Nutritional Journey of crops : थंडीत पिकांची मुळांपासून पानापर्यंतची उबदार पोषणयात्रा
1 min read
Nutritional Journey of crops : शेतकरी बांधवांनो, थंडीच्या (Cold) दिवसांत पिकांची (Crops) वाढ खुंटल्यासारखी दिसते. पाने फिकी, फुलं कमी, फळे लहान आणि गुणवत्ता ढासळलेली. पण हे सगळं फक्त वरवरचं दिसणारं आहे. खरा प्रश्न मातीत दडलेला आहे. जिथे पिकांची जीवनयात्रा (Journey of crops) सुरू होते, जिथे मुळे श्वास घेतात, अन्न शोधतात आणि थंडीशी झुंज देतात. प्राणी थंडीत आपलं शरीर गरम ठेवण्यासाठी कपडे घालतात, गरम अन्न खातात. पण वनस्पतींकडे अशी सोय नसते. त्यांची संपूर्ण क्रिया मातीच्या तापमानावर अवलंबून असते. जेव्हा माती 18 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी होते, तेव्हा मुळांची हालचाल मंदावते, अन्नशोषणाची क्षमता घसरते आणि मुळंच जर निकामी झाली, तर वरच्या भागाला पोषण कोण देणार?
थंडीत मुळांची वाढ थांबते, शाखा कमी फुटतात, जमिनीत पसरण्याची गती कमी होते. अशा वेळी आपण जमिनीत खतं टाकली तरी ती मुळांपर्यंत पोहोचत नाहीत. जसं चुलीवर भांडं न चढलं तर अन्न पक्कं होत नाही, तसंच मुळं सक्रिय नसतील तर खतं व्यर्थ जातात. वनस्पतींचं पोषण मुळांमार्फत येतं. थंडीत पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, म्हणून मातीतील पोषकद्रव्ये वर येऊ शकत नाहीत. नायट्रोजन (Nitrogen), कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium) यासारखी आवश्यक तत्त्वं पिकापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे फक्त खतांचा डोस वाढवल्याने काही फायदा होत नाही, उलट पिकावर ताण येतो.
फॉस्फरस (Phosphorus) आणि पोटॅशियम (Potassium)सारखी महत्त्वाची द्रव्ये थंडीत मातीत ‘गोठून’ जातात. त्यांची हालचाल इतकी मंदावते की मुळांना ती सहज मिळत नाहीत. यामुळे फुलांची संख्या कमी होते, फळधारणा अपुऱ्या राहते आणि पिकाची वाढ खुंटते. मातीतील सूक्ष्मजीव हे पिकांचे ‘अदृश्य सेवक’ असतात. ते खतं विघटित करून पोषकद्रव्ये मोकळी करतात, माती भुसभुशीत ठेवतात. पण थंडीत हे जीवाणू झोपी जातात. त्यामुळे सेंद्रिय खतं विघटन पावत नाही, नत्र (Nitrogen), सल्फर (Sulfur), कॅल्शियम (Calcium) अडकून राहतात. पिकांची मुळं मातीत कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) सोडतात, जे पाण्यात मिसळून एक हलकं आम्ल (Acid) तयार करतं. हे आम्ल लोह (Iron), झिंक (Zinc), मँगनीज (Manganese)सारखी सूक्ष्मद्रव्ये मोकळी करतं. थंडीत मुळं कमी श्वास घेतात, म्हणून ही प्रक्रिया मंदावते आणि पिकांमध्ये पिवळेपणा, कडांचं जळण, वाढीची समस्या दिसतात.
🔲 थंडीत पिकांची काळजी कशी घ्याल?
📍 माती गरम ठेवा
मल्चिंगचा वापर करा. पाचट, गवत, ऊसाची काडी, प्लास्टिक मल्च यांनी जमीन झाकल्यास मुळांचं तापमान 2-3 सेल्सियस वाढते, पोषणशोषण सुधारतं.
📍 हलकं पण वारंवार पोषण द्या
थंडीत पिकांना जड खतांऐवजी द्रवरूप, सहज शोषणीय पोषकद्रव्ये द्या. छोट्या मात्रा, वारंवार असे नियम ठेवा.
📍 पानावरील पोषण वापरा
पानांवर स्प्रे करून कॅल्शियम, पोटॅशियम, बोराॅन, अमिनो ॲसिड दिल्यास पिकाला त्वरित उर्जा मिळते.
📍 थंडीपूर्व तयारी
थंडी सुरू होण्यापूर्वीच पिकांना कॅल्शियम, बोरोन, पोटॅशियमसारखी द्रव्ये द्या. ही ‘उबदार रजई’ त्यांना थंडी सहन करण्यास मदत करते.
थंडीत पिकांना जबरदस्तीनं खाऊ घालण्याची गरज नसते. त्यांना सहज पचनीय, संतुलित आहार द्या, माती गरम ठेवा आणि पोषणाचा प्रवाह न थांबेल याची काळजी घ्या. थंडी हा अडथळा नसून, गुणवत्तापूर्ण पीक घेण्याची संधी आहे, हे लक्षात ठेवा.
🌱 आपल्या शेतातल्या प्रत्येक पिकाला थंडीतही हिरवेगार आणि सुफलित करूया!