krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Navratri & the hardships of Farmer women : दुर्गे दुर्घट भारी : नवरात्र आणि शेतकरी स्त्रीशक्ती कष्टाच्या सन्मानाचा उत्सव

1 min read

Navratri & the hardships of farmer women : दुर्गा (#Durga) ही फक्त देव्हाऱ्यातील मातीची प्रतिमा नाही, ती आपल्या जगण्याची प्रेरणा आहे. नवरात्र (#Navratri) आलं की आपण देवीच्या नऊ रुपांची पूजा करतो, तिचं जागरण करतो, भजन-कीर्तन गातो, गावागावांत जत्रा भरतात. पण खरी दुर्गा जर शोधायची असेल तर ती आपल्या घराघरात आहे, शिवारात आहे, शेतात आहे, बियामध्ये आहे, धान्याच्या कणाकणात आहे. खरंतर शेतीचा शोधच एका मातेने (#Farmer women) लावला होता. पूर्वज शिकार करून, फळं-फुलं खाऊन जगत होते. पण अन्नाची टंचाई आली तेव्हा एका स्त्रीने बियाणं जमिनीत पेरलं, त्यातून उगवलेल्या कोंबाने जगाला अन्न निर्मितीचा मार्ग दाखवला. हाच तो क्षण होता ज्या क्षणी शेतीचा जन्म झाला, अन्नसंस्कृतीची सुरुवात झाली. म्हणून आपण म्हणतो – अन्नपूर्णा ही देवी आहे, कारण तिच्याशिवाय जीवनच शक्य नाही.

🌱 सकाळ हाेताच बांधते कामाची गाठ
आजच्या काळात शेतकरी महिलांचं शेतीतलं योगदान बघितलं तर जवळजवळ 80 ते 90 टक्के मेहनत या दुर्गाच करताना दिसतात. पुरुष हलक्या कामात असतो, निर्णय घेतो, बाजारात जातो; पण मातीशी, पिकाशी, जनावरांशी दिवसभर झगडणारी खरी दुर्गा म्हणजे शेतकरी बाईच असते. सकाळ होताच बाई उठते. घरातली लेकरं, म्हातारे, जनावरं यांचा सारा विचार करून कामाची गाठ बांधते. गोठ्यातल्या गायी-म्हशींचं दूध काढणं, चाऱ्याची सोय करणं, त्यानंतर कुटुंबाला चहा-भाकर देणं हे सगळं तिच्या अंगावर असतं. पेरणीच्या दिवसांत तर हिची धावपळ वेगळीच. कडाक्याच्या उन्हात, कंबरतोड मजुरी करत ती बी पेरते, खतं घालते, खुरपं करते. पिकाला पाणी द्यायचं असो, तणं उपटायचं असो किंवा फवारणीच्या वेळी मदत करायची असो, प्रत्येक ठिकाणी हिची उपस्थिती असते. जगातल्या कुठल्याही कृषी अर्थव्यवस्थेकडे पाहिलं तर महिलांचा घाम हा शेतीच्या पाया आहे. पण आपल्या इथं बाईचं नाव मागे राहून जातं. जमीन पुरुषाच्या नावावर असते, बँकेचा कर्जपुरवठा पुरुषाच्या खात्यातून होतो, बाजारात दर ठरवायला पुरुषच जातो. पण हे सगळं होण्याआधी मातीला मायेने कुरवाळणारी, पिकाशी बोलणारी आणि त्याला जपणारी तीच असते.

🌱 घटस्थापना म्हणजे काय?
आपल्या पूर्वजांनी सण-उत्सव केवळ धार्मिकतेपुरते ठेवले नाहीत. त्यामागं शेतीचं शहाणपण होतं. घटस्थापना म्हणजे नुसती देवीची पूजा नाही. तो म्हणजे रब्बी हंगामाची सुरुवात. घटातली माती म्हणजे जमीन, घटातली मूठभर बियाणं म्हणजे उगवणीची चाचणी. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे आपल्या पूर्वजांचं माती तपासणीचं प्राथमिक साधन होतं. पेरलेली बियाणं घटात रुजली की आपल्याला खात्री मिळायची – आता खरी पेरणी सुरू करायला हरकत नाही. म्हणजे नवरात्र हा सण आपल्या शेतीचं कॅलेंडर ठरवतो. या दिवसांत देवीला बोलावणं म्हणजे घराघरात समृद्धी यावी, पिकं यावीत, दुष्काळ, रोगराई नको म्हणून प्रार्थना करणं आणि यातूनच स्त्रीशक्तीला समाजात विशेष स्थान मिळालं. कारण शेतीची धुरा हिनेच सांभाळलेली होती.

