Republic Day and Farmers : प्रजासत्ताक दिन अन् शेतकऱ्यांचा गुदमरलेला श्वास
1 min read
Republic Day and Farmers : प्रजासत्ताक दिन (Republic Day)… भारताच्या संविधानाचा (Constitution) गौरव दिवस. देशभर तिरंगा अभिमानाने फडकतोय. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीतांचे सूर आणि भाषणांमधून ओसंडून वाहणारा उत्साह वातावरणात भरला असताे. आभाळात उंच फडकणाऱ्या त्या तीन रंगांकडे पाहताना प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली असते. पण, या सर्व जल्लोषाच्या आणि लखलखाटाच्या पलीकडे, कुठेतरी जमिनीवर, मातीत गाडलेली एक आर्त हाक आजही व्यवस्थेच्या गोंगाटात विरून जातेय. ती हाक आहे या देशाच्या पोशिंद्याची – शेतकऱ्याची (Farmers)!
आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, ते सहजासहजी मिळालेले नाही. ज्यांनी हसत-हसत फाशीचा दोर स्वीकारला, ज्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या, त्या क्रांतीकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हे स्वातंत्र्य अंकुरले आहे, यात शंकाच नाही. पण स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर आज एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतोय, अंतर्मुख करतोय – ‘ज्या स्वातंत्र्यात देश जगतोय, त्या स्वातंत्र्यात शेतकऱ्याचा श्वास का गुदमरतोय?’
इतिहासाची पाने चाळली तर दिसते, स्वातंत्र्यानंतरचा भारत भूकेने व्याकुळ होता. अन्नधान्यासाठी आपल्याला जगाकडे हात पसरावे लागत होते. त्या बिकट काळात देशाचा शेतकरी ढाल बनून पुढे आला. त्याने स्वतःच्या पोटाला पीळ दिला, लेकरांच्या तोंडचा घास काढला, पण देशाला उपाशी झोपू दिले नाही. रात्रंदिवस काबाडकष्ट करून, उन्हातान्हात जळून, पावसाच्या लहरीपणाशी झुंजत त्याने भारताला अन्नधान्यात ‘स्वयंपूर्ण’ केले. आज भारत जगाला सांगतो, ‘आम्ही अन्न निर्यात करतो.’ पण त्या निर्यातीच्या आकड्यांमागे, त्या अन्नाच्या प्रत्येक कणावर शेतकऱ्याच्या घामाचा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या त्याच्या अश्रूंचा इतिहास कोणी वाचतो का?
आजच्या ‘डिजिटल’ आणि ‘आत्मनिर्भर’ भारतात हजारो शेतकरी आत्महत्या करतात, हे या महासत्तेच्या स्वप्नावर लागलेले एक विदारक गालबोट आहे. पण, याला केवळ ‘आत्महत्या’ म्हणणे हा त्या बलिदानाचा अपमान ठरेल. हे आत्महत्या नाहीत, तर स्वस्त अन्नाच्या अपेक्षापायी आणि व्यवस्थेच्या निष्ठुरतेपायी घेतलेले हे ‘बळी’ आहेत. जेव्हा सीमेवर सैनिक शहीद होतो, तेव्हा संपूर्ण देश नतमस्तक होतो, अश्रू ढाळतो. ‘जय जवान’ म्हणताना आपला ऊर भरून येतो. मग प्रश्न हा उरतोच – देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणारा जवान आणि देशाचे पोट भरताना स्वतःचे आयुष्य संपवणारा किसान, यांच्या बलिदानात आपण भेदभाव का करतो?
आज आपण ‘फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी’ची स्वप्ने पाहतोय. बुलेट ट्रेन, आठपदरी महामार्ग, आणि गगनचुंबी इमारतींच्या चर्चा जोरात आहेत. पण विकासाच्या या बुलेट ट्रेनखाली आणि चकचकीत महामार्गांच्या डांबराखाली शेतकऱ्याची माणुसकी चिरडली जात नाही ना, याचा विचार कधी होणार? ज्या देशाची ओळख ‘कृषिप्रधान’ अशी आहे, तिथे शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते, वर्षानुवर्षे ऊन-पावसात आंदोलने करावी लागतात, हे कोणत्या प्रजासत्ताकाचे लक्षण मानायचे?
शेतकरी तुमच्याकडे महालांचे सुख मागत नाही किंवा ऐश्वर्याची अपेक्षा करत नाही. त्याची मागणी अगदी साधी आणि रास्त आहे – ‘माझ्या घामाला योग्य दाम द्या, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मला लाचार होऊ देऊ नका, आणि कर्जाच्या फासावर लटकणे हाच एकमेव पर्याय उरेल अशी वेळ आणू नका.’ प्रजासत्ताक दिनाच्या या पवित्र मुहूर्तावर, ध्वजारोहण करताना एक क्षणभर थांबूया. आज आपल्या ताटात जे अन्न आहे, त्या अन्नामागे कोणाचे तरी आयुष्य मोडले आहे का, याचा विचार करूया. आपण तिरंग्याला सलाम करतोच, पण जो मातीत राबून, मान झुकवून या देशाचा डोलारा सांभाळतोय, त्या शेतकऱ्याला सन्मानाने सलाम कधी करणार?
शेतकरी केवळ अन्नदाता नाही; तो या देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा कणा आहे. त्याच्या मरणाने हा देश केवळ आर्थिकदृष्ट्या नाही, तर नैतिकदृष्ट्या आणि माणुसकीच्या पातळीवर गरीब होतोय. आज, या शुभदिनी, प्रत्येक नागरिकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा – ‘जर शेतकरीच वाचला नाही, तर हे स्वातंत्र्य आणि हे प्रजासत्ताक कोणासाठी उरेल?’ देशातील तमाम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. या शुभेच्छा एका शेतकऱ्याकडून – ज्याच्या छातीत देशप्रेम आजही धडधडतंय, पण त्या धडधडीत व्यवस्थेने दिलेल्या जखमेची ठसठससुद्धा आहे.
जय हिंद. जय जवान, जय किसान!