krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sick cities, indebted farmers : आजारी शहर अन् कर्जबाजारी शेतकरी

1 min read

Sick cities, indebted farmers : एखाद्या शहरात (City) सकाळी लवकर फेरफटका मारला तर, दोन दृश्ये हमखास दिसतात. एकीकडे भाजी बाजारात ताज्या भाज्यांचे (Vegetables) ढीग लागलेले असतात. लाेकं टोमॅटो, कांदा, पालेभाज्या, फळे यांची निवड करतात, भाव करतात, पिशव्या भरतात. फारसा ताण नसतो. दुसरीकडे, थोड्याच अंतरावर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलसमोर (Hospital) नजर टाकली तर, वेगळंच चित्र दिसतं. रांगा, गर्दी, चेहऱ्यावर चिंता, हातात फाईली, कुणी औषधांच्या पावत्या मोजत असतं, कुणी डॉक्टरांची वाट पाहत असतं. इथे भाव करायला जागा नसते. जे सांगितलं जातं, ते द्यावंच लागतं. या दोन दृश्यांमध्येच आजच्या समाजाचं खरं वास्तव लपलेलं आहे.

शहरांमध्ये किराणा मालाचे दुकान लवकर दिसत नाही, पण कुठेही नजर टाका मेडिकल स्टाेर्स मात्र पावला पावलावर आहेत. अन्न स्वस्त झालं आहे, पण आरोग्य प्रचंड महाग झालं आहे. खाण्यापिण्यावर जितका कमी विचार केला जातो, त्याच्या कितीतरी पटीने जास्त विचार आज औषधांवर करावा लागतो. शहरात राहणारा माणूस महिन्याभराचं घरखर्चाचं बजेट सहज सांभाळतो, पण एखादं आजारपण आलं की, आयुष्यभराची जमवाजमव एका झटक्यात संपते.

हे असं का घडलं? कारण आपण अन्नाकडे फक्त ‘पोट भरण्याचं साधन’ म्हणून पाहायला सुरुवात केली. पोषण, ताकद, प्रतिकारशक्ती – हे शब्द जणू पुस्तकातच राहिले. झटपट अन्न, चमचमीत चवी, प्रक्रिया केलेले पदार्थ यामुळे पोट भरतं, पण शरीर घडत नाही. मग शरीर कमजोर झालं की डॉक्टर, दवाखाने, तपासण्या आणि औषधं – हा प्रवास सुरू होतो. अन्नावर बचत केली जाते आणि त्याची किंमत आरोग्यावर द्यावी लागते.

आता हाच आरसा जर आपण ग्रामीण भागात, शेतकऱ्यांच्या आयुष्यात धरून पाहिला तर, चित्र उलटं दिसतं. शेतकरी अन्न पिकवतो. तो स्वतःसाठी आणि समाजासाठी अन्न निर्माण करतो. पण त्याच शेतात आज तो काय करतो? पिकाच्या मुळाशी पोषण देण्याऐवजी, वरवरच्या उपायांवर भर देतो. पाणी नीट पोहोचावं म्हणून ड्रिप, ओल टिकावी म्हणून मल्चिंग, कीड आली की कीटकनाशक, डाग दिसला की बुरशीनाशक, वाढ कमी वाटली की टॉनिक – असा खर्चाचा ओघ सुरूच असतो.

एक छोटंसं उदाहरण घ्या. एखादा शेतकरी म्हणतो, ‘यंदा खूप औषधं मारली, तरी रोग थांबत नाही.’ त्याच्याशी दोन मिनिटं बोललं, तर कळतं की जमिनीत सेंद्रिय पदार्थ जवळजवळ नाहीत. माती कडक झाली आहे, मातीतला जिवंतपणा हरवला आहे. अशा जमिनीत पिक जसं कुपोषित मूल असतं, तसं वाढतं. मग ते किडींना आणि रोगांना का बळी पडणार नाही? अशा वेळी औषध म्हणजे वेदनाशामक गोळी – क्षणिक आराम, पण आजार तसाच.

शहरात जसा माणूस आज शिकतो आहे की ‘आजार होण्याआधीच काळजी घ्यायला हवी’, तसाच धडा शेतीतही तितकाच लागू होतो. माती ही पिकाची आई आहे. आईचं आरोग्य बिघडलं, तर लेकरं कशी तग धरतील? पण आपण मातीच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो? फारच कमी. कारण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. खत टाकलं, फवारणी केली, तर दोन दिवसांत हिरवळ दिसते. पण सेंद्रिय पदार्थ वाढवले, माती जिवंत केली, तर त्याचा फायदा हळूहळू, पण टिकाऊ मिळतो. आपल्याला मात्र घाई असते.

एखाद्या अनुभवी शेतकऱ्याचं बोलणं ऐकलं की लक्षात येतं. तो सांगतो, ‘पूर्वी एवढी औषधं नव्हती, तरी पिकं टिकायची.’ कारण तेव्हा जमिनीत शेणखत होतं, पिकांची फेरपालट होती, मातीला विश्रांती होती. आज उत्पादन वाढवण्याच्या नादात आपण जमिनीला मशीनसारखं वापरतो आहोत. इंधन टाकलं की काम केलं पाहिजे, असा आग्रह धरतो आहोत. पण जमीन मशीन नाही; ती सजीव आहे. तिचं पोट भरलं नाही, तर ती आपल्याला फसवणार नाही, पण साथ देणं थांबवेल.

