Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना बजावली 10 कोटींची मानहानी नोटीस
1 min read
Panchganga Sugar Factory : महालगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील पंचगंगा (Panchganga) साखर कारखान्याला (Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या उसाला रास्त भाव मागितला. त्यामुळे चिडलेल्या कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांवर 10 कोटी रुपयांचा मानहानी दावा केला असून, न्यायालयाच्या नोटीस बजावल्या आहेत. कारखाना प्रशासनाने मानहानी दावा व नाेटीस मागे घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत द्विपक्षीय करार करूनच उसाला कोयता लावावा. अन्यथा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पंचगंगा कारखान्याला कोयता लाऊ देणार नाही.
पंचगंगा साखर कारखाना व्यवस्थापनाने मागचे वर्षी गाळपाला 3,000 हजार रुपये प्रति टन भाव देण्याचे कबूल केले हाेते. त्यातले 2,850 रुपये दिले आणि राहिलेले 150 रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे कधी देणार आणि चालू हंगामाचा भाव काय देणार, याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेले नागमठान, तालुका वैजापूर येथील शेतकरी श्री गणेश तांबे आणि इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंचगंगा साखर कारखाना व्यवस्थापनाने अपमानास्पद वागणूक दिली. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वीच सर्व शेतकऱ्यांचे मोबाइल फाेन काढून घेण्यात आले हाेते. भाव विचारायला गेलेल्या शेतकऱ्यांना पंचगंगा कारखान्याने तब्बल 10 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली. शेतकऱ्यांनी कारखानदाराला ऊसाचे शिल्लक पैसे आणि पुढील हंगाम भाव मागणे हा गुन्हा आहे का? यात कारखानदाराची कोणती बदनामी होते? ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या उसाचा रास्त भाव मागूच नये, यासाठी ही दडपशाही केली जाते आहे. शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर पंचगंगा कारखान्याची ही दडपशाही खपवून घेणार नाही.
पंचगंगा साखर कारखान्याने मागचे गळीत हंगाम वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पण ऊस गाळपासाठी नेलेला आहे. तेव्हा पण पंचगंगाचे कर्मचारी या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,000 रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे देणार असल्याचे सांगत होते व ऊस तोड करत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पंचगंगा कारखान्याकडे 150 रुपये प्रति टन दराने पैसे घेणे आहेत. त्यामुळे पंचगंगाने चालू हंगामात ऊस तोडणीसाठी कोयता लावण्याअगोदर शेतकरी गणेश तांबे यांना बजावलेली नोटीस तत्काळ मागे घ्यावी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत ऊसाचे द्विपक्षीय करार करावेत. नंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांनी भाव मागितला की, पंचगंगा कारखाना व्यवस्थापनाकडून मानहानीची नोटीस बजावण्याची दडपशाही करू नये. कारखाना व्यवस्थापनाने आधी शेतकऱ्यांशी द्विपक्षीय करार करावे आणि नंतर उसाला कोयता लावावा.
@ नीलेश शेडगे
जिल्हाअध्यक्ष, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर.
संपर्क :- 9270162436
@ जितेंद्र भोसले
जिल्हाअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अहिल्यानगर
संपर्क :- 8999311468