Kavali Vel : कावळी वेल…..
1 min read
Kavali Vel : कावळी (Kavali) हे नाव आजच्या काळात बहुतांश लोकांनी कधीही ऐकलेले नसेल किंवा अशा नावाचे एखादे झाड निसर्गात आहे, हे अनेकांच्या डोक्यात नसेल. कारण आजच्या काळात याचा व माणसाचा काही संबंध राहिलेला नाही, परंतु एक काळ असा होता की या झाडाशिवाय मानवाचे जीवन चालणे शक्य नव्हते. कैकाडी या समाजाचा संपूर्ण रोजगार, उपजीविका या झाडावर अवलंबून होती. माझ्या लहानपणी असे कैकाडी समाज गावोगावी, घरोघरी जाऊन कावळीच्या वस्तू विकत असत. गावामध्ये अनेक कैकाडी लोकांच्या आसाम्या असत म्हणजे संबंधित कुटुंबाला वर्षभर लागणाऱ्या सर्व वस्तू पुरविणे व त्याबदल्यात धान्य किंवा पैसे घेणे. ही परंपरा साधारण 2010 पर्यंत सुरू होती, त्यानंतर ती कमी झाली व आता तर ती पूर्णपणे संपलेली आपल्याला पाहायला मिळते. कावळीपासून धान्य साठविण्यासाठी कणगी बनवत असत, कोंबड्या डालण्यासाठी झाप, झाडांना लावण्यासाठी जाळ्या, भाकरी ठेवण्याचे टोपले आणि इतर अजून काही वस्तू, यांची टिकाऊ क्षमता प्रचंड होती. यासाठी लागणारे कावळी वेल शेतकऱ्यांच्या बांधावर, ओढ्याच्या कडेने, तळ्याच्या काठी, पांदिमध्ये वाढत असत. या वेली विविध झाडावर चढतात व प्रचंड मोठ्या होतात.
🔲 वेलीची रचना
ही वेल अतिशय महाकाय अशी असते, ती वेगाने झाडावर चढून मोठी होती. या वेलीला अनेक फाटे फुटतात व ते एकमेकांना गुंडाळत किंवा झाडाला वेढे देत वाढतात. याची पाने निमुळती व लांब असतात, वेलीला दोन्ही बाजूंनी समांतर अशी दोन पाने असतात. या झाडाला समांतर निमुळती व टोकदार फळे लागतात, यांना शेंगाही म्हणतात. या फळाच्या आतमध्ये शेकडो बिया असतात. या बियांना कापसासारखी हलकी पांढरे छत्र वरती असतात, यामुळे हे फोडले की हे वाऱ्यावर उडतात. या पद्धतीने याचा बीजप्रसार होतो, याला आम्ही लहानपणी म्हाताऱ्या म्हणत असत. एकदा हा वेल तोडला तरी परत याला नवीन फाटे फुटतात व ही वेल वाढते, आजही अनेक ठिकाणी या वेली पाहायला मिळतात.
🔲 ऐतिहासिक महत्त्व
कावळी या वेलीला समृद्ध इतिहास लाभलेला आहे. प्राचीन काळापासून हिचा उपयोग मानवाच्या जीवनासाठी होत आलेला आहे. जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर होत असलेली उदाहरणे पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी धान्य साठविणे, स्वयंपाक घरातील भाकरी ठेवण्यासाठी किंवा इतर वस्तू, झाडाना कुंपण कारणासाठी, जनावरांना कुंपण करण्यासाठी, कोंबडी पालन करण्यासाठी व इतर अनेक गोष्टींसाठी या वेलीच्या वस्तू आपले पूर्वज करत असत. अनेक मंदिरामध्ये विविध वस्तू बनविण्यासाठी याचा वापर होत असे. या वेलीशिवाय मानवी जीवन अपूर्ण होते. या वेलीने आपल्या इतिहासात खूप मोठे योगदान दिलेले आहे.
🔲 पर्यावरणीय महत्त्व
ही वेल म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम निर्मिती आहे, खूप कमी पाण्यात येणारी ही वनस्पती आहे, भारतात ही सगळीकडे आढळते. जमिनीमध्ये पाण्याचा साठा करते तसेच माती धरून ठेवण्याचे कार्यही करते. ही वेल दुसऱ्या झाडांवर वाढत असल्यामुळे ही झाडांना गुंडाळून ठेवते, यामुळे अनेक जीवांना झाडावर वेगाने चढण्यास मदत होते. अनेक कीटक या वेलीच्या आधाराने राहतात, मुंग्या व मुंगळे या वेलीवर मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. हिचे पाने झाड असल्यामुळे त्यातून पाण्याचे बाष्पीभवन होत नाही, यामुळे ही कायम हिरवी राहते, यामुळे हवेत गारवा निर्माण करण्यासाठी उपयोगी पडते, यामुळे पाऊस पडण्यास हिचा उपयोग होतो.
🔲 अर्थकारण
कैकाडी हा समाज या वेलीच्या आधाराने आपली उपजीविका करत असे. या वेलीपासून विविध वस्तू बनविण्याची कला त्यांना अवगत होती. यापासून धान्य साठविण्यासाठी कणगी, झाडांसाठी जाळ्या, कोंबडी पालनासाठी झाप, भाकरी ठेवण्यासाठी टोपले, विविध धागे व दावे ते बनवत असत. आजच्या काळात जरी यांचा वापर कमी झाला असला तरीही आदिवासी, वनवासी समाजात याचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आजही अनेक लोकांना यातून रोजगार मिळत आहे. परंतु दिवसेंदिवस याचा वापर संपत आहे कारण याची जागा धातूच्या वस्तू घेऊ लागल्या आहेत.
🔲 आयुर्वेद
प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा वापर केला जात आहे. ही वनस्पती अर्धशिशीसाठी उपयुक्त आहे, काळ्या चहात या वनस्पतीची मुळी टाकुन पिणे. ही मुळी सुगंधित असते.
ही वनस्पती रक्तात मिसळलेले पित्त बाहेर काढते. पित्त कमी करते, रक्त शुद्ध करते, त्वचा उजळते. आजही या वेलीचा उपयोग विविध औषधात केला जातो. हिच्यापासून बनलेली औषधे ही नैसर्गिक, शुद्ध व गुणकारी असतात.
कावळी हा वेल एके काळी मानवी जीवनाचा अविभाज्य घटक होता, परंतु काळानुसार आता याचा वापर कमी होऊ लागला आहे. तरीही निसर्गासाठी यांचे अस्तित्व असणे आवश्यक आहे, यामुळे जेथे जेथे या वेली आहेत त्यांचे रक्षण आपण सर्वांनी केले पाहिजे. नागर फाउंडेशनने यावर अधिक भर दिलेला आहे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये आपण जनजागृती करत आहोत.