Open onion market : मोकळा कांदा बाजार; पणन महामंडळामुळे शेतकरी हरले, हमाल-मापारी जिंकले
1 min read
Open onion market : मोकळा कांदा बाजार (Open onion market)नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बाजार समित्यांत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचेच अनुकरण करत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मोकळा कांदा बाजार सुरू झाला. राज्य पणन महामंडळाने गोणी कांदा बाजारसाठी मार्गदर्शक नियम व कायदे बनवून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत होत आहे, पण बाजार समित्यांचे संचालन, नियमन करणाऱ्या पणन मंडळाचे राज्यमंत्री, पणन संचालक आणि राज्य सरकारने मोकळा कांदा बाजाराबाबत अद्यापही कोणतेच मार्गदर्शक नियम, कायदे बनवलेले नाहीत, याची प्रचिती शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगरला आली आहे. यासंदर्भात बाजार समितीतील हमाल व मापाऱ्यांनी आंदाेनलन केले. या आंदाेलनामध्ये राज्य पणन महामंडळामुळे शेतकरी तहात हरले असून, हमाल-मापारी जिंकले आहेत.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 ऑगस्ट 2025 पासून बेकायदा मागण्यांसाठी हमाल मापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आणि मोकळा कांदा बाजार बंद केला. वास्तविक मोकळ्या कांदा बाजारात शेतकरी त्यांचा कांदा डम्पिंग ट्रॅक्टर ट्रॉलीने विक्रीसाठी घेऊन बाजारात येतात. लिलाव वेळी एखादा क्विंटल कांदा ट्रॉलीखाली ओतला जातो. तो पुन्हा ट्रॉलीत भरण्याचे पैसे शेतकरीच देतो. लिलाव झाल्यावर व्यापाऱ्यांचा गाळ्यावर डम्पिंग ट्रॉलीमुळे एका खटक्यावर कांदा खाली होतो. तिथे कांद्याच्या एकही चिंगळीला हमालांचा हात लागत नाही, तरीही हमाली कापली जाते. ट्रॉलीचे वजन प्लेट काट्यावर करून त्याचेही पैसे शेतकरीच देतो. पण मापाईच्या नावाने बाजार समितीत डबल पैसे घेतले जातात. अशाप्रकारे या सर्व मागण्या बेकादेशीर आहेत. No Work No Wages काम नाही तर वेतन पण नाही, या कायद्यानुसार मोकळ्या कांदा बाजारामध्ये घेतली जाणारी हमाली व मापाई देखील बेकायदेशीर आहे. या बेकादेशीर मागण्यांसाठी बेमुदत बंद करण्यात आलेला मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र्य भारत पक्षाने पाठपुरावा सुरू करून बाजार समिती सभापती, संचालक, सचिव, तालुका सहायक निबंधक, जिल्हा सहायक निबंधक, पणन संचालक, राज्याचे पणन मंत्री यांच्याकडे अखंड पाठपुरावा केला.
या सगळ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोकळा कांदा बाजार बंद करून करण्यात आलेली कांदा कोंडी फोडण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. कारण एकच सांगण्यात येत आहे की, ज्याप्रमाणे गोणी कांदा बाजार बाबतीत मार्गदर्शक नियम, कायदे बनवून त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत केली जाते, त्याप्रमाणे मार्गदर्शक नियम, कायदे मोकळ्या कांदा बाजार बाबतीत अजूनही बनवले गेलेले नाहीत. त्यामुळे हमाल, मापाड्यानी बेकायदा मागण्यांसाठी बेमुदत बंद केलेला कांदा बाजार बाबतीत त्यांचेवर काय कारवाई करण्यात यावी, त्याचे कोणतेच मार्गदर्शक नियम, कायदे नाहीत. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक व सचिव यांनी ते शेतकऱ्यांचे बाजूने असल्याचे सांगत पणन मंडळाकडे बोट दाखविले व या पेचावर तोडगा काढण्यासाठी असमर्थ ठरले असल्याचे अप्रत्यक्षरित्या जाहीर केले. कांदा दरात प्रचंड मंदी असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी गोणीमध्येच आणण्यास हतबल करण्यात आले होते.
