War & Indian Agriculture : युद्धाचे पडसाद आणि भारतीय शेती
1 min read
War & Indian Agriculture : सन 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाने (War) जागतिक पुरवठा साखळ्यांना मोठा धक्का दिला. खतांच्या (Fertilizer) किमती 40 ते 70 टक्क्यांनी वाढल्या, इंधन महागले आणि भारतीय शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. आता 2026 मध्ये पश्चिम आशियातील, विशेषतः इराणशी संबंधित तणावाने नव्या समस्या निर्माण केल्या आहेत. या साऱ्याचा भारतीय शेतीवर (Indian Agriculture) काय परिणाम होत आहे? जागतिक संकटात भारतीय शेतकरी कुठे उभा आहे? हे समजून घेणे आज अत्यंत गरजेचे आहे.
इराण हा युरिया (Urea) आणि पोटॅशचा (Potash) महत्त्वाचा पुरवठादार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारावर कोणताही अडथळा आला की, खतांच्या किमती वाढतात. लहान शेतकऱ्याकडे हा वाढीव खर्च सहन करण्याची ताकद नसते. तो सावकाराकडून कर्ज काढतो आणि त्याच कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. भारतातील 86 टक्के शेतकरी हे अडीच एकरपेक्षा कमी जमीन असलेले लहान व सीमांत शेतकरी आहेत, हेच या संकटाचे पहिले बळी ठरतात.
भारत इराण आणि पश्चिम आशियाला दरवर्षी सुमारे 11.8 अब्ज डॉलरचा शेतमाल निर्यात करतो. बासमती तांदूळ, चहा, मसाले आणि ताजी फळे यांचा मोठा हिस्सा याच बाजारपेठेत जातो. युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे मार्ग बंद झाले किंवा अनिश्चित झाले, तर शेतमालाच्या किमती पडतात आणि शेतकऱ्याचे उत्पन्न घटते. डिझेल, वीज आणि सिंचनाचा खर्च थेट तेलाच्या जागतिक किमतींशी जोडलेला असतो. पश्चिम आशियात तणाव वाढला की कच्च्या तेलाचे दर वाढतात आणि शेतीचा उत्पादन खर्च आपोआप वाढतो. हे ओझे शेवटी शेतकऱ्यांवरच पडते.
ग्लोबल व्हिलेज (Global Village) झालेल्या आजच्या जगात युद्धात सामील असणारे देश आर्थिक नुकसान सहन करीत नाहीत तर त्याचा परिणाम आयात-निर्यात साखळी व पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या देशाच्या आर्थिक स्थितीवर होताना दिसतो. युक्रेन – रशिया युद्धाने ही गोष्ट जगासमोर प्रखरतेने मांडली. मात्र, सरकारने या गंभीर विषयाकडे राजकीय सोयीने लक्ष दिले. कृषी क्षेत्राबाबतचे धोरण ठरविताना शेतकऱ्यांचा विश्वास अद्याप सरकारला जिंकता आलेला नाही. त्याचमुळे भारतीय कृषी क्षेत्रातील निविष्ठांचा पुरवठा हा आज देखील मोठ्या प्रमाणात आयातीवर विसंबून आहे.
📍 या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही उपाययाेजना
🔆 रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे.
🔆 लहान शेतकऱ्यांसाठी सहकार तत्त्वावर सामुदायिक शीतगृहे (Community Cold Storage) उभारणे.
🔆 खत आयातीचे स्रोत विविधांगी करणे व राष्ट्रीय खत राखीव साठा निर्माण करणे जेणेकरून आणीबाणीत किमती स्थिर राहतील.
🔆 शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे.
🔆 जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांना स्थान मिळवून देण्यासाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न करणे.
युद्धे ही मानवनिर्मित संकटे आहेत, पण त्यांचे चटके भारतातील करोडो शेतकऱ्यांना बसतात. बाजारातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन खर्च कमी करणे, हाच या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. शेती हा भारताचा केवळ व्यवसाय नाही, तो देशाचा सामाजिक कणा आहे. हे संकट भारतीय शेतीला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याची एक संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.