Loan distribution to farmers : शेतकऱ्यांना त्वरीत कर्जवाटप करा!
1 min read
Loan distribution to farmers : माननीय श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई
विषय : सर्व थकीत (Derabit) शेतकऱ्यांना त्वरीत कर्जवाटप करण्याचे आदेश सर्व बॅंकांना द्यावेत.
सस्नेह नमस्कार,
आपल्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा काल (गुरुवार, दि. 30 ऑक्टाेबर 2025) करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचे व शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री मा. श्री. बच्चूभाऊ कडू व आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सुल्तानी संकटां (MSP न मिळण्याचे) सोबत यंदा प्रचंड अस्मानी संकट पण आहे. महाराष्ट्र सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केेलेली 31,000 काेटी (एकतीस हजार कोटी)ची मदत ही, दर्या मे खसखस सारखीच आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने बॅंकांचे कर्ज भरले नाही, म्हणून बॅंकांनी त्यांना कर्ज दिले नाही. या थकीत (सर्व नवे न जुने) कर्जदारांनी सावकार व कृषी सेवा केंद्रांकडून कर्ज घेऊन या खरीपाची शेती केली. ती अम्मानी संकटाने पूर्ण नष्ट झाली. विदर्भात मराठवाड्यासारखी अतिवृष्टी नाही तरी उत्पादन नाही. एकरी एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादनही नाही. कापसाची हीच स्थिती आहे. बाजारात MSP पण नाही, मग कर्ज परत कसे करणार?
शेतकऱ्यांवर दुहेरी बोझा आहे. बॅंकांचे थकीत कर्ज व सावकार-कृषी सेवा केंद्रांचा बोझा. त्यामुळेच त्यांना आजच दिलासा हवा आहे. हा दिलासा कर्जमाफीतून मिळाला असता यात शंकाच नाही. परंतू, आता आपण 30 जून 2026 पर्यंत ती पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर मला आपणास एक विनंती करायची आहे, आपण गंभीरपणे विचार करावा.
(1) महाराष्ट्र सरकारने राज्यात दुष्काळासारखी स्थिती आहे, हे जाहीर केले आहे. बॅंकांची कर्ज वसुली थांबविली आहे. दुष्काळाचे सर्व नियम लागू करण्याची पण घोषणा यापूर्वीच जाहीर झाली आहे. दुष्काळ जाहीर होतो, तेव्हा कर्ज वसुली थांबते, ती आपण थांबवलेली आहे.
(2) जुन्या कर्जाचे हप्ते पाडून नवीन कर्ज देण्यात येते. मला आपणास व सर्व शेतकरी नेत्यांना विनंती करायची आहे, सर्व थकीत कर्जदारांना त्वरित नवीन कर्ज देण्याचे आदेश बॅंकांना दिले तर त्यांना आजच प्राणवायू मिळेल, जाेत्यांना हवा आहे. 30 जून 2026 पर्यंत आपण (सरकार) त्यांचे कर्ज भरणारच आहात. म्हणजेच त्यानंतर त्यांच्यावर फक्त नवीन कर्जाचाच बोझा राहील व आपण नेमलेली श्री प्रवीण परदेशीजींची समिती त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा मार्ग सुचवेल.
आपण विचार करावा ही विनंती.
चांगले पीक, चांगले भाव।
तरच गावात उरणार नाही गरीबीला वाव।
आपला विनम्र
विजय जावंधिया
शेतकरी संघटना पाईक.