krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Tomato prices & housewives budget : गृहिणींचे बजेट कोलमडले, मग शेतकरी करोडपती झालेत का?

1 min read

Tomato prices & housewives budget : आपल्या देशात जेव्हा एखादी गोष्ट महाग होते, तेव्हा माध्यमांमध्ये आणि समाजमनामध्ये लगेच एकच चर्चा सुरू होते, ‘महागाई वाढली (Inflation increased.)!’, ‘बजेट कोलमडलं (budget collapsed)!’, ‘ग्राहक त्रस्त!’. पण या सगळ्या गोंधळात एका महत्त्वाच्या घटकाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते, तो म्हणजे आपला अन्नदाता शेतकरी (Food provider farmer). आज टोमॅटोला (Tomato) चांगला भाव मिळत असल्याच्या बातम्यांनी बाजारपेठा आणि घराघरात चर्चा सुरू आहे, पण या चढ्या भावामागे दडलेले शेतकऱ्याचे दुःख, त्याचे वर्षभराचे कष्ट आणि डोळ्यातील पाणी कोणालाच दिसत नाहीये.

🎯 भाववाढ हसवणारी की रडवणारी?
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या वाढलेल्या दरांवरून सर्वत्र ओरड सुरू आहे. माध्यमांचे मथळे सांगतात, ‘टोमॅटो गगनाला भिडला’, ‘गृहिणींचे (Housewives) गणित बिघडले’. हे चित्र पाहता असे वाटते की, शेतकऱ्यांच्या घरात सोन्याचा पाऊस पडत असावा. पण, वास्तवात या भाववाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही, तर एक गूढ दुःख आणि भविष्याची चिंता आहे. त्यांच्यासाठी ही भाववाढ म्हणजे एक उशिरा मिळालेली भीक आहे, