krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Dependence on fertilizers : आत्मनिर्भर भारत अन् खतांचे वाढते परावलंबित्व

1 min read

Dependence on fertilizers : केंद्र सरकार आत्मनिर्भरतेचे ढाेल ज्या वेगाने बढवित आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने भारताचे रासायनिक खतांचे (Fertilizers) परावंबित्व (Dependence) वाढत आहे. देशात रासायनिक खतांच्या वापरासाेबतच विक्रीत माेठी वाढ हाेत असून, उत्पादन मात्र घटत आहे. त्यामुळे खतांची ही तूट आयात (Import) करून भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्षभरात युरियाची आयात दुप्पट झाली असून, डीएपीची आयात 5.44 टक्के तर एनपी आणि एनपीके कॉम्प्लेक्स (NPK complex) खतांची आयात 98.7 टक्क्यांनी वाढली असल्याने आत्मनिर्भर भारताचे रासायनिक खतांच्या आयातीवरील अवलंबित्व वाढत आहे, असे फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय – FAI – Fertilizer Association of India) ने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

♻️ युरिया – वापर, उत्पादन व आयात
एप्रिल-नोव्हेंबर 2025 दरम्यानच्या काळात देशात युरियाची विक्री 2.3 टक्क्यांनी वाढून ती 254 लाख टनांवर पाेहाेचली. दुसरीकडे, देशात युरिया उत्पादन 3.7 टक्क्यांनी घटून ते 197 लाख टनांवर आले. वापर आणि उत्पादनातील ही तफावत भरून काढण्यासाठी युरिया आयात दुप्पट करण्यात आली म्हणजेच या काळात युरियाची आयात ही 717 लाख टनांवर पोहोचली. विशेष म्हणजे, ही वाढ 120 टक्के आहे. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल-नोव्हेंबर 2024 या काळात युरियाची आयात 326 लाख टन होती. युरियाची 27 टक्के गरज ही आयातीद्वारे पूर्ण केली जात आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये युरियाची विक्री 375 लाख टन होती. यात आधीच्या वर्षीच्या तुलनेत 4.8 टक्के वाढ आहे. या कालावधीत युरियाची आयात 68.4 टक्क्यांनी वाढून 131 लाख टन झाली. परिणामी, खरीप आणि रब्बी हंगामात युरियाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व वाढले आहे.

♻️ डीएपीचे उत्पादन घटले, आयात वाढली
एफएआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2025 या आठ महिन्यांच्या काळात प्रमुख खत असलेल्या डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी – DAP – Di-ammonium phosphate) ची विक्री 712 लाख टन होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमी आहे. या कालावधीत, देशांतर्गत डीएपीचे उत्पादन 5.2 टक्क्यांनी घटून 268 लाख टन झाले, तर आयात 5.44 टक्क्यांनी वाढून 554 लाख टन करण्यात आली. परिणामी, एकूण डीएपी उपलब्धतेमध्ये आयातीचा वाटा सुमारे 67 टक्क्यांनी वाढला, जो गेल्या वर्षी 56 टक्क्यांवरून वाढला होता.

♻️ कॉम्प्लेक्स खतांच्या उत्पादनात वाढ
एप्रिल-नोव्हेंबर 2025 या काळात एनपी (NP – Nitrogen, Phosphorus) आणि एनपीके (NPK – Nitrogen, Phosphorus, Potash) कॉम्प्लेक्स खतांची विक्री 0.1 टक्क्यांनी वाढून 103.8 लाख टनांवर पोहोचली. देशात या संतुलित खतांचे उत्पादन 13.8 टक्क्यांनी वाढून ते 81.5 लाख टनांवर पाेहाेचले. दुसरीकडे, या खतांची आयात जवळजवळ दुप्पट होऊन 27.2 लाख टनांवर पोहोचली. ही वाढ 98.7 टक्के एवढी नाेंदविली गेली.

♻️ एमओपी आणि एसएसपीची विक्री वाढली
या कालावधीत म्युरेट ऑफ पोटॅश (MOP – Muriate of Potash) ची विक्री 8.6 टक्क्यांनी वाढून 15.5 लाख टन झाली. या काळात एमओपीची मागणी स्थिर असून, आयात मात्र काही प्रमाणात घटली आहे. मध्यंतरी एमओपीला पर्याय म्हणून पीडीएम (PDM – Potash Derived from Molasses) बाजारात माेठ्या प्रमाणात आले आहे. पीडीएमच्या वापरामुळे एमओपीचा वापर कमी हाेऊन आयात काही प्रमाणात घटली आहे.

♻️ एसएसपीचे उत्पादन
फॉस्फेटिक खत (Phosphatic fertilizer) असलेल्या सिंगल सुपर फॉस्फेट (SSP – Single Super Phosphate) चे उत्पादन देशात 9.5 टक्क्यांनी वाढून ते 39.7 लाख टन झाले तर, विक्री 15 टक्क्यांनी वाढून 41.6 लाख टनांवर पाेहाेचली. डीएपीच्या उपलब्धतेच्या समस्येमुळे त्याला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटच्या विक्रीत वाढ झाल्याचे मानले जाते.

♻️ एफएआय खत डेटा एप्रिल–नोव्हेंबर 2025 विरुद्ध 2024
खत – उत्पादन (% बदल) – आयात (% बदल) – विक्री (% बदल)
🔆 युरिया :- – 3.7% (19.75 टन) – +120.3% (7.17 टन) – +2.3% (25.40 टन)
🔆 डीएपी :- -5.2% (2.68 टन) – +54.4% (5.54 टन) – -1.0% (7.12 टन)
🔆 एमओपी :- —– -25.0% (1.95 टन) – +8.6% (1.55 टन)
🔆 एनपी/एनपीके :- +13.8% (8.15 टन) – +98.7% (2.72 टन) – +0.1% (10.38 टन)
🔆 एसएसपी :- +9.5% (3.97 टन) – —- +15.0% (4.16 टन)

♻️ खतांचा वापर कमी करण्याचा सल्ला
भारतात युरिया आणि डीएपीचे उत्पादन घटत असल्ल्याचे तसेच गरज पूर्ण करण्यासाठी आयात वाढत असल्याने देशाचे खतांवरील अवलंबित्व वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट हाेते. देशातील अन्न सुरक्षा आणि सरकारच्या आत्मनिर्भरतेसाठी ही चांगली परिस्थिती नाही. रासायनिक खतांची आयात आणि अवलंबित्व कमी करण्यासाठी या खतांचा वापर कमी करण्याचा सल्ला सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना वारंवार दिला जात आहे. मात्र, हा सल्ला देताना पिकांचे पाेषण आणि उत्पादन कुणीही विचारात घेत नाही. एप्रिल-नोव्हेंबर 2025 या काळातील रासायनिक खतांचे उत्पादन, वापर, मागणी व आयातीची आकडेवारी खतांची एक परिपक्व पुरवठा साखळी दर्शवते. देशातील या खतांचे उत्पादन आणि आयात एकमेकांना पूरक असल्याचे प्रतित हाेते. या काळात युरियाची आयात 120 टक्क्यांहून अधिक, डीएपीची आयात 54 टक्क्यांनी आणि जटिल खत आयात जवळपास 99 टक्क्यांनी वाढली. यावरून भारताच्या खत क्षेत्राने जागतिक पुरवठा साखळ्यांना त्यांच्या मुख्य योजनेत समाविष्ट केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!