krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton CCI MSP : कापसाच्या ‘एमएसपी’त ‘सीसीआय’चा खाेडा

1 min read

Cotton CCI MSP : सीसीआय (CCI – Cotton Corporation of India) देशभरात कापूस खरेदी करण्यास दिरंगाई करीत आहे. दुसरीकडे, केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाने त्यांना महाराष्ट्रात एकरी 2.12 ते 7.69 क्विंटल कापूस (Cotton) खरेदी (Procurement) करण्याचे आदेश दिले आहेत. ही कापूस खरेदी मर्यादा देशभर जिल्हानिहाय वेगवेगळी आहे. या जाचक अटींबाबत सीसीआयने गाेपनीयता बाळगली असून, या निर्णयाबाबत देशातील सीसीआयचा एकही अधिकारी बाेलायला तयार नसला तरी मध्य प्रदेश व तेलंगणातील दाेन अधिकाऱ्यांनी याला दुजाेरा दिला आहे. वास्तवात, प्रत्येक जिल्हा नव्हे तर गाव व शेतनिहाय कापसाची उत्पादकता (Productivity) आणि प्रतिएकर उत्पादन (Production) वेगवेगळे आहे. सीसीआय शेतकऱ्यांकडून त्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक कापूस खरेदी करणार नाही. त्यामुळे उरलेला कापूस किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP – Minimum Support Price) कमी दराने व्यापाऱ्यांना विकावा लागणार असल्याने देशातील कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल किमान 1,000 ते 1,300 रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी कापूस विकावा, यासाठी केंद्र सरकार अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांवर दडपण निर्माण करीत आहे.

♻️ एमएसपी आणि सध्याचे दर
केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी प्रतिक्विंटल 8,110 रुपये तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी 7,710 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. सरकारने सीसीआयच्या माध्यमातून देशात एकही कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यातच गरजू शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरुवात केली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात कापसाला प्रतिक्विंटल 6,500 ते 7,400 रुपये दर मिळत आहे. देशभरातील कापूस उत्पादकता किमान 8 ते 13 क्विंटल प्रतिएकर आहे. सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा अट विचारात घेता शेतकऱ्यांना त्यांच्याकडील एकरी 5 ते 10 क्विंटल कापूस व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विकावा लागणार असल्याने त्यांना प्रतिक्विंटल 800 ते 1,600 रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

♻️ शेतकऱ्यांचे किमान 400 काेटी रुपयांचे नुकसान
देशभरात 2025-26 च्या खरीप हंगामात 325 ते 340 लाख गाठी म्हणजेच 552.5 ते 578 कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. प्रतिकूल हवामान, राेग व किडींचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे देशभरात कापसाच्या उत्पादनात किमान 20 ते 22 टक्क्यांची घट हाेऊ शकते. सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा विचारात घेता या अटीमुळे शेतकऱ्यांचे किमान 400 काेटी रुपयांचे नुकसान हाेणार आहे. कारण, उर्वरित कापूस शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे.

♻️ सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र
सीसीआयने 2025-26 च्या हंगामासाठी देशात एकूण 550 तर महाराष्ट्रात 159 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक, लातूर व गडचिराेली जिल्ह्यात प्रत्येकी 1, धुळे, नंदूरबार व हिंगाेली जिल्ह्यात प्रत्येकी 4, वाशिम व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 5, अहिल्यानगर व अकाेला जिल्ह्यात प्रत्येकी 6, नांदेड जिल्ह्यात 7, अमरावती जिल्ह्यात 8, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात प्रत्येकी 9, परभणी व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी 10, नागपूर जिल्ह्यात 11, जळगाव जिल्ह्यात 15 आणि यवतमाळ जिल्ह्यात 18 कापूस खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

