krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Nitrogen : नायट्रोजन भूत असल्याची भीती

1 min read

Nitrogen : नायट्राेजन (Nitrogen) भूत आहे, ‘अती नाही तर माती’ या विज्ञानावर आधारित अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकूया. शेतकरी मुळातच संतुलन जपणारा असतो; तो अनुभवातून शिकतो आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. मात्र, आज नायट्रोजन खताच्या बाबतीत शेतकरी अशा अवस्थेत पोहोचला आहे की, त्याच्या अति वापराचा दोष टाळताना योग्य वापरही टाळला जात आहे. ही स्थिती केवळ शास्त्रीय गोंधळातून नाही, तर धोरणात्मक आणि व्यवस्थात्मक कारणांतून निर्माण झाली आहे.

हरितक्रांतीपूर्व काळात भारतीय शेती मातीच्या नैसर्गिक शक्तीवर उभी होती. जमिनीत सेंद्रिय कर्ब मुबलक होता, सूक्ष्मजीव सक्रिय होते आणि शेणखत, पाचट, काडीकचरा यांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची एक सजीव साखळी कार्यरत होती. हरितक्रांतीनंतर सिंचन वाढले, सुधारित वाण आले आणि नायट्रोजन खताचा, विशेषतः युरियाचा, मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. त्या काळात युरियाचा परिणाम चमत्कारिक वाटावा असा होता. कारण जमिनीत आधीच फॉस्फरस, पोटॅश, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होती. नायट्रोजन दिल्यावर वनस्पतींची वाढ वेगाने झाली, पाने गडद हिरवी झाली, प्रकाशसंश्लेषण वाढले आणि गहू, ज्वारी, बाजरीसारख्या पिकांमध्ये उत्पादनात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. प्रत्यक्ष उत्पादन वाढवणारा घटक नायट्रोजन नव्हता, तर नायट्रोजनमुळे इतर अन्नद्रव्ये प्रभावीपणे काम करू लागली.

नायट्रोजनचे वनस्पतीतील कार्य समजून घेतले तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. नायट्रोजनमुळे क्लोरोफिलची निर्मिती होते आणि पानांना हिरवटपणा येतो. त्याच हिरव्या पानांमधून सूर्यप्रकाशाचे अन्नात रूपांतर होते. नायट्रोजन हा अमिनो आम्लांचा पाया आहे; त्यातून प्रथिने तयार होतात आणि त्या प्रथिनांवर पेशींची वाढ, फांद्यांची वाढ, फुलधारणा व फळधारणा अवलंबून असते. नायट्रोजनमुळे एन्झाईम्स सक्रिय होतात, त्यामुळे वनस्पतीतील सर्व जैव-रासायनिक प्रक्रिया सुरळीत चालतात. म्हणूनच नायट्रोजनला सर्व अन्नद्रव्यांचा ‘मुख्य चालक’ किंवा ड्रायव्हर म्हटले जाते. नायट्रोजन कमी असेल तर फॉस्फरस असूनही मुळांची वाढ होत नाही, पोटॅश असूनही ताण सहनशक्ती येत नाही आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असूनही त्यांचा अपेक्षित उपयोग होत नाही.
परंतु स्वस्त आणि लगेच परिणाम देणारे खत म्हणून युरियाचा अतिरेकी वापर सुरू झाला. फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हळूहळू कमी झाला. परिणामी, जमिनीतील संतुलन बिघडू लागले. अति नायट्रोजनमुळे वनस्पतींची वाढ पाणचट झाली, ऊतक मऊ पडली, किडी आणि रोगांचे आकर्षण वाढले. नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजन पाण्यात मिसळून मानवी आरोग्यावर परिणाम करू लागला. माती चोपण होऊ लागली. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी नायट्रोजनच्या अति वापराविरोधात इशारा दिला, जो शास्त्रीयदृष्ट्या योग्यच होता.

या इशाऱ्याचे रूपांतर हळूहळू भीतीमध्ये झाले. सरकारी मोहिमा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रचारातून ‘युरिया घातक आहे’ हा संदेश इतका ठसवला गेला की, अति वापर आणि योग्य वापर यामधील सीमारेषाच पुसली गेली. आजची परिस्थिती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी कधीकाळी एकरी दोन-दोन क्विंटल युरिया वापरला, तेच शेतकरी आज एकरी दोन किलो युरिया द्यायलाही घाबरत आहेत. हा बदल शास्त्रीय समजुतीतून आलेला नसून मानसिक भीतीतून आलेला आहे आणि ही भीती निर्माण करण्यात संपूर्ण यंत्रणा काही अंशी जबाबदार आहे.

