Onion & Potash : कांदा फुगवण अन् पोटॅशचा वापर
1 min read
Onion & Potash : पिकात आज शेतकरी सर्वात जास्त कुठे चुकत असेल, तर तो पोटॅशच्या (Potash) वापराबाबत. ‘पोटॅश टाकले की कांदा (Onion) फुगतो, वजन येतं, दर चांगला मिळतो’ हा विचार इतका खोलवर शिरलेला आहे की तो आता सवय बनली आहे. अनेक शेतकरी शेवटच्या टप्प्यात एकदम जास्त पोटॅश टाकतात, फवारण्या करतात, खर्च वाढवतात आणि तरीही अपेक्षित उत्पादन, वजन आणि टिकाव मिळत नाही. उलट कांदा वरून मोठा दिसतो, पण आतून पोकळ, नरम, पाणचट राहतो. साठवणीत बसतो, कुजतो, बाजारात भाव खातो. अशा वेळी दोष खताला दिला जातो, पण प्रत्यक्षात दोष आपल्या समजुतीचा आणि वापराच्या पद्धतीचा असतो. पोटॅश चुकीचा नाही, ते वापरण्याची वेळ, मात्रा आणि दृष्टीकोन चुकीचा आहे, हे समजून घेणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे.
🎯 मूळ चूक काेणती?
कांदा हा शेवटच्या पंधरा-वीस दिवसांत तयार होणारा पीक नाही. कांदा हा लागवडीच्या पहिल्या दिवसापासून हळूहळू घडत जाणारा एक प्रवास आहे. त्या प्रवासात पानं म्हणजे कारखाना, मुळे म्हणजे वाहतूक व्यवस्था आणि कांद्याचा गड्डा म्हणजे साठवण गोदाम. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालल्या तरच कांदा भरदार, जड, कडक आणि टिकाऊ बनतो. पोटॅशचं काम इथे खूप महत्त्वाचं आहे, पण ते एकट्याचं नाही. पोटॅश म्हणजे फुगवणीचं औषध नसून, तो पाण्याचं व्यवस्थापन, अन्नद्रव्यांची हालचाल आणि पेशींचा कडकपणा यांचा नियंत्रक आहे. त्यामुळे जो शेतकरी असा विचार करतो की ‘आता कांदा फुगवायचा आहे, चला पोटॅश टाकू’, तो मुळातच चुकतो.
🎯 पाेटॅश आवश्यक पण चुकीमुळे फसवणूक
शेतात नेहमी दिसणारं चित्र असं असतं की सुरुवातीला नत्र भरपूर दिलं जातं, पानं जोमात येतात. मग काही दिवसांनी पिकाचा रंग फिका पडतो, वाढ थांबते. त्या वेळी कुणीतरी सांगतो, ‘पोटॅश कमी आहे.’ मग एकदम पोटॅश वाढवला जातो. कांदा वरवर फुगल्यासारखा दिसतो, पण तो फुगवटा बहुतेक वेळा पाण्यावर आधारित असतो. पेशींमध्ये पाणी धरून ठेवलं जातं, पण आत घन पदार्थ साठलेले नसतात. अशा कांद्याला वजन येतं, पण ते वजन शाश्वत नसतं. दोन-तीन आठवड्यांतच कांदा बसायला लागतो. हीच ती खरी फसवणूक आहे, जी पोटॅशच्या चुकीच्या वापरामुळे होते. खरं तर पोटॅश कांदा पिकात सर्वाधिक गरजेचे असते, ते मधल्या कालावधीत, जेव्हा पानं पूर्ण ताकदीने काम करत असतात. त्या वेळी पानांत तयार होणारी साखर, स्टार्च आणि इतर अन्नद्रव्यं कांद्याच्या गड्ड्यात नेण्याचं काम पोटॅश करत असतो. जर त्या काळात पोटॅश कमी पडला, तर पानं कितीही मोठी असली तरी त्यांचं उत्पादन गड्ड्यापर्यंत पोहोचत नाही. मग शेवटी पोटॅश कितीही टाकला तरी तो उशिरा आलेला पाहुणा ठरतो. कांदा तेवढा स्वीकारत नाही. म्हणूनच ‘शेवटी पोटॅश’ ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे.
