krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Doppler Weather Radar : हवामानाचे रहस्य उलगडणारी सफर ‘डॉप्लर वेदर रडार’च्या डोळ्यातून!

1 min read

Doppler Weather Radar : पृथ्वीच्या हवामानाचा तोल बिघडू लागला की, आकाशातील प्रत्येक ढग, वाऱ्याची प्रत्येक झुळूक, पावसाचा प्रत्येक थेंब नवे समीकरण मांडू लागतो. कधी ढगफुटीची झेप, कधी गारपिटीची धार, कधी पुराचा महाप्रकोप, तर कधी चक्रीवादळाचा घातक वेग. या सर्वांचा शेती, माती आणि पिकांवर हाेणारा विपरित परिणाम, प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर हाेणारा राेग व किडींचा प्रादुर्भाव, त्यामुळे धाेक्यात येणारी अन्नसुरक्षा हे सर्व बदल आता केवळ आकडे किंवा अंदाज नसून जगण्या-मरण्याचा प्रश्न बनले आहेत. तीव्र उष्ण व शीतलहरींनी भूमीचा श्वास रोखला असताना सर्वाधिक आघात शेतीला व शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसतो. देशाच्या अन्नसुरक्षेचा पाया हादरवणाऱ्या या आपत्तींपासून वाचण्यासाठी भारताला ‘डॉप्लर रडार’चे (#Doppler #radar) जाळे, सक्षम सॅटेलाईट नेटवर्क आणि प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञांची फळी उभी करून ‘नेशन फर्स्ट’ व ‘ओन्ली सोल्युशन्स’ या दृष्टिकोनातून सज्ज होणे आज काळाची गरज आहे.

♻️ डॉप्लर रडार यंत्रणेचा जन्म
ऑस्ट्रियातील भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन डॉप्लर हे 1842 साली आकाशगंगेतील ग्रहताऱ्यांचा अभ्यास करीत होते. अचानक गणिती आकडेमोड करताना त्यांना एखादी वस्तू दूर जाताना किंवा जवळ येताना त्यावर रेडिओ लहरी सोडल्यास त्या परतताना त्यांची फ्रिक्वेन्सी (कंप्रता – Frequency) बदलतात, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यासाठी हा एक नवीन शोध होता, यालाच पुढे ‘डॉप्लर इफेक्ट’ संबाेधले जाऊ लागले. जून 1958 मध्ये अमेरिकन संशोधक डेव्हिड होम्स आणि रॉबर्ट स्मिथ यांनी चक्रीवादळाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर इफेक्ट तत्त्वाचा वापर केला आणि पुढे हवामानाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर रडारचा वेगाने प्रचार-प्रसार जगभर होऊ लागला.

♻️ भारतातील डॉप्लर रडार स्टेशन
देशात 55 डॉप्लर रडार स्टेशनची याेजना आखण्यात आली असली तरी सध्या 39 स्टेशन कार्यरत आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, सोलापूर व वरवळी (रत्नागिरी) या चार स्टेशनचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या म्हैसमाळ येथील स्टेशनचे काम सुरू आहे. मुंबई व नागपुरात ‘एस-बॅण्ड’, तर सोलापूर, वरवळी व म्हैसमाळ येथील डाॅप्लर ‘सी-बॅण्ड’ आहेत. हे रडार त्याच्या चोहोबाजूंच्या परिसरात कार्यरत असते. सन 2025–26 पर्यंत देशभरात 73 आणि 2026 पर्यंत एकूण 126 रडार स्टेशन तयार करावयाची आहेत. ‘एस-बॅण्ड’ रडारची क्षमता 200 ते 250 किमी, तर ‘सी-बॅण्ड’ची क्षमता 500 ते 600 किमी आहे.

