवर हल्ला करते. एक घटक कीटकांच्या सोडियम चॅनेलवर (Sodium Channels) परिणाम करतो, तर दुसरा घटक ॲसिटिलकोलीन रिसेप्टर्सवर काम करतो.
📍 कीटकनाशक + कोळीनाशक (Insecticide + Acaricide) – यात आळ्या किंवा कीटकांसोबत लाल कोळी (Mites) यांचेही नियंत्रण एकाच वेळी होते.

♻️ कीटकनाशकांची घातक क्रमवारी
📍 कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड
कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड सर्वाधिक घातक असून, यातील सिनेर्जिस्टिक इफेक्टमुळे (Synergistic Effect) रसायनांचा विषारीपणा कित्येक पटीने वाढते. त्यामुळे हानिकारक कीटकांसोबत मित्रकीटक, मधमाश्या, जलचर आणि माणसाच्या आरोग्याला (फवारणीदरम्यान) सर्वाधिक धोका असतो. पिकांवर दोन वेगवेगळ्या रसायनांचे अंश (Residues) जास्त काळ टिकून राहतात.

📍 सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड
घातकतेच्या क्रमवारीत सिस्टेमिक कीटकनाशक दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे औषध झाडाच्या संपूर्ण रसाभिसरण संस्थेत (पाने, खोड, मुळे, फळे आणि फुले) शोषले जात असल्याने झाडाच्या फुलांमधील मकरंद (Nectar) आणि परागकणांमध्ये (Pollen) हे औषध उतरते. त्यामुळे मधमाश्या व परागीभवन करणारे मित्र कीटक पूर्णपणे नष्ट होण्यास हे औषध सर्वाधिक कारणीभूत ठरते. फळ किंवा धान्य काढणीपूर्वी योग्य वेटिंग पीरियड (PHI) न पाळल्यास मानवी आहारात याच्या विषारी अंश जाण्याचा धोका असतो.

📍 ट्रान्सलॅमिनार इन्सेक्टिसाइड
या क्रमवारी ट्रान्सलॅमिनार इन्सेक्टिसाइड हे तिसऱ्या क्रमांकाचे घातक कीटकनाशक आहे. यातील रसायने संपूर्ण झाडभर पसरत नाही. ते केवळ पानाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे (पानाच्या आत) शोषले जाते. हे औषध पानाच्या आत दडून राहणाऱ्या कीटकांना मारते. हे अंतःप्रवाही औषधाप्रमाणे झाडाच्या रस किंवा मकरंदात पूर्णपणे पसरत नसल्याने मधमाश्या आणि मित्रकीटकांवर होणारा दुष्परिणाम सिस्टेमिकच्या तुलनेत थोडा कमी असतो.

📍 काॅन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड
काॅन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड हे झाडाच्या आत प्रवेश करत नसून, ते केवळ झाडाच्या बाहेरील पृष्ठभागावर साचून राहते. फवारणीच्या वेळी थेट संपर्कात आलेल्या मित्रकीटकांना याचा नक्कीच धोका असतो. याचे विष झाडाच्या आत उतरत नाही. पाऊस पडल्यास किंवा उन्हामुळे हे औषध लवकर नष्ट होते.त्यामुळे पिकाच्या अन्नधान्यात याच्या विषारी अंशांचा (Residues) धोका सर्वात कमी असतो.

या कीटकनाशकांची रेसीड्यू (Residues) क्रमवारी देखील हीच आहे. शेतकऱ्यांना तत्काळ परिणाम हवा असताे तर विक्रेत्यांना अधिक कमिशन व विक्रीवरील इन्सेटिव्ह हवे असते. त्यामुळे ट्रान्सलॅमिनार व सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडचा वापर व विक्री सर्वाधिक आहे.

♻️ पाण्याचा पीएच व कीटकनाशकांची तीव्रता
पाण्याचा 5.5 ते 6.5 हा पीएच आदर्श मानला जाताे. 3.5 ते 5.0 पीएच असलेले पाणी अतिआम्लयुक्त (Highly acidic) असते. त्यामुळे कीटकनाशकांची तीव्रता वाढते व झाडांची पाने करपतात. अतिआम्लयुक्त पाणी वापरताना फवारणीदरम्यान विषबाधा हाेण्याची दाट शक्यता असते. 7.0 पीएचचे पाणी उदासीन मानले जात असून, ते फवारणीसाठी याेग्य मानले जाते. 7.5 ते 9.0 पीएच अल्कधर्मी (Alkaline) मानला जाताे. अल्कधर्मी पाणी फवारणीसाठी वापरल्यास कीटकनाशकांची तीव्रता कमालीची कमी हाेते. त्यामुळे फवारणी करूनही कीटकनाशकांचा किडींवर काेणताही परिणाम हाेत नाही.

♻️ कीटकनाशक गट व पाण्याचा पीएच
📍 ऑर्गेनोफॉस्फेट्स आणि कार्बामेट्स (क्लोरपायरीफॉस, डायमेथोएट, ॲसिफेट) – हे गट पाण्याचा पीएच 7.0 पेक्षा जास्त असल्यास कीटकनाशक अत्यंत संवेदनशील असतात. अल्कधर्मी पाण्यात ही औषधे खूप वेगाने निकामी होतात. यासाठी पाण्याचा पीएच 5.5 ते 6.0 असणे आवश्यक आहे.
📍 सिंथेटीक पायरेथ्रॉइड्स (सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन) – हेसुद्धा किंचित आम्लयुक्त (pH 6.0) पाण्यात उत्तम परिणाम देते.
📍 कॉपरयुक्त औषधे (कॉपर ऑक्सिक्लोराईड / बोर्डो मिश्रण) – कॉपरयुक्त बुरशीनाशके अत्यंत आम्लयुक्त पाण्यात मिसळल्यास झाडांवर फायटोटॉक्सिसिटी (पाने करपणे) आणू शकतात. यासाठी 7.0 पीएच असलेले पाणी योग्य मानले जाते.

♻️ पाण्याचा pH कसा ओळखावा व कसा सुधारावा?
🔆 pH स्ट्रिप्स (Litmus Paper / pH paper) – बाजारात किंवा कृषी केंद्रात मिळणाऱ्या डिजिटल pH मीटर किंवा pH पेपर स्ट्रिपच्या साहाय्याने पाण्याचा pH अवघ्या २ मिनिटांत तपासता येतो.
🔆 pH कसा सुधारावा (Acidifiers / Buffers) – फवारणीच्या पाण्याचा pH 7.5 पेक्षा जास्त असेल, तर औषध टाकण्यापूर्वी पाण्याचा pH कमी करणे आवश्यक आहे. pH सुधारण्यासाठी pH Balancer किंवा pH Regulator नामक विशेष द्रावणे मिसळवावी. पाणी थोडे आम्लयुक्त करण्यासाठी 200 लिटरच्या ड्रममध्ये साइट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड/लिंबाचा रस योग्य प्रमाणात वापरून pH 5.5 ते 6.5 वर आणता येतो. औषध पाण्यात टाकण्यापूर्वीच pH नियंत्रित करणे गरजेचे असते.

♻️ या निमांचे पालन करा
🔆 फवारणीच्या टाकीत कीटकनाशक टाकण्यापूर्वी नेहमी पहिल्यांदा पाण्याचा pH तपासा व तो 5.5 ते 6.5 च्या दरम्यान आणा.
🔆 औषध पाण्यात मिसळल्यानंतर द्रावण जास्त वेळ तसेच ठेवू नका. 3 ते 4 तासांच्या आत फवारणी पूर्ण करा.
🔆 अनेक औषधे एकत्र मिसळल्यास द्रावणाचा pH बदलतो.
🔆 बोअरवेलच्या पाण्यात चुनखडी व क्षार जास्त असल्याने त्याचा pH नेहमी जास्त (8 ते 9) असतो. त्यामुळे हे पाणी थेट वापरणे टाळावे किंवा pH कन्डिशनरचा वापर करावा.
नेहमी औषधाच्या बाटलीवर दिलेल्या सूचना आणि pH संदर्भातील शिफारसी वाचाव्यात.

♻️ विषबाधा का हाेते?
फवारणी करताना कीटकनाशकांचे तुषार हवेत उडतात. ते श्वासावाटे फुफ्फुसात जातात, शिवाय, घामामुळे शरीरावर फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराव पक्के चिकटतात. त्यामुळे विषबाधा हाेत असून, कॉम्बिनेशन व सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडमध्ये हा धाेका सर्वाधिक असताे. यवतमाळ जिल्ह्यात फवारणी दरम्यान मोलोक्रोटोफॉस, पोलिया, प्रोफिक्स सुपर या कीटकनाशकांमुळे शेतकरी व मजुरांनी विषबाधा हाेऊन त्यांचा मृत्यू झाला.

♻️ ही काळजी घ्या
🔆 तीव्र ऊन, वादळी वारा किंवा पावसाची शक्यता असताना फवारणी करू नये. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी फवारणी करणे सर्वोत्तम असते.
🔆 वाऱ्याचा वेग जास्त असल्यास फवारणी टाळावी. नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. वाऱ्याच्या उलट्या दिशेने फवारणी केल्यास औषधाचे तुषार शरीरावर किंवा तोंडावर उडतात.
🔆 फवारणी करताना तोंडावर मास्क, डोळ्यांवर चष्मा (Goggles), हातांत रबरी हातमोजे, पायांत गमबूट आणि अंगावर पूर्ण बाह्यांचे कपडे/ॲप्रॉन घालणे अनिवार्य आहे.
🔆 फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे. पाण्याचा pH 5.5 ते 6.5 (किंचित आम्लयुक्त) असावा. पाण्याचा pH जास्त असल्यास pH Balancer वापरून तो योग्य पातळीवर आणावा.
🔆 पाण्यात टाकलेले कीटकनाश कधीही हाताने हलवू नये. त्यासाठी लाकडी किंवा प्लास्टिकच्या काठीचा वापर करावा.
🔆 दोन किंवा अधिक औषधे एकत्र मिसळताना (Tank Mix) रसायनांची सुसंगतता (Compatibility) तपासूनच मिश्रण करावे.
🔆 नोझल ब्लॉक झाल्यास ते तोंडाने फुंकून साफ करू नये. लहान काडी किंवा वायरच्या तुकड्याने साफ करावे.
🔆 पंपाचा दाब योग्य आणि समान असावा, जेणेकरून फवारणी पानांवर समान पसरून योग्य कव्हरेज मिळेल.
🔆 फवारणी सुरू असताना काहीही खाणे, पाणी पिणे, तंबाखू किंवा सिगारेट/बीडी पिणे पूर्णपणे टाळावे.
🔆 फवारणी सुरू असलेल्या भागात मुले, गरोदर महिला किंवा पाळीव प्राण्यांना येऊ देऊ नये.
🔆 फवारणी संपल्यानंतर लगेच कपडे बदलावेत व साबणाने स्वच्छ आंघोळ करावी.
🔆 फवारणीसाठी वापरलेले कपडे इतर घरगुती कपड्यांपासून वेगळे धुवावेत.
🔆 उरलेल्या औषधाचे द्रावण विहीर, कूपनलिका किंवा पाण्याच्या स्रोतांजवळ टाकू नये.
🔆 रिकाम्या बाटल्या किंवा डबे पुन्हा घरगुती वापरासाठी वापरू नयेत. डबे नष्ट करून किंवा फोडून जमिनी गाडावेत किंवा सुरक्षित विल्हेवाट लावावी.
🔆 फवारणी केलेल्या शेतात काही काळ (कमीत कमी 24 ते 48 तास) जनावरांना चरू देऊ नये, मानवी प्रवेश टाळण्यासाठी शक्य असल्यास फलक लावावा.
🔆 भाजीपाला किंवा फळांवर फवारणी केल्यास, औषधाचा वेटिंग पीरियड (काढणीपूर्वीचा काळ) पूर्ण झाल्याशिवाय फळांची/भाजीपाल्याची काढणी करून विक्री करू नये.
🔆 जर फवारणीदरम्यान चक्कर येणे, मळमळणे, डोळे जळजळणे, डोके दुखणे किंवा अतिसार यांसारखी विषबाधेची लक्षणे दिसल्यास, बाधित व्यक्तीला तात्काळ फवारणीच्या क्षेत्रापासून लांब, मोकळ्या हवेत आणावे. अंगावरील औषध उडालेले कपडे काढून शरीर स्वच्छ पाण्याने धुवावे. औषधाचा डबा/बाटली सोबत घेऊन रुग्णाला तात्काळ जवळच्या डॉक्टरांकडे न्यावे व डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाेपचार घ्यावा.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!