🌱 स्त्री म्हणजे अन्नपूर्णा
बी निवडणं, ते भिजवणं, पेरणीसाठी तयार करणं – हे सगळं काम बाईच करते. नंतर पेरणीला मदत, खुरपणी, तण काढणं, जनावरांना खाद्यपाणी देणं, पिकाची निगा राखणं, घरातले अन्न शिजवणं, बाजारात धान्य विकण्यासाठी ओझं उचलणं – या साखळीची सुरुवात आणि शेवट दोन्ही स्त्रीकडेच आहेत. अन्नधान्याची निर्मिती ते थेट आपल्या ताटात येईपर्यंत तिचा हात लागतो. म्हणूनच तिला अन्नपूर्णा म्हटलं जातं. देवी दुर्गा युद्धात राक्षसांचा नाश करते, तर खरी दुर्गा शेतात उपासमारीच्या राक्षसाला पराभूत करते.

🌱 ओळख, सन्मानाविना स्त्री
पण आजही बाईला शेतकरी म्हणून ओळख मिळालेली नाही. तिचं नाव सातबाऱ्यावर नसतं, शेतकऱ्यांच्या आकडेवारीत तिचा समावेश नसतो, विमा-भरपाई, कर्जमाफी, शासकीय योजना – सगळं पुरुषाच्या नावावरच होतं. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की बाईचं योगदान नसलं तर शेतीचं चाक फिरणारच नाही. घामाचा प्रत्येक थेंब हिच्या मेहनतीचा असतो, पण मान-सन्मान मात्र पुरुषाला मिळतो. हे वास्तव बदलायला हवं. नवरात्रात देवीची आराधना करायचीच, पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या, शिवारातल्या देवीला म्हणजेच शेतकरी बाईला मान द्यायला हवा.

🌱 तिच्या श्रमांना मान्यता का हवी?
आज मोठ्या मंदिरात दिवे लावले जातात, मोठ्या-मोठ्या आरत्या होतात, पण खरी दुर्गा पूजायची असेल तर आपल्या शेतकरी बाईचा सन्मान केला पाहिजे. तिच्या श्रमांना मान्यता दिली पाहिजे. पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून ती काम करते, संकटांना तोंड देते, मुलांना शिकवते, पिकाला वाचवते. तीच खरी नवरूपिणी दुर्गा आहे. म्हणून या नवरात्रात आपण संकल्प करुया – देव्हाऱ्यातल्या देवीला फुलं अर्पण करताना शेतकरी बाईच्या हाताला, तिच्या मेहनतीला आदर अर्पण करूया. तिचं नाव कागदावर, सातबाऱ्यावर, बँकेच्या पासबुकात यायला हवं. हाच खरा नवरात्रोत्सवाचा संदेश आहे.

🌱 नवरात्र म्हणजे शेतीचा विज्ञानाधारित उत्सव
नवरात्र म्हणजे फक्त ढोल-ताशा, आरती, देवीच्या प्रतिमा नव्हे. तो म्हणजे शेतीचा विज्ञानाधारित उत्सव. आपल्या मातीतल्या सामर्थ्याचा, शेतकरी बाईच्या श्रमांचा, स्त्रीशक्तीच्या योगदानाचा सन्मान करण्याचा प्रसंग. आज आपल्या समाजाला खरी गरज आहे ती म्हणजे शेतकरी महिलांचा आवाज ऐकण्याची, त्यांच्या श्रमांना मान देण्याची. कारण त्या नसत्या तर आपल्याला भाकर मिळाली नसती. म्हणूनच म्हणतो –

दुर्गे दुर्घट भारी,
शेतकरी बाईशिवाय शेती अपुरी.
आज आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटामध्ये शेतकरी आहे
पावसाने थैमान घातले, ओला दुष्काळ पडलाय
मालाला भाव नाही येत
आई दुर्गे या सर्वांना संकटातून बाहेर काढ

🤝 ही मैत्री विचारांची

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!