अनेक कांदा उत्पादक शेतकरी 7 ऑगस्ट नंतरच्या बेमुदत बंदमुळे शेजारील नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांत मोकळा कांदा विक्रीसाठी घेऊन जात होते. पण, श्रीरामपूर बाजार समितीपेक्षा त्या बाजार समित्या खूपच लांब असल्याने मोकळा कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खूप परवड होत होती. तिथे कांदा विक्रीसाठी घेऊन जाण्यास पहाटे 2-3 वाजताच निघावे लागते. लिलाव होऊन घरी परतण्यास लांबचा पल्ला असल्याने मध्यरात्रीचे 1-2 वाजत होते. गोणीत कांदा विक्रीसाठी प्रती क्विंटल खर्च 250 ते 300 रुपये होतो तर बाजारात कांद्याला सरासरी फक्त 800 ते 1,000 रुपयेच भाव मिळत असल्याने गोणीचा खर्च वजा जाता निव्वळ 500 रुपये क्विंटल शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहेत. त्याचमुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मागणीवरून मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी 18 सप्टेंबर 2025 रोजी श्रीरामपूर बाजार समितीत सभापती, संचालक, सचिव, कांदा उत्पादक शेतकरी, हमाल, मापारी, सर्व शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मागणीवरून परंपरेनुसार गोणी बाजारासारखे शेतकऱ्यांनी हमाली, मापाई देण्यास हतबल करण्यात आले, ते केवळ पणन मंडळाने आजवर मोकळा कांदा विक्रीसाठी कोणतेही नियम कायदे बनवले नसल्याने बाजार समित्यात कांदा उत्पादक शेतकरी बाजारात लुटला जातो आहे, पण आजघडीला कांद्याला उत्पादन खर्च भरून निघेल, एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी परंपरेनुसार हमाली, मापाई देण्याचे मान्य केले तेव्हाच मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला.
शेतकऱ्यांचे मागणीनुसार आता जरी मोकळा कांदा बाजार सुरू करण्यात आला असला तरी सर्व शेतकरी संघटनानी राज्याचे मुख्यमंत्री, पणनमंत्री, राज्यातील शेतीमाल खरेदी विक्रीची जबाबदारी असलेले पणन संचालक पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करून मोकळा कांदा बाजारामध्ये घेण्यात येणारी No Work No Wages कायद्यानुसार घेण्यात येणारी बेकादेशीर हमाली, मापाई रद्द करण्यासाठी पणन संचालक पुणे यांच्याकडे मोकळा कांदा बाजाराबाबत No Work No Wages काम नाही तर वेतन पण नाही, या कायद्यानुसार नियम, कायदे बनवावे यासाठी सर्व शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी लवकरच पणन संचालक पुणे यांच्याकडे दाद मागण्यासाठी जाणार आहेत.
देशातील सर्वप्रथम पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या तसेच शेतकऱ्यांचे सरकार आहे, अशी वल्गना करणारे महायुती सरकारकडून अपेक्षा आहे की, त्यांनी त्यांचा पणनमंत्री, पणन संचालक यांना या शेतकरी लुटीच्या ज्वलंत प्रश्नावर तत्काळ No Work No Wages कायद्यानुसार नियम, कायदे बनवून गेल्या अनेक वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट कायमची बंद करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. पणन मंडळाने आजवर राज्यातील मोकळा कांदा बाजारज्ञसाठी कोणतैही नियम, कायदे बनवलेले नाहीत. त्यामुळे मोकळा कांदा बाजार विक्रीमध्ये राज्यातील बाजार समित्यांत हमाल, मापारी संघटित होऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. मोकळा कांदा बाजार बाबत कोणतेही मार्गदर्शक नियम कायदे नसल्याने तालुका सहायक निबंधक, जिल्हा निबंधक, पणन संचालक देखील या लुटीत भागीदार झाले आहेत. या विरुद्ध जनजागृती करणे गरजेचे आहे.