krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Illusion of NPK : ‘एनपीके’च्या भ्रमात अडकलेली शेती

1 min read

Illusion of NPK : प्रत्येक पिकाला त्याच्या याेग्य संगाेपन, परिपूर्ण वाढ आणि उत्तम उत्पादनासाठी नायट्राेजन ((N – Nitrogen)), फाॅस्फरस (P – Phosphorus) व पाेटॅशियम (K – Potassium) या मुख्य (Primary), कॅल्शियम (Ca – Calcium), मॅग्नेशियम (Mg – Magnesium) व सल्फर (S – Sulfur) या दुय्यम (Secondary), तसेच आयर्न (Fe – Iron), झिंक (Zn – Zinc), मँगनीज (Mn – Manganese), काॅपर (Cu – Copper), बोरॉन (B – Boron), मॉलिब्डेनम (Mo – Molybdenum) व निकेल (Ni – Nickel) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची (Micronutrients) आवश्यकता भासते. यातील कुठलाही घटक कमी किंवा अधिक झाला तर झाडांचे आराेग्य धाेक्यात येऊन पिकांचे उत्पादन घटते. बहुतांश शेतकरी पिकांच्या झाडांची ही गरज भागविण्यासाठी मिश्र व संयुक्त रासायनिक खते वापरतात. या खतांमधून पिकांची दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण हाेतेच, असे नाही. या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटणे, झाडे अशक्त राहणे, अपेक्षित उत्पादन न हाेणे, पैसा व वेळ खर्च हाेणे, तसेच कष्ट करूनही पिकांचे नुकसान हाेणे या व अन्य बाबींना सामाेरे जावे लागते. आधुनिक शेतीत फक्त मुख्य खतांवर अवलंबून राहणे म्हणजे अर्धवट माहितीवर शेती करण्यासारखे आहे.

♻️ उत्पादनात घट
सल्फर व मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे नायट्रोजनपेक्षाही जास्त उत्पादन घटते. जर नायट्राेजनचे प्रमाणे पुरेसे असेल आणि सल्फर व मॅग्नेशियमची कमतरता असेल, तर पिकांना पुरेशा प्रमाणात नायट्राेजन मिळत नाही. फळझाडांना कॅल्शियम व मॅग्नेशियम मिळाले नाही तर 30 ते 60 टक्क्यांपर्यंत फूलधारणा कमी हाेते. सल्फरच्या कमरतेमुळे जमिनीतील नायट्राेजनचा वापर किमान 15 टक्क्यांनी कमी हाेताे. त्यामुळे या दुय्यम घटकांची कमतरता असताना शेतकऱ्यांनी कितीही युरियाचा व नत्रयुक्त खतांचा वापर व त्यावर खर्च केला तरी पिकांना त्याचा फारसा फायदा हाेत नाही.

♻️ नायट्राेजन (N – Nitrogen)
पिकांच्या प्रकाश संश्लेषणात (Photosynthesis) नायट्राेजन (Nitrogen) महत्त्वाची भूमिका बजावते. नायट्रोजन हा क्लोरोफिलचा (हरितद्रव्य) मुख्य घटक असल्याने झाडे सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करून स्वतःचे अन्न तयार करू शकतात. त्यामुळे पिकांना गडद हिरवा रंग येतो. पाने, फांद्या आणि खोडाच्या जोमदार वाढीसाठी नायट्रोजन अत्यंत आवश्यक आहे. नायट्रोजन हा झाडांमधील प्रथिने, एन्झाईम्स (Enzymes) आणि डीएनए (DNA) च्या निर्मितीचा मूळ आधार आहे. प्रथिनांशिवाय पिकांची पेशीविभाजन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. धान्य आणि फळांच्या उत्पादन वाढीसाठी नत्रयुक्त खते मदत करतात. झाडांमधील ऊर्जा साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या ATP रेणूंमध्ये नायट्रोजन महत्त्वाचा असतो.
नायट्राेजनच्या कमतरतेमुळे पिकाची खालची पाने आधी पिवळी पडतात व वाढ खुंटते. फुल व फळधारणेचे प्रमाण कमी असते.