♻️ स्टेशन शहर – राज्य – रडार प्रकार
🔆 कोलकाता – पश्चिम बंगाल – S-Band
🔆 माचिलिपट्टनम – आंध्र प्रदेश – S-Band
🔆 विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश – S-Band
🔆 श्रीहरिकोटा – आंध्र प्रदेश (ISRO) – S-Band
🔆 हैदराबाद – तेलंगणा – S-Band
🔆 पलम – दिल्ली – S-Band
🔆 नवी दिल्ली New Delhi (HQ) – दिल्ली – C-Band (Polarimetric)
🔆 आया नगर – दिल्ली – X-Band
🔆 नागपूर – महाराष्ट्र – S-Band
🔆 मुंबई – महाराष्ट्र – S-Band
🔆 मुंबई (वेरवाळी) – महाराष्ट्र – C-Band
🔆 सोलापूर – महाराष्ट्र – C-Band
🔆 अगरतला – त्रिपुरा – S-Band
🔆 पटना – बिहार – S-Band
🔆 लखनऊ – उत्तर प्रदेश – S-Band
🔆 पटियाळा – पंजाब – S-Band
🔆 मोहनबारी – आसाम – S-Band
🔆 भोपाल – मध्य प्रदेश – S-Band
🔆 परादीप – ओडिशा – S-Band
🔆 गोपालपूर – ओडिशा – S-Band
🔆 करैकल – तमिळनाडू – S-Band
🔆 चेन्नई (NIOT) – तमिळनाडू – X-Band
🔆 चेन्नई – तमिळनाडू – S-Band
🔆 पणजी (Goa) – गोवा – S-Band
🔆 भुज – गुजरात – S-Band
🔆 जयपूर – राजस्थान – C-Band (Polarimetric)
🔆 श्रीनगर – जम्मू व कश्मीर – X-Band
🔆 जम्मू – जम्मू व कश्मीर – X-Band
🔆 बनिहाल टॉप – जम्मू व कश्मीर – X-Band
🔆 कोचीन – केरळ – S-Band
🔆 तिरुवनंतपूरम (VSSC) – केरळ (ISRO) – C-Band
🔆 मुक्तेश्वर – उत्तराखंड – X-Band
🔆 सूरकंदा देवी – उत्तराखंड – X-Band
🔆 लाँड्सडॉर्न – उत्तराखंड – X-Band
🔆 लेह (Transportable) – लडाख – X-Band
🔆 कुफरी – हिमाचल प्रदेश – X-Band
🔆 जोट – हिमाचल प्रदेश – X-Band
🔆 मुरारी देवी – हिमाचल प्रदेश – X-Band
🔆 चेरापुंजी – मेघालय (ISRO) – S-Band

♻️ डॉप्लर रडारचा फायदा
हवामान बदलांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाच्या माहितीसाेबतच डॉप्लर वेदर रडारमधून (Doppler Weather Radar) मिळणारी माहिती अतिशय उपयुक्त ठरते. या प्रणालीद्वारे चक्रीवादळ, वादळ, ढगफुटी, अतिवृष्टी, गारपीट याचे अचूक पूर्वानुमान आपल्याला चार ते सहा तास अगोदर मिळते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नगदी पिकांसाठी होऊ शकतो. शिवाय, या काळात उपाययाेजना करता येऊ शकते. या वेदर रडारमुळे ढगांमधील कण, त्यांची स्थिती (गडद हाेणार की विरुन जाणार), वाऱ्याचा वेग, दिशा व उंची, हवेतील बाष्प व बर्फाचे कण व पाण्याचे थेंब, त्यांचा आकार यासह इतर महत्त्वाच्या बाबींची अचूक माहिती मिळते.