यात आणखी एक गंभीर आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून सातत्याने पुढे येणारा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापनाची वेळ आणि उपलब्धता. शेतकऱ्यांना ज्या काळात पिकांना नायट्रोजनची नितांत गरज असते. पेरणीनंतरची वाढ, फुटवा, कणसधारणा किंवा फुलधारणा. नेमक्या त्याच वेळी बाजारातून स्वस्त दरात मिळणारा युरिया गायब झालेला आढळतो. अतिवापर टाळण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी युरियाची उपलब्धता मर्यादित ठेवण्याची एक प्रकारची ‘कला’ व्यवस्थेने आत्मसात केली आहे, असा शेतकऱ्यांचा ठाम अनुभव आहे. परिणामी गरज असताना युरिया मिळत नाही आणि उपलब्ध झाला तरी उशिरा मिळतो. उशिरा दिलेला नायट्रोजन हा पिकासाठी उपचार ठरत नाही, तर केवळ सांत्वन ठरतो. यामुळे शेतकरी नको त्या वेळी नको त्या प्रमाणात खत वापरण्यास प्रवृत्त होतो किंवा पूर्णपणे वापर टाळतो, आणि दोन्ही परिस्थिती शेतीसाठी घातक ठरतात.

नायट्रोजनचा अभाव हा अति वापराइतकाच, कधी कधी त्याहून अधिक घातक असतो, हे मात्र पुरेसे सांगितले गेले नाही. नायट्रोजन कमी पडल्यास पिकांची वाढ खुंटते, पाने फिकट हिरवी किंवा पिवळी पडतात, थंडी किंवा उष्णतेच्या ताणात पिके सावरू शकत नाहीत. भाजीपाला आणि फळपिकांमध्ये फुलगळ, फळगळ वाढते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो. अशा वेळी शेतकरी इतर खते, फवारण्या, औषधे वापरतो, पण नायट्रोजन नसल्यामुळे त्या उपायांचा अपेक्षित फायदा होत नाही.

जागतिक पातळीवर पाहिले तर नायट्रोजन वापर पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला कुठेही दिला जात नाही. अमेरिका, युरोप, चीनमध्ये आजही नायट्रोजन वापर होतो, मात्र तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात केला जातो. पंजाब आणि हरयाणामध्ये गव्हाचा काडीकचरा जमिनीत मिसळताना त्याचे विघटन होण्यासाठी जास्त नायट्रोजन दिला जातो, कारण कार्बन-नायट्रोजन संतुलन राखणे आवश्यक असते. हा वापर अति नसून शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. इथे जमिनीत सेंद्रिय कर्ब आधीच कमी आहे. अशा स्थितीत नायट्रोजन पूर्णपणे टाळणे म्हणजे पिकांना उपाशी ठेवण्यासारखे आहे. पिकाच्या अवस्थेनुसार, हवामान लक्षात घेऊन आणि इतर अन्नद्रव्यांबरोबर संतुलित पद्धतीने नायट्रोजन दिल्यास भाजीपाला, फळपिके आणि मुख्य पिकांमधील मोठे नुकसान टाळता येऊ शकते. आज गरज आहे ती शेतकऱ्यांना घाबरवण्याची नाही, तर त्यांना शास्त्रीय आणि व्यावहारिक दोन्ही समज देण्याची. नायट्रोजन शत्रू नाही, अति वापर शत्रू आहे; पण त्याचबरोबर चुकीच्या वेळेला किंवा अनुपलब्धतेमुळे नायट्रोजन न मिळणे हेही तितकेच घातक आहे. नायट्रोजन पूर्णपणे बंद करणे हा उपाय नाही; संतुलित, वेळेवर आणि उपलब्धतेसह अन्नपुरवठा हाच खरा उपाय आहे. शेतीमध्ये, माणसाच्या जीवनात आणि मातीमध्येही अति घातक आहे, पण अभाव त्याहून अधिक घातक ठरतो.
म्हणूनच शेवटी सत्य एकच आहे- अती नको, पण मातीला उपाशीही ठेवू नका. नाहीतर तुमची माती होईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!