♻️ फाॅस्फरस (P – Phosphorus)
फाॅस्फरसमुळे (Phosphorus) पिकांच्या मुळांची उत्तम वाढ हाेते. ती मुळे जमिनीत खोलवर जातात व झाडांना भक्कम आधार देत पाणी व पोषक घटक शाेषून घेतात. झाडांमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार झालेली ऊर्जा एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी फाॅस्फरसची आवश्यक असते. पिकांना वेळेवर फुल व फळधारणेसाठी तसेच फळांचा आकार वाढ व गुणवत्ता सुधारण्यासाठी फाॅस्फरस आवश्यक असते. फाॅस्फरसमुळे पिकांमधील दाणे टपोरे होण्यास तसेच बियांची उगवणशक्ती वाढवण्यासाठी मदत हाेते. पिकांची राेग व कीड प्रतिकारशक्ती वाढते.
फाॅस्फरसच्या कमतरतेमुळे पाने गडद हिरवी किंवा जांभळट/तांबूस रंगाची दिसू लागतात. ही छटा प्रामुख्याने पानांच्या कडांना किंवा मागील बाजूस दिसते. पिकाची मुळे आखूड राहत असल्याने झाड हवेतून व जमिनीतून पुरेसे अन्न घेऊ शकत नाही. वाढ मंदावत असल्याने झाड दिसायला शेंड्याकडे निमुळते किंवा अशक्त दिसते. फुले येण्यास उशीर होतो व लागलेली फुले गळतात. फळांची पूर्ण वाढ होत नाही तसेच पीक उशिरा कापणीला येते.

♻️ पोटॅशियम (K – Potassium)
पोटॅशियम (Potassium) पिकांच्या पानांवरील छिद्रांचे (Stomata) उघडणे व मिटणे नियंत्रित करते. त्यामुळे दुष्काळी स्थितीत झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पीक तग धरते. विविध कीड, रोग व कडाक्याच्या थंडीपासून वाचवण्यास पिकांना मदत करते. पोटॅशियम पानांमध्ये तयार झालेली साखर आणि पिष्टमय पदार्थ फळे, दाणे किंवा कंदांकडे वाहून नेण्याचे काम करते. फळांचा आकार वाढवणे, त्यांना आकर्षक रंग देणे, चव सुधारणे आणि फळांची साठवणूक क्षमता (Shelf life) वाढवणे यात पोटॅशियम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नत्रामुळे झाड लवचिक होते, तर पोटॅशियम खोडाला मजबुती देते.
पिकात पोटॅशियमची कमतरता निर्माण झाल्यास पानांच्या कडा व शेंडे जळाल्यासारखे / करपल्यासारखे पिवळे किंवा तपकिरी दिसतात. पोटॅशियमअभावी फळांची वाढ पूर्ण होत नाही व त्यांची चव बिघडते. धान्याचे दाणे बारीक किंवा पोकळ राहतात. खोड कमकुवत हाेत असून, झाडाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने कीड आणि बुरशीजन्य रोगांना पिके लवकर बळी पडतात. मुळांची कार्यक्षमता कमी होत असल्याने झाडे जमिनीतील अन्नद्रव्ये नीट शोषू शकत नाही.

♻️ कॅल्शियम (Ca – Calcium)
कॅल्शियम (Calcium) हा झाडांच्या पेशींची भिंत (पेशीभित्तीका – Cell Walls) बनवणारा घटक मानला जाताे. झाडाच्या शेंड्याची वाढ (Growing tips) आणि मुळांच्या टोकांची वाढ होण्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते. कॅल्शियम नत्राच्या शोषणास मदत करते आणि झाडातील विषारी आम्ले उदासीन (Neutralize) करते तसेच फळांचे कवच किंवा साल जाड आणि मजबूत होत असल्याने फळे लवकर सडत नाहीत व वाहतुकीत टिकून राहतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडे कमकुवत राहणे, कोवळी पाने वाकडी हाेणे, कळ्या गळणे, वाढ खुंटणे, फळगळ, फळ फुटणे, लवकर सडणे आदी समस्या उद्भवतात. झाडांना ‘ब्लॉसम ॲण्ड रॉट’ राेग हाेताे. या राेगामुळे टोमॅटो, मिरची व टरबूज यासारख्या पिकांमध्ये फळाच्या खालचा भाग काळा पडून सडतो. टोमॅटोवर फक्त कॅल्शियम नायट्रेटची फवारणी केल्याने 17 टक्के उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. चुनखडीयुक्त जमिनीत पिकांना कॅल्शियम मिळविण्यासाठी खूप त्रास हाेताे. कॅल्शियम झाडामध्ये सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत नसल्याने त्याची लक्षणे आधी झाडाच्या शेंड्याकडील नवीन पानांवर दिसतात. नवीन येणाऱ्या पानांच्या कडा वाकतात किंवा त्यांचा आकार विद्रूप होतो. झाडाचा मुख्य शेंडा किंवा वाढणारा भाग सुकत असल्याने झाडाची पुढची वाढ पूर्णपणे थांबते. मुळांची वाढ खुंटल्याने ती आखूड राहातात व काळी पडतात. फळांची साल लवचिक राहत नसल्याने फळे मधून तडकतात.