♻️ सीसीआयचा एमएसपी आर्डर
सीसीआय दरवर्षी त्यांच्या कापूस खरेदीचे एमएसपी ऑर्डर (MSP Order) जाहीर करते. त्यात धाग्याची लांबी व ‘मायक्राेनियर’ (Micronaire) विचारात घेऊन दर जाहीर केले जातात. कापसातील ओलाव्याच्या प्रमाणावर दरकमी अधिक केले जातात. वास्तवात, कापसाची खरेदी करताना सीसीआयचा ग्रेडर धाग्याची लांबी व मायक्राेनियर या दाेन्ही बाबींची तपासणी करीत नाही. कापसातील ओलावा (Moisture) तेवढा तपासला जाताे. कपसातील ओलावा कृत्रिमरित्या कमी करता येत नसल्याने ताे कमी हाेण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना दीड ते दाेन महिने प्रतीक्षा करावी लागते. ढगाळ हवामान, हवेतील आर्द्रता व पाऊस यामुळे कापसातील ओलावा कमी हाेण्याऐवजी वाढताे. याच तांत्रिक बाबीचा वापर करून सीसीआय शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे.

🎯 ओलाव्यानुसार कापसाचे दर
ओलावा (टक्के) – दर (रुपये/क्विंटल)
🔆 08 – 8,100 रुपये/क्विंटल
🔆 09 – 8,019 रुपये/क्विंटल
🔆 10 – 7,938 रुपये/क्विंटल
🔆 11 – 7,857 रुपये/क्विंटल
🔆 12 – 7,776 रुपये/क्विंटल
🔆 टीप – 12 टक्क्यांपेक्षा अधिक ओलावा असलेला कापूस स्वीकारला जाणार नाही.

🎯 धाग्याची लांबी – मायक्राेनियर- सीसीआयचे दर
📍 आखुड धागा (Short staple)
🔆 20 मिमी पेक्षा कमी – 6.8 ते 8.0 – 7,210 रुपये (आसाम काेमिला)
🔆 20 मिमी पेक्षा कमी – 6.8 ते 7.2 – 7,210 रुपये (बंगाल देशी)

📍 मध्यम लांब धागा (Medium staple)
🔆 21.5 ते 22.5 मिमी – 4.5 ते 5.8 – 7,460 रुपये (जयधर)
🔆 21.5 ते 23.5 मिमी – 4.2 ते 6.0 – 7,510 रुपये (व्ही- 797, जी. काॅट, 13/जी. काॅट-21)
🔆 23.5 ते 24.5 मिमी – 3.4 ते 5.5 – 7,560 रुपये (एके/वाय-1 – महाराष्ट्र व मध्य प्रदेश, एमसीयू-7 – तामिळनाडू, एसव्हीपीआर-2 – तामिळनाडू, पीसीओ-2 – आंध्र प्रदेश, कर्नाटक, के-11 – तामिळनाडू)

📍 मध्यम लांब धागा (Medium long staple)
🔆 24.5 ते 25.5 मिमी – 4.0 ते 4.8 – 7,710 रुपये (जे-३४ – राजस्थान)
🔆 26.0 ते 26.5 मिमी – 3.4 ते 4.9 – 7,810 रुपये (एलआरए-5166/केसी-2 – तामिळनाडू)
🔆 26.5 ते 27.0 मिमी – 3.8 ते 4.8 – 7,860 रुपये (एफ-414/एच-777/जे-34 हायब्रीड)

📍 लांब धागा (Long staple)
🔆 27.5 ते 28.5 मिमी – 4.0 ते 4.8 – 8,010 रुपये (एफ-414/एच-777/जे-34 हायब्रीड)
🔆 27.5 ते 28.5 मिमी – 3.5 ते 4.7 – 8,010 रुपये (एच-4/एमईसीएच/आरसी एच-2)
🔆 27.5 ते 29.0 मिमी – 3.6 ते 4.8 – 8,060 रुपये (शंकर-6/शंकर-10)
🔆 29.5 ते 30.5 मिमी – 3.5 ते 4.3 – 8,110 रुपये (बन्नी/ब्रह्मा)

📍 अतिरिक्त लांब धागा (Extra long staples)
🔆 32.5 ते 33.5 मिमी – 3.2 ते 4.3 – 8,310 रुपये (एमसीयू-५/सुरभी)
🔆 34.0 ते 36.0 मिमी – 3.0 ते 3.5 – 8,510 रुपये (डीसीएच-३२)
🔆 37.0 ते 39.0 मिमी – 3.2 ते 3.6 – 9,310 रुपये (सुविन)

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!