♻️ वेदर रडारचा शेतीसाठी उपयाेग
रडार कृषीमध्ये विविध प्रकारे उपयोगी ठरू शकते, जसे…
🔆 पिकांच्या वाढीचे निरीक्षण करणे.
🔆 पाण्याची उपलब्धता तपासणे.
🔆 कीड-रोग नियंत्रणासाठी मदत करणे.
🔆 पिकांची वाढ व घनतेच्या निरीक्षणासाठी विशेषतः सिंथेटिक अपर्चर रडार (SAR – Synthetic Aperture Radar) वापरले जाते.
🔆 रडारचा उपयोग जमिनीतील पाण्याची पातळी आणि पाण्याची उपलब्धता तपासण्यासाठी होतो.
🔆 रडारचा वापर करून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव लवकर ओळखता येतो, ज्यामुळे वेळेवर उपाययोजना करता येते.
🔆 रडारचा उपयोग हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
🔆 रडारचा वापर करून शेतजमिनीची सुपीकता आणि आरोग्य तपासता येते, ज्यामुळे योग्य खते आणि व्यवस्थापनाचे नियोजन करता येते.
🔆 संत्र्या बागांमध्ये AI च्या माध्यमातून उत्पादन वाढीचे प्रयोग अचलपूर, जिल्हा अमरावती येथे सुरू असून, त्याचे आताचे रिझल्ट चांगले आहेत.
🔆 सर्वच पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच कमी झालेला जमिनीतील कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये याची उपलब्धता शेतातील कुठल्या भागात पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा ताण आहे हे माहिती होते. पूर आणि नैसर्गिक आपत्ती सोबतच भविष्यातील शेतीकरिता उपयोगी.

♻️ फ्रिक्वेन्सीचा उपयोग
🔆 एल बॅण्ड/1 ते 2 गिगा हर्टझ : पाऊस, मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहितीसाठी.
🔆 एस बॅण्ड/2 ते 4 गिगा हर्टझ : जवळ व दूरच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी.
🔆 सी बॅण्ड/4 ते 8 गिगा हर्टझ : अतिजवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी.
🔆 एक्स बॅण्ड/8 ते 12 गिगा हर्टझ : हवेतल्या बाष्प, बर्फकण, पाण्याच्या थेंबांचा आकार व प्रकार तसेच ढगफुटींच्या माहितीसाठी.
केयू/12 ते 18 गिगा हर्टझ : ढगातील एकूण बर्फकण, पाणी, गारांच्या निर्मितीच्या वेगाच्या अचूक माहितीसाठी.

♻️ विदर्भात सी-बॅण्ड डाॅप्लर वेदर रडार का आवश्यक आहे?
म्हैसमाळ येथील रडारमुळे मराठवाड्यातील किमान 72 लाख शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळू शकेल. म्हैसमाळसाेबतच विदर्भात एक ‘सी-बॅण्ड’ डाॅप्लर रडार मंजूर करण्यात आले हाेते. ते अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ राजकीय अनास्थेमुळे वरुड तालुक्यात या रडार स्टेशनला जागा उपलब्ध करून दिली नसल्याने ते रडार मुंबईला नेण्यात आहे. आता नागपूर शहरातील ICAR-CICR (Central Institute For Cotton Research) च्या जागेवर बसविण्याची याेजना आहे. या रडारची क्षमता केवळ 85 किमी असल्याने त्याचा विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी काही फायदा हाेणार नाही. या रडार ऐवजी वरूड तालुक्यात सी-बॅण्ड डाॅप्लर वेदर रडार आवश्यक आहे. कारण वरूड हे ठिकाण मध्यवर्ती असून, या रडारचे कार्यक्षेत्रात संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेशातील बैतूल, छिंदवाडा व बुरहानपूर तसेच तेलंगणातील आदिलाबाद, छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हा व इतर 500 किमीच्या परिघातील भाग सहज कव्हर हाेताे. या रडारमुळे राजस्थानातील उष्ण हवा मध्य प्रदेश मार्गे सातपुडा ओलांडून विदर्भात दाखल हाेते. त्या हवेमुळे शेतजमिनीसह पिकांवर हाेणाऱ्या परिणामांचे याेग्य व्यवस्थान करणे साेपे जाईल. हे वेदर रडार मिळविण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणे आपले लाेकप्रतिनिधी (आमदार, खासदार, मंत्री), जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय आयुक्त निवेदने देऊन त्यांना ही मागणी व वेदर रडारचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!