Agricultural produce Organic or Chemical : हातात भाजी, डोक्यात प्रश्न : सेंद्रिय की रासायनिक?
1 min read
Agricultural produce Organic or Chemical : आरोग्याबाबतची जागरूकता वाढत असल्याने सेंद्रिय शेतमालाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सेंद्रिय (Organic) शेतमालाची (Agricultural produce) मागणी वाढत आहे. यातून बाजारात सेंद्रिय, नैसर्गिक (Natural), रसायनमुक्त (Chemical free) असे शब्दप्रयाेग असलेले फलक व लेबल देखील बघायला मिळतात. या भावनिक शब्दांआड लपलेले सत्य मात्र सामान्य ग्राहकाला सहज कळत नाही. भाजीपाला (Vegetables) अथवा धान्य (Grain) दिसायला ताजे, टवटवीत, हिरवेगार वाटत असले तरी हा शेतमाल सेंद्रिय असताेच, असे नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक हाेण्याची दाट शक्यता असते. प्रत्यक्षात सेंद्रिय व रासायनिक शेतमालामधील फरक ओळखणे ग्राहकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. केवळ नावावर किंवा विक्रेत्यांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकाेनातून चाैकसपणे तपासणी करणे गरजेचे आहे. मग खरा सेंद्रिय शेतमाल ओळखायचा कसा?
♻️ सेंद्रिय शेती म्हणजे काय?
🔆 सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनासाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर न करता अन्नद्रव्ये व्यवस्थापनात शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, हिरवळीची खते (ग्रीन मॅन्युअर) आणि इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जाताे.
🔆 या पिकांच्या आजुबाजूच्या नैसर्गिक संसाधनांचा (जैविक चक्र, जैवविविधता) वापर करून शेताचे संतुलन राखावे लागत असल्याने या पिकांची वाढ व उत्पादन हे मातीचे आराेग्य व हवामानाची अनुकूलता यावर अवलंबून असते.
🔆 पिकांवरील कीड व राेगाच्या व्यवस्थापनात कीटकनाशके व बुरशीनाशकांचा तसेच तणाच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जात नाही. या रासायनिक घटकांऐवजी पक्षी, मधमाशा, उपयुक्त व मित्र किडींसह जैविक घटकांच्या वापरावर भर दिला जाताे.
🔆 मातीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी एकाच जागी वारंवार एकच पीक न घेत पीकपालट केले जाते.
♻️ उत्पादकता व दर
काेणत्याही पिकांच्या परिपूर्ण संगाेपनासाठी त्यांना विशिष्ट प्रमाणामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या मुख्य कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर या दुय्यम आणि आर्यन, झिंक, बोरॉन, मँगनीज, काॅपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन व निकेल या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाेबत कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. सेंद्रिय व जैविक घटकांमध्ये पिकांना आवश्यक असलेले घटत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतातच असेही नाही. मातीत यातील कुठलाही घटक कमी-अधिक प्रमाणात असल्यास उत्पादन घटते. त्यामुळे सेंद्रिय पिकांची उत्पादकता मुळात कमी असल्याने उत्पादन कमी हाेते. कमी उत्पादनामुळे बाजारात त्या शेतमालाचा पुरवठा कमी असताे आणि मागणी भरीव असल्याने त्यांचे दर अधिक असतात.
♻️ पोषणमूल्यातील फरक
सेंद्रिय आणि रासायनिक पिकांमधील मूलभूत घटक सारखेच असतात, पण सेंद्रिय पिकांमध्ये त्यांचे प्रमाण, गुणवत्ता व जैवउपलब्धता जास्त चांगली असते. रासायनिक शेतमालाच्या तुलनेत सेंद्रिय शेतमालात जीवनसत्त्वे (Vitamins), कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह (Iron), झिंक, फॉस्फरस ही खनिजे (Minerals), प्रथिने (Protein), अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आढळून येतात. विषारी घटक (Pesticide Residue) नगण्य असतात.
♻️ या बाबी तपासून घ्या
ग्राहकांनी काेणताही सेंद्रिय शेतमाल खरेदी करण्यापूर्वी त्याला नॅशनल प्राेग्राम फाॅर ऑरगॅनिक प्राॅडक्शन (NPOP – National Programme for Organic Production) किंवा पार्टीसिपटाेरी गॅरंटी सिस्टिम (PGS – Participatory Guarantee System) चे प्रमाणपत्र आहे का? त्यावर या दाेन्हीपैकी एका संस्थेचा लाेगाे, क्रमांक आहे का? ते तपासून बघावे. त्या शेतमालावर उत्पादकाचे नाव, पत्ता, त्याला सेेंद्रियतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचे नाव व पत्ता तपासून बघा. लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्रमाणपत्र देणारी संस्था, नाेंदणी व प्रमाणपत्र क्रमांक नमूद आहे की नाही, ते तपासून बघा.
♻️ सेंद्रिय शेतमाल ओळखायचा कसा?
🔆 सेंद्रिय भाजीपाला व फळांचा आकार एकसारखा नसताे, ताे लहान-माेठा असताे.