♻️ मॅग्नेशियम (Mg – Magnesium)
मॅग्नेशियम (Magnesium)ला पिकांच्या आरोग्याचा ‘पॉवर हाऊस’ म्हटले जाते. झाडे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून त्यांचे अन्न तयार करते आणि प्रकाश संश्लेषणासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. क्लोरोफिल (Chlorophyll) व क्लोरोफिलच्या मध्यभागी असलेले मॅग्नेशियम हे या प्रक्रियेचे मुख्य केंद्र आहे. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह असते, तसेच झाडांच्या हरितद्रव्यात मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियमच्या अभावामुळे झाडे त्यांचे अन्न तयार करू शकत नाहीत. झाडांमध्ये फाॅस्फरस वाहून नेण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेशियम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मॅग्नेशियम अनेक एन्झाईम्सना सक्रिय करत असल्याने झाडांमध्ये साखर, पिष्टमय पदार्थ आणि तेलाची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे पाने गर्द हिरवी राहतात व झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे झाडांची पाने पिवळी पडणे, विशेषतः पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडणे (इंटरव्हेनल क्लोरोसिस), झाडांची वाढ खुंटणे, कडा लाल किंवा जांभळ्या होणे, कमतरता जास्त वाढल्यास पिवळा पडलेला भाग काळपट, तांबूस किंवा जांभळा होणे, पाने गळणे, प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे झाड कमकुवत होणे, खालची पाने वेळेपूर्वीच वाळून व गळून पडणे, फळांचा दर्जा खालावणे, फळांची चव उतरणे, ती लवकर न पिकणे, कापूस पिकाची पाने लाल (लाल्या) हाेणे या समस्यांमुळे पिकांचे १५ ते २० टक्के उत्पादन घटते.

♻️ गंधक – सल्फर (S – Sulfur)
झाडांना प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिने तयार करण्यासाठी झाडांना अमिनाे ॲसिड (Amino acid)ची गरज भासते व सल्फर (Sulfur) झाडांमध्ये अमिनाे ॲसिड (सिस्टीन आणि मिथियोनाईन) तयार करणारे प्रथिने तयार करतात. सल्फर तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण (Oil Content) वाढविण्यास मदत करते. क्लोरोफिलच्या निर्मितीत सल्फर महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे मुळे झाडाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालते. झाडांमधील जीवनसत्त्व ब (Vitamin B1) आणि विविध एन्झाईम्सच्या कार्यासाठी सल्फर आवश्यक असते. सल्फरच्या संयुगांमुळे कांदा, लसूण व मोहरी यांना विशिष्ट तिखटपणा व गंध प्राप्त हाेता.
सल्फरच्या कमतरतेमुळे झाडे पिवळी पडणे, अशक्त हाेणे, त्यांची राेगप्रतिकारशक्ती नष्ट हाेणे, ती लगेच रोगांना बळी पडणे या समस्या उद्भवतात. सल्फरची कमतरता सर्वात आधी झाडाच्या शेंड्याकडील नवीन पानांवर दिसते. नवीन पाने फिक्कट हिरवी किंवा पिवळी पडतात. झाडाची वाढ मंदावते, खोड बारीक राहते व झाडे दिसायला अशक्त वाटतात. कांदा, लसूण या पिकांचा गंध हरपताे, तेलवर्गीय पिकांच्या दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते. डाळवर्गीय पिकांच्या मुळांवरील ज्या गाठी हवेतील नत्र शोषून घेतात, त्यांची कार्यक्षमता सल्फरअभावी कमी होते. सल्फरच्या फवारणीमुळे उत्पादनात २४ टक्के व तेलाच्या घनतेत १० टक्के वाढ झाल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.