मजेशीर गोष्ट अशी की, शहरातला माणूस आज ‘ऑरगॅनिक’, ‘नैसर्गिक’, ‘पोषक’ अन्न शोधतो आहे आणि त्यासाठी जास्त पैसे द्यायलाही तयार आहे. आणि तो अन्न तयार करणारा शेतकरी मात्र स्वतःच्या शेतात रसायनांचा मारा करून पिकवलेलं अन्न खातो आहे. हे विरोधाभासाचं चित्र नाही का? एकीकडे आरोग्य टिकवण्यासाठी महाग अन्न, दुसरीकडे उत्पादन टिकवण्यासाठी महाग औषधं.

खरं तर शेतकऱ्याने जर पिकाच्या पोषणावर थोडा जास्त, पण शहाणपणाचा खर्च केला तर, अनेक गोष्टी आपोआप सुलभ होतात. मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढला की, पाणी धरून ठेवण्याची ताकद वाढते. मुळं खोल जातात. पिक ताकदवान होतं. ताकदवान पिकावर कीड कमी बसते. रोग आला तरी तो आटोक्यात येतो. मग औषधं कमी लागतात. म्हणजेच खर्च एका ठिकाणी वाढतो, पण दुसऱ्या अनेक ठिकाणी कमी होतो.

हा विचार मात्र आपल्याला अजून पटलेला नाही. कारण आपणही शहरासारखेच आहोत. आजचा फायदा दिसला पाहिजे, उद्याचा विचार नको. पण शेती ही उद्याची कला आहे. आज जमिनीसाठी केलेला चांगला खर्च पुढच्या अनेक हंगामात परतावा देतो. जसं मानसाने रोज सकस आहार घेतला तर, त्याला दवाखान्याची पायरी कमी चढावी लागते, तसंच. हा लेख कुणाला दोष देण्यासाठी नाही. हा आरसा दाखवण्यासाठी आहे. शहरात अन्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे औषध महाग झालं. शेतात पोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेती महाग झाली. दोन्ही ठिकाणी मुळातली चूक एकच. प्रतिबंधापेक्षा उपचारांवर भर.

आज शेतकऱ्याने थांबून विचार करायला हवा. आपण खरंच कुठे खर्च करतो आहोत? पिकाच्या आरोग्यावर की पिकाच्या आजारावर? माती जिवंत करण्यावर की किड मारण्यावर? कारण शेवटी शेतीतही तोच न्याय लागू होतो. शहाणपणाचा खर्च कमी वाटतो, पण मूर्खपणाची बचत फार महागात पडते. जर हा विचार मनात रुजला, तर शेतीत औषधांची रांग कमी होईल आणि मातीचा श्वास मोकळा होईल. कदाचित, तेव्हा शहरातल्या हॉस्पिटलसमोरची गर्दीही हळूहळू कमी होईल. कारण सगळ्याची सुरुवात शेवटी शेतातूनच होते. अन्नातून, पोषणातून, मातीतून. हे सगळं मांडताना एक गोष्ट ठामपणे सांगितली पाहिजे. शेतकरी अज्ञानी नाही, अशिक्षित नाही. तो परिस्थितीचा बळी आहे. बदलत्या हवामानाचा मारा, बाजारातील अनिश्चितता, योग्य भावाचा अभाव आणि वाढता खर्च, या सगळ्यांच्या कात्रीत तो अडकलेला आहे. त्यातच वेगवेगळ्या कंपन्यांच्या आकर्षक जाहिराती, ‘चमत्कारी’ उत्पादनांची स्वप्नं आणि झटपट उत्पन्नाचे आमिष, यामुळे तो चुकीच्या वाटेवर ढकलला जातो आहे. हा हव्यास शेतकऱ्याचा नसून, त्याच्यावर लादलेला आहे. न परवडणारा खर्च, वेळेवर न मिळणारा सल्ला आणि शेवटी पदरात पडणारी निराशा, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

म्हणूनच दोष शेतकऱ्यावर ढकलून चालणार नाही. योग्य विज्ञान, प्रामाणिक मार्गदर्शन आणि संवेदनशील शासन व्यवस्था, यांची आज नितांत गरज आहे. शेतकऱ्याला काय फवारायचं यापेक्षा कधी, का आणि किती टाकायचं नाही हे सांगणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. मातीच्या आरोग्यावर आधारित, शेतकऱ्याला परवडेल अशी शेती, कमी खर्चाची पण टिकाऊ धोरणे, ही काळाची गरज आहे. कारण शेती जर परवडली नाही, तर अन्न स्वस्त राहणार नाही. आणि अन्न जर आरोग्यदायी नसेल, तर शहरातील दवाखाने आणखी भरतील. शेवटी शहराचं आरोग्य आणि शेतकऱ्याचं भवितव्य, दोन्हींची मुळं एकाच ठिकाणी आहेत, त्या मातीमध्ये.
आपल्याला काय वाटतं नक्की कळवा!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!