🔆 रंग नैसर्गिक असताे पण चमकदार नसतो.
🔆 या शेतमालाचा गंध नैसर्गिक व थाेडा जास्त तीव्र असतो.
🔆 चव अधिक चविष्ट व नैसर्गिक असते.
🔆 या शेतमालावर मातीचे अवशेष असू शकतात.
🔆 तुलनेत रासायनिक घटकांचा वापर केलेल्या शेतमालाचा आकार व रंग एकसारखा, चमकदार व देखणा असताे.
🔆 सेंद्रिय भाजीपाला व फळे जास्त वेळ ताजी राहतात. त्यांच्यावर रसायनांचा लेप नसल्याने त्या पाण्यात जास्त वेळ विरघळत नाहीत.
🔆 सेंद्रिय पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात नसल्याने हा शेतमाल थाेडी कीड लागला किंवा त्यावर डाग असलेला दिसू शकताे.
🔆 विक्रेत्याला ताे ज्या शेतकऱ्याकडून सेंद्रिय शेतमाल खरेदी करताे, ताे शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी काेणत्या कृषी निविष्ठांचा (खते, कीटकनाशके, तणनाशक) वापर करताे, याची तसेच त्याच्या शेती करण्याच्या पद्धतीसह शेतमाल सेंद्रिय प्रमाणपत्राची विचारणा करा.
🔆 जर तो शेतकरी खरोखर सेंद्रिय शेती करत असेल, तर तो त्याची पद्धती, खते, बियाणे आणि प्रमाणपत्र बाबत स्पष्ट माहिती देऊ शकेल.
🔆 ऑनलाइन खरेदी करत असाल, तर त्या ब्रँडचे वेबसाइटवरील प्रमाणपत्र आणि उत्पादनाची माहिती तपासा.
🔆 उत्पादनांवर नैसर्गिक किंवा हर्बल असे लेबल असले तरी ते नेहमीच सेंद्रिय असतात असे नाही. बहुतांश उत्पादनांवरील लेबल खूप छाेटे व अस्पष्ट असतात. लेबलवर प्रमाणपत्र क्रमांक नसेल किंवा तो तपासला जात नसेल तर फसवणूक हाेऊ शकते.
🔆 सेंद्रिय शेतमाल विश्वासार्ह दुकाने किंवा शेतकऱ्यांकडून खरेदी करा. फक्त बाह्य लक्षणांवर अवलंबून न राहता, प्रमाणपत्रावर भर द्यावा.
♻️ प्रमणपत्र तपासून बघा
🔆 सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणपत्र तपासताना भारतातील अधिकृत राष्ट्रीय प्रमाणन योजना (NPOP – National Programme for Organic Production) आणि PGS-India (Participatory Guarantee System) या दोन मुख्य प्रमाणपत्रांची खात्री करावी.
🔆 भारतातील मुख्य सेंद्रिय प्रमाणपत्रे NPOP द्वारे केंद्र सरकारच्या APEDA अंतर्गत असलेले राष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणन आहे.
🔆 PGS-India हे लहान शेतकऱ्यांसाठी असलेले सहभागी प्रमाणन प्रणाली आहे, ज्यामध्ये शेतकरी गटांच्या माध्यमातून प्रमाणीकरण होते.
🔆 या प्रमाणपत्रावर किंवा पॅकेटवर NPOP किंवा PGS-India असे लिहिलेले असले पाहिजे. या संस्थांचा अधिकृत लाेगाे असायला हवा.
🔆 उत्पादन कोणत्या अधिकृत प्रमाणन संस्थेने (Certification Body) प्रमाणित केले आहे, त्या प्रमाणन एजन्सीचे नाव आणि लोगो असयला हवा.
🔆 प्रत्येक उत्पादनासाठी एक विशिष्ट प्रमाणपत्र क्रमांक (Certificate Number) दिला जाताे. हा क्रमांक तपासून बघावा.
🔆 लेबल किंवा पॅकेटवर सेंद्रिय किंवा Organic असे स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजे.
🔆 एकाच प्रमाणपत्राखाली अनेक शेतकऱ्यांचा माल विकला जात असेल, तर त्याची तपासणी करावी.
🔆 अतिशय कमी किंमतीत सेंद्रिय उत्पादन विकले जात असेल, तर त्याच्या प्रमाणपत्राची खात्री घ्यावी.
🔆 जर उत्पादन 100 टक्के सेंद्रिय असेल, तर ते लिहिलेले असावे. जर फक्त एक भाग सेंद्रिय असेल, तर त्याची स्पष्ट माहिती असावी.
🔆 जर शंका असेल तर प्रमाणन एजन्सीचा संपर्क करून प्रमाणपत्र क्रमांक वरून त्याची खात्री करता येते.
🔆 फक्त सेंद्रिय असे लिहिलेले असेल, पण NPOP/PGS लोगो किंवा प्रमाणपत्र क्रमांक नसल्यास ते खरे सेंद्रिय उत्पादन असेलच, असे नाही.
©️ मातीतलं विज्ञान