Cotton productivity : कापसाच्या उत्पादकतेला सरकारचाच काेलदांडा
1 min read
Cotton productivity : सीसीआयने (CCI – Cotton Corporation of India) यावर्षी संपूर्ण देशभर जिल्हानिहाय कापूस (Cotton) खरेदी मर्यादा अट घातली आहे. यासाठी त्यांनी कापूस उत्पादक राज्यांमधील सरकारकडून त्यांच्या राज्यांमधील सन 2024-25 च्या हंगामातील कापसाच्या प्रतिएकर उत्पादकतेची (Productivity) आकडेवारी मागितली हाेती. यात महाराष्ट्रातील कापसाची उत्पादकता कमी दाखविण्याचा प्रताप राज्याच्या कृषी विभागातील (Department of Agriculture) सांख्यकी विभागाने (Department of Statistics) केला. त्या अहवालाच्या आधारे केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाने सीसीआयला ही अट घालण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस सीसीआयला कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक विकावा, अशी अप्रत्यक्ष व्यवस्थाही सरकारने केली आहे.
♻️ कमी उत्पादकतेला जबाबदार काेण?
महाराष्ट्रातील कृषी विभागाने चालू हंगामातील कापसाची उत्पादकता ही प्रतिहेक्टर 12.80 क्विंटल ग्राह्य धरली व तसा अहवाल पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाला पाठविला. सीसीआयने ही उत्पादकता 13.57 क्विंटल प्रतिहेक्टर ग्राह्य धरून जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा जाहीर केली. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मते महाराष्ट्रातील कापसाची उत्पादकता ही 13 ते 20 क्विंटल प्रतिहेक्टर असून, वास्तवात शेतकरी 25 ते 45 क्विंटल प्रतिहेक्टर कापसाचे उत्पादन घेतात. ही उत्पादकता काढताना कृषी विभागाने कापसातील रुईचे प्रमाण 35 टक्के, तर सीसीआयने 33 टक्के ग्राह्य धरले आहे. सीसीआयने शेतकऱ्यांकडून प्रतिएकर 2.12 ते 7.69 क्विंटल कापूस खरेदीची अट घातली आहे. यापेक्षा अधिक उत्पादन झाल्यास उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दरात विकून आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
♻️ जिल्हानिहाय कापूस खरेदी अट
जिल्हा – प्रतिएकर कापूस खरेदी
🔆 नाशिक :- 4.544 क्विंटल/प्रतिएकर
🔆 धुळे :- 4.392 क्विंटल/प्रतिएकर
🔆 नंदुरबार :- 4.764 क्विंटल/प्रतिएकर
🔆 जळगाव :- 5.272 क्विंटल/प्रतिएकर
🔆 अहिल्यानगर :- 3.032 क्विंटल/प्रतिएकर
🔆 पुणे :- 5.82 क्विंटल/प्रतिएकर
🔆 साेलापूर :- 2.12 क्विंटल/प्रतिएकर
🔆 सातारा :- 4.668 क्विंटल/प्रतिएकर
🔆 सांगली :- 3.372 क्विंटल/प्रतिएकर
🔆 छत्रपती संभाजीनगर :- 4.448 क्विंटल/प्रतिएकर
🔆 जालना :- 4.848 क्विंटल/प्रतिएकर
🔆 बीड :- 5.456 क्विंटल/प्रतिएकर
🔆 लातूर :- 6.18 क्विंटल/प्रतिएकर
🔆 धाराशिव :- 4.848 क्विंटल/प्रतिएकर
🔆 नांदेड :- 5.212 क्विंटल/प्रतिएकर
🔆 परभणी :- 5.332 क्विंटल/प्रतिएकर
🔆 हिंगाेली :- 5.212 क्विंटल/प्रतिएकर
🔆 बुलढाणा :- 5.332 क्विंटल/प्रतिएकर
🔆 अकाेला :- 5.576 क्विंटल/प्रतिएकर
🔆 वाशिम :- 6.67 क्विंटल/प्रतिएकर
🔆 अमरावती :- 7.696 क्विंटल/प्रतिएकर
🔆 यवतमाळ :- 5.212 क्विंटल/प्रतिएकर
🔆 वर्धा :- 7.116 क्विंटल/प्रतिएकर
🔆 नागपूर :- 6.06 क्विंटल/प्रतिएकर
🔆 भंडारा :- 5.724 क्विंटल/प्रतिएकर
🔆 गाेंदिया :- 5.552 क्विंटल/प्रतिएकर
🔆 चंद्रपूर :- 6.364 क्विंटल/प्रतिएकर
🔆 गडचिराेली :- 5.66 क्विंटल/प्रतिएकर
♻️ जुनीच अट कायम ठेवा
मागील वर्षी (सन 2024-25 मध्ये) सीसीआयची यवतमाळ जिल्ह्याची कापूस खरेदी अट 30 क्विंटल प्रतिहेक्टर म्हणजेच 12 क्विंटल प्रतिएकर हाेती. ही मर्यादा कमी करण्यात आल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ-वाशिमचे खा. संजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या समजावून सांगितली आणि निवेदन दिले. नवीन कापूस खरेदी अट रद्द करून जुनीच अट कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे. खा. संजय देशमुख यांनी याबाबत तातडीने केंद्रीय वस्त्राेद्याेगमंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सीसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नवीन अट कायम ठेवण्याची सूचना केली आहे. ही समस्या साेडविण्यासाठी असाच प्रयाेग प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या खासदारांमार्फत करणे गरजेचे आहे.
