krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Pesticides & Agricultural Produce Exports : कीटकनाशकांचा अतिवापर; शेतमाल निर्यातीतील अडसर

1 min read

Pesticides & Agricultural Produce Exports : अधिक उत्पादनासाठी शेतकरी केवळ रासायनिक खतेच (Chemical fertilizers) नव्हे, तर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचाही (Pesticides) वापर करतात. ही रसायने केवळ कीटकांवरच (Insects) नव्हे, तर पर्यावरण (Environment) आणि मानवी आरोग्यावरही (Human Health) घातक परिणाम करतात. भारतात वाढणारा कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांवर दुहेरी वार करत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे शेतमाल (Agricultural Produce) निर्यातीत (Exports) अडचणी निर्माण होत आहेत. दुर्दैवाने, या दोन्ही समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

🔲 जागतिक संदर्भ
जगातील एकूण कीटकनाशक विषारीपणा (TAT – Total Applied Toxicity) मध्ये भारत, चीन, ब्राझील आणि अमेरिका या चार देशांचा वाटा सुमारे 70 टक्के आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेने 2030 पर्यंत कीटकनाशकांमुळे होणारा धोका 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सायन्स नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार, हे उद्दिष्ट साध्य होणे जवळजवळ अशक्य दिसत आहे. जागतिक स्तरावर TAT प्रत्यक्षात वाढत असून, अधिक विषारी रसायनांचा वाढता वापर हे त्याचे मुख्य कारण आहे. याचा सर्वाधिक दुष्परिणाम भूचर संधिपाद प्राणी (Arthropods), मातीतील सूक्ष्मजीव (Soil Microorganisms) आणि जलचरांवर (Aquatic Animals) होत आहे.

🔲 भारताची स्थिती आणि कालबाह्य कायदे
भारताचा कीटकनाशक कायदा 1968 मध्ये केवळ शेतीतील उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला होता. आज हा कायदा पूर्णपणे कालबाह्य झाला आहे. राहणीमानातील बदलांमुळे कीटकनाशके आता केवळ शेतापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ती घरे, फर्निचर, अन्नपदार्थ आणि अगदी धार्मिक प्रसादातही शिरली आहेत. त्याहून चिंताजनक बाब म्हणजे, युरोप आणि अमेरिकेने ज्या कीटकनाशकांवर बंदी घातली आहे, त्यांचा वापर भारतात अद्यापही सर्रासपणे होत आहे.

🔲 निर्यातीवर होणारा परिणाम
केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी एप्रिल 2026 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात जागतिक स्तरावर नाकारल्या गेलेल्या 13,800 हून अधिक मसाले शिपमेंट्सपैकी 6,800 पेक्षा जास्त शिपमेंट्स एकट्या भारताच्या होत्या. यात प्रामुख्याने इथिलीन ऑक्साईडसारख्या (Ethylene Oxide) कर्करोगजन्य रसायनांच्या (Carcinogenic chemical) अतिवापरामुळे निर्यात अडवण्यात आली. ‘इंडियन ट्रेड पोर्टल’च्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्येच भारतीय तांदूळ, चहा आणि इतर खाद्यपदार्थांच्या अनेक खेपा युरोपमध्ये नाकारण्यात आल्या किंवा त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. बासमती तांदळात क्लोरोपायरीफॉस (Chlorpyrifos)सारखी युरोपात प्रतिबंधित रसायने आढळल्याने तो नाकारल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. युरोपियन युनियनने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कीटकनाशकांच्या अवशेषांबाबत अत्यंत कडक मानके निश्चित केली आहेत. भारतीय शेतकरी अद्यापही अशा रसायनांचा वापर करतात, जी तिथे प्रतिबंधित आहेत. ही रसायने पिकांमध्ये दीर्घकाळ टिकतात आणि प्रयोगशाळा तपासणीत ती जागतिक मानकांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. मंत्री पासवान यांनी स्वतः मान्य केले आहे की, या वारंवार होणाऱ्या अपयशांमुळे जागतिक बाजारपेठेत भारताची विश्वासार्हता धोक्यात येत आहे.

🔲 नवीन विधेयक आणि धोरणातील संभ्रम
केंद्र सरकारने कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक 2025 चा मसुदा जाहीर केला आणि जानेवारी 2026 मध्ये त्याचा सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. हे विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा असली, तरी त्यात रासायनिक उद्योग, शेतकरी संघटना आणि पर्यावरण गटांचे परस्परविरोधी दबाव कायम आहेत. जर या विधेयकात पर्यावरण आणि आरोग्याशी संबंधित सुधारणांकडे दुर्लक्ष झाले तर परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते. सरकार एकीकडे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) कडे वळण्याचे आवाहन करते; तर दुसरीकडे, रासायनिक खतांच्या बाजारपेठेत सरकारी कंपन्यांचा मोठा वाटा आहे. हा विरोधाभास सरकारच्या खऱ्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. शिवाय, शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो की, सेंद्रिय पद्धतीतून रासायनिक शेतीइतके उत्पादन मिळवणे अजूनही कठीण आहे.

🔲 भारतासाठी राष्ट्रीय संकट
कीटकनाशकांचा अतिवापर ही केवळ शेतीची समस्या नाही तर ती आता एक राष्ट्रीय संकट बनली आहे. एकीकडे जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे, दुसरीकडे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे, आणि तिसरीकडे भारताची निर्यातक्षमता व आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता खालावत आहे. या तिहेरी संकटावर मात करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत तर कृषी धोरण, बाजारव्यवस्था आणि शेतकरी शिक्षण या तीनही आघाड्यांवर समन्वित प्रयत्न करावे लागतील. शेतकऱ्याला विष नव्हे, विज्ञान देणे आवश्यक आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!