krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

The changing monsoon : मान्सून बदलतोय… आता आपणही बदलले पाहिजे!

1 min read

The changing monsoon : भारतीय कृषिसंस्कृतीचा (Agriculture) आधारस्तंभ म्हणजे मान्सून (monsoon)! गेली हजारो वर्षे आपली जीवनशैली, सण-उत्सव आणि अर्थकारण या मान्सूनच्या लयीवर अवलंबून राहिले आहे. पण आज हाच मान्सून ‘रुग्णाईत’ झाला आहे, त्याचे रूप लहरी आणि भयावह बनले आहे. ऋतूंचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो आपल्या अन्नदात्याला – शेतकऱ्याला!

भारतीय हवामान खात्याच्या (IMD – India Meteorological Department) नोंदीनुसार, मान्सूनचा पॅटर्न स्पष्टपणे बदलला (chang) आहे. पावसाचे आगमन उशिरा, तर त्याचा निरोप अजूनच लांबणीवर. यामुळे सात-सात महिने ओल्या आणि ढगाळ हवामानाची एक अखंड साखळी सुरू आहे. आज आपण ऑक्टोबरच्या अखेरीस आहोत, पण अनुभव मात्र नवरात्रीतील हवामानाचा आहे. आभाळ दाटलेले, ऊन-सावलीचा खेळ आणि हवेतील ओलसरपणा अजूनही कायम आहे. हे वातावरण सणासुदीचे नसून, अवकाळी पावसाचे सूचक बनले आहे. ज्यावेळी खरीप पिके काढणीला येऊन शेत शिवारे मोकळी व्हायला हवीत, तेव्हा पुन्हा पावसाचे आणि ढगांचे सत्र सुरू होतेय – ही काळाची मोठी विडंबना आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या बदललेल्या मान्सूनला ‘आशीर्वादापेक्षा आरीष्ट’ म्हणूनच अनुभवले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा अक्षरशः बोजवारा उडाला. सोयाबीन, कापूस, मूग, आणि कांदा यांसारख्या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात तर पिके पुन्हा पेरावी लागली किंवा शेतातच सडली. नाशिक आणि आसपासच्या द्राक्ष पट्ट्यात ही स्थिती अधिक गंभीर आहे. द्राक्ष शेतीसारख्या संवेदनशील पिकांवर कमी सूर्यप्रकाश, अतिरिक्त आर्द्रता आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम होऊन द्राक्षांची गुणवत्ता आणि एकूण उत्पादन व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे.

सात महिन्यांपासून चालू असलेल्या या ढगाळ हवामानामुळे शेतीचे मूलभूत चक्र थांबले आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव, मातीतील अतिरिक्त आर्द्रता आणि जैविक रोगराईने पिकांची झीज वाढवली आहे. खरीप हंगामाचे नुकसान झाले असतानाच, रब्बीच्या तयारीलाही खीळ बसली आहे. जमिनीची मशागत करणे, कांद्याची रोपे तयार करणे, किंवा नवीन पिके लावणे हे सर्व काम पावसाने विस्कळीत केले आहे. ज्यांनी रोपे आधीच टाकली ती सडू लागली, आणि ज्यांनी उशीर केला ते थोडेसे वाचले आहेत.

या गंभीर पार्श्वभूमीवर एक स्पष्ट संदेश दिसतोय – मान्सून बदलतोय, त्यामुळे शेतीची दिशा बदललीच पाहिजे! आपण निसर्गाच्या विरोधात लढू शकत नाही, तर त्याच्या लयीसोबत जुळवून घेतले पाहिजे. त्यामुळे ‘हवामानाशी सुसंगत शेती’ (Climate-Smart Agriculture) ही आता केवळ कल्पना नाही, तर शेतकऱ्यांसाठी जीवनशैली बनणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रगत शेतकऱ्यांनी या दिशेने पाऊले उचलली आहेत. स्थानिक हवामानाला साजेशी कमी कालावधीची वाण स्वीकारणे, जलसंवर्धनाच्या आधुनिक पद्धती वापरणे आणि एकात्म शेती व्यवस्थापनावर भर देणे. पण हा बदल व्यापक स्तरावर रुजायला हवा.

या संकटावर मात करण्यासाठी केवळ शेतकऱ्यांनीच नाही, तर सर्व तज्ज्ञांनी (शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठे) एकत्र येऊन यावर मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे. हवामानातील बदलांच्या रेषांनुसार नवी, लवचिक शेती रणनीती तातडीने तयार करावी लागेल. यासाठी शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यात अधिक सुसंवाद साधून, हवामान अंदाजाचा उपयोग पेरणी आणि काढणीच्या अचूक वेळेसाठी करणे महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी आता गंभीर्याने विचार करण्याची आणि स्वतःच्या शेतीत बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे. पिकांच्या निवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नव्या विचाराची आणि तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आज ऑक्टोबरच्या शेवटी दिसणारे नवरात्रीचे हवामान, ऋतूंचं चक्र विस्कळीत झाल्याचा स्पष्ट पुरावा आहे. शेतकरी म्हणून आपण निसर्गाला हरवू शकत नाही, पण त्याच्या बदलासोबत स्वतःला बदलू शकतो. मान्सूनचे समीकरण आता बदलले आहे आणि या बदलांशी जुळवून घेतले तरच शेती टिकेल. ‘पूर्वी जसे होत असे’ यावर ठाम राहिलो, तर ‘पुढे कसे होईल’ या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. आपल्या शेती व्यवस्थेने या हवामान बदलाला अनुकूल झालेच पाहिजे.

🤝 ही मैत्री विचारांची

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!