♻️ चुकीची आकडेवारी उठली शेतकऱ्यांच्या जिवावर
विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयाेग आणि सांख्यिकी विभागाच्या आकड्यांमध्येच ताळमेळ नसल्याने घाेळ केला आहे. केंद्र व राज्य सरकारचा कृषी विभाग, सीआयसीआर आणि कृषी विद्यापीठांनी जाहीर केलेल्या कापसाच्या उत्पादकतेतही माेठी तफावत आहे. महाराष्ट्रातील कृषी विभाग विविध पिकांची उत्पादकता काढण्यासाठी दरवर्षी प्रति मंडळ 12 याप्रमाणे पीक कापणी प्रयाेग घेतात. प्रत्येक प्रयाेग हा 20.00 x 10.00 मीटर जागेवर घेतला जाताे. कृषी विभाग कापसातील रुईचे प्रमाण 35 टक्के तर सरकीचे प्रमाण 65 टक्के ग्राह्य धरले आहे. सीसीआयने मात्र याच कापसातील रुईचे प्रमाण 33 टक्के आणि सरकीचे प्रमाण 67 ग्राह्य धरले आहे. विशेष म्हणजे, सीसीआयकडे कापसाची उत्पादकता व उत्पादन काढण्यासाठी स्वत:ची शेती अथवा प्रक्षेत्र नाही. ही चुकीची आकडेवारी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे.
♻️ एकाच तालुक्यात भिन्न उत्पादकता
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर सन 2024-25 च्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कापसाच्या पिकाचे एकूण 1,320 पीक कापणी प्रयाेग घेण्यात आले. यात एकाच तालुक्यातील वेगवेगळ्या मंडळातील कापसाची उत्पादकता वेगवेगळी आढळून आली आहे. यवतमाळ तालुक्यातील हिवरी मंडळात रुईची उत्पादकता सर्वांत कमी म्हणजे 397.34 किलाे प्रतिहेक्टर तर येलाबारा मंडळात सर्वाधिक म्हणजे 472.53 किलाे प्रतिहेक्टर आढळून आली. जिल्ह्याची तालुकानिहाय सरासरी उत्पादकता विचारात घेता आर्णी तालुक्याची सर्वांत कमी म्हणजे 286.47 किलाे प्रतिहेक्टर, तर मारेगाव तालुक्याची सर्वाधिक म्हणजे 488.38 किलाे प्रतिहेक्टर तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी रुई उत्पादकता 390.08 किलाे प्रतिहेक्टर काढण्यात आली. एका शेताचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य असे पाच भाग केले आणि त्या पाचही भागातील कापसाची उत्पादकता तपासली तर ती वेगवेगळी आढळून येते. हा प्रकार एकट्या यवतमाळ जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात दिसून येताे. मात्र, याकडे सीसीआय, आयसीएआर-सीआयसीआर, कृषी विद्यापीठे तसेच सरकारचा कृषी व पणन विभागासाेबतच शेतकरी देखील या उत्पादकतेच्या भिन्नतेकडे गांभीर्याने बघत नाही.
♻️ कृषी विभागाच्या सांख्यकी विभागाने केला घाेळ
सन 2024-25 च्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील कापसाच्या रुईची सरासरी उत्पादकता ही 390.08 किलाे प्रतिहेक्टर असल्याने पीक कापणी प्रयाेगात सिद्ध झाल्याने हाच अहवाल कृषी विभागाच्या सांख्यकी विभागाला पाठविण्यात आला. सांख्यकी विभागाने सन 2024-25 ची यवतमाळ जिल्ह्याची जिल्हा पीक कापणी प्रयाेगाच्या संकलन वहीतील नाेंदींचा अभ्यास न करता रुई उत्पादकता 291 किलाे प्रतिहेक्टर असल्याची कागदाेपत्री नाेंद करून तसा अहवाल राज्य सरकारच्या पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाला पाठविला. त्याच चुकीच्या आकड्यांच्या आधारे सीसीआयने यवतमाळ जिल्ह्याची कापूस खरेदी मर्यादा 12 क्विंटल प्रतिएकरवरून 5.212 क्विंटल केली आहे. हा घाेळ राज्यातील 28 कापूस उत्पादक जिल्ह्यांसाेबत देशातील इतर कापूस उत्पादक राज्यांमध्येही दिसून येताे.
♻️ रुईच्या सरासरी उत्पादकता आकड्यांत घाेळ
🔆 केंद्र सरकारचा कृषी विभाग – 338 किलाे प्रतिहेक्टर
🔆 राज्य सरकारचा कृषी विभाग – 396 किलाे प्रतिहेक्टर
🔆 सीआयसीआर, नागपूर – 353 किलाे प्रतिहेक्टर
🔆 व. ना. म. कृषी विद्यापीठ, परभणी – 450 किलाे प्रतिहेक्टर
♻️ कमाल उत्पादकता ग्राह्य धरा
एकाच शेतातील वेगवेगळ्या भागात कापसाची उत्पादकता वेगवेगळी असते. त्यामुळे मंडळ, तालुका, जिल्हा आणि राज्यातील कापूस व रुईच्या उत्पादकतेत बदल हाेताे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सरकारी यंत्रणा पीक उत्पादन व उत्पादकतेचे किमान, कमाल व सरासरी असे तीन प्रकारचे आकडे जाहीर करते. खरेदीच्या वेळी सरकारी यंत्रण मात्र सरासरी आकडा ग्राह्य धरतात. हे चुकीचे असून, यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेत असल्याने कमाल उत्पादक किंवा उत्पादकता ग्राह्य धरायला हवी.