🎯 संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचे
अजून एक मोठी चूक म्हणजे फक्त पोटॅशवर अवलंबून राहणं. अनेक शेतकरी नत्र कमी करून पोटॅश वाढवतात, कारण त्यांना वाटतं की नत्र दिलं की कांदा पातळ राहतो आणि पोटॅश दिलं की जाड होतो. पण हे अर्धसत्य आहे. नत्र म्हणजे पानांची ताकद. जर पानंच कमी, कमजोर असतील तर अन्ननिर्मितीच कमी होईल. मग पोटॅश काय नेणार? म्हणूनच संतुलित खत व्यवस्थापन हे पोटॅशपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. नत्र, स्फुरद आणि पोटॅश हे एकमेकांचे शत्रू नाहीत, तर सहकारी आहेत. त्यातला एक जरी कमी-जास्त झाला, तरी संपूर्ण यंत्रणा कोलमडते.
🎯 पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
पाण्याचं व्यवस्थापन हा आणखी एक दुर्लक्षित मुद्दा आहे. पोटॅश पाण्याच्या माध्यमातूनच झाडात फिरतो. जमिनीत ओल नसेल, मुळे कोरडी असतील, तर पोटॅश जमिनीत असूनही झाडाला मिळत नाही. अशा वेळी शेतकरी अजून पोटॅश टाकतो आणि म्हणतो ‘खत काम करत नाही’. प्रत्यक्षात खत काम करत नाही असं नाही, तर पाणी आणि वेळ दोन्ही चुकलेली असतात. म्हणूनच पोटॅश देताना जमिनीची ओल, पाण्याची वेळ आणि मात्रा यांचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे.
🎯 पुरेसा डाेस
कांदा पिकात पोटॅशचा एकूण डोस साधारणपणे एकरी 45 ते 50 किलो K₂O एवढा पुरेसा ठरतो, पण हा सगळा डोस एकाच वेळी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. पोटॅशचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तो पिकाच्या संपूर्ण कालावधीत विभागून दिला जातो. सुरुवातीला थोडा, मधल्या काळात जास्त आणि शेवटी फारच मर्यादित. पण प्रत्यक्षात घडतं काय? सुरुवातीला दुर्लक्ष, मधे अर्धवट आणि शेवटी एकदम जास्त. यामुळे खर्च वाढतो, पण फायदा कमी होतो. आज कांदा पिकात जी सर्वात मोठी समस्या दिसते आहे ती म्हणजे दिसायला मोठा पण टिकायला कमजोर कांदा. याचं मूळ कारण म्हणजे पोटॅशचा गैरसमज. पोटॅशने कांदा फुगतो, पण तो कडक, टिकाऊ आणि वजनदार बनवण्यासाठी त्याला आधीपासून योग्य वातावरण हवं असतं. पोटॅश म्हणजे शेवटची सजावट आहे, पाया नाही. पाया मजबूत नसेल तर सजावट कितीही केली तरी इमारत टिकत नाही.
🎯 जादूची कांडी नव्हे शास्त्रीय साधन
शेतकऱ्यांनी आज हे लक्षात घ्यायला हवं की बाजारात टिकणारा कांदा हवा असेल, तर फक्त वजन नव्हे तर घनता, कडकपणा आणि साठवण क्षमता यांचा विचार करावा लागेल. हे सगळं फक्त शेवटच्या खतावर ठरत नाही, तर संपूर्ण पीक व्यवस्थापनावर ठरतं. पोटॅश हा त्या व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो एकटाच सगळं काही नाही. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की कांदा शेवटच्या दिवसांत फुगत नाही, तो पहिल्या दिवसापासून घडत जातो. जो शेतकरी हे समजून घेतो, ताे पोटॅशला जादूची कांडी न मानता एक शास्त्रीय साधन मानतो. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि संतुलित खतांसोबत दिलेला पोटॅशच शेतकऱ्याला खरा फायदा देतो. बाकी सगळं म्हणजे तात्पुरता फुगवटा, जो फार काळ बाजारात आणि चाळीतही टिकत नाही.