♻️ लोह – आयर्न (Fe – Iron)
झाडांमध्ये हरितद्रव्य (Chlorophyll) तयार करणे व वनस्पतीच्या श्वसन प्रक्रियेत लाेह (Iron) महत्त्वाची भूमिका बजावते.
लाेहच्या कमतरतेमुळे झाडाची कोवळी पाने पिवळी पडतात, पण पानाच्या शिरा हिरव्याच राहतात. जास्त कमतरता असल्यास पाने पांढरट होतात.

♻️ जस्त – झिंक (Zn – Zinc)
जस्त (Zinc) झाडाची वाढ होण्यासाठी आवश्यक संप्रेरके (Auxins) तयार करते. शिवाय, प्रथिनांच्या निर्मितीत मदत करते.
झिंकच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते व त्यांच्या पानांचा आकार लहान होतो. पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व पानांवर तांबूस ठिपके दिसू शकतात. (धान्यावरील खैरा रोग).

♻️ मँगनीज (Mn – Manganese)
मँगनीज (Manganese) झाडांच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत नायट्रोजनचे पचन करण्यासाठी आणि कर्बोदके (Carbohydrates) तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.
मँगनीजच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानाच्या शिरा हिरव्या राहतात, पण शिरांमधील भाग फिकट पिवळा किंवा करडा होतो. त्यामुळे पिकाची वाढ मंदावते.

♻️ तांबे – काॅपर (Cu – Copper)
तांबे (Copper) झाडांच्या प्रजननासाठी व त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे फळांचा व धान्याचा दर्जा सुधारतो.
काॅपरच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्याकडील पाने वाळू लागतात (Die-back). फळझाडांमध्ये डिंक्या रोगासारखी लक्षणे दिसतात व फळे गळतात.

♻️ बोरॉन (B – Boron)
बोरॉनमुळे (Boron) झाडांमध्ये पेशीविभाजन (Cell Division), परागीभवन (Pollination) आणि शर्करेचे (Sugar) वहन सुकर हाेते. फळे व फुलांच्या वाढीसाठी बोरॉन आवश्यक असते.
बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडाचा शेंडा मरतो. फळे व खोड तडकते. फुले व फळांची गळ होते.

♻️ मॉलिब्डेनम (Mo – Molybdenum)
मॉलिब्डेनम (Molybdenum) झाडांमधील नायट्रोजन स्थिर करण्यासाठी (विशेषतः कडधान्यांमध्ये) आणि नायट्रेटचे रूपांतर प्रथिनांमध्ये करण्यासाठी आवश्यक असते.
मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा करपतात किंवा पाने वाकडी-तिकडी होतात (कोबीमधील व्हिपटेल रोग). खालची पाने पिवळी पडतात.

♻️ निकेल (Ni – Nickel)
युरियाचे विघटन करण्यासाठी तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी निकेल (Nickel) उपयुक्त ठरते. निकेल वनस्पतींच्या चयापचय क्रियेत मदत करते.
निकेलच्या कमतरतेमुळे बियाणे निकामी होऊ शकतात. पानाच्या टोकावर युरिया साचल्यामुळे जळल्यासारखे डाग पडतात.

♻️ वापरण्याच्या योग्य पद्धती
दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट (Calcium nitrate), बोरॉन फवारणीद्वारे, तर मॅग्नेशियम सल्फेट (Magnesium sulfate), सल्फर, बेंटोनाइट सल्फर (Bentonite Sulfur) सिंचनाद्वारे जमिनीतून देता येताे. जिप्सममध्ये (Gypsum) कॅल्शियम व सल्फर, तर डोलोमाइटमध्ये (Dolomite) कॅल्शियम व मॅग्नेशियम हे दोन्ही असतात. हे घटक जमिनीतून द्यावे लागतात. या घटकांची खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी किंवा कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेली उत्पादने खरेदी करणे कधीही याेग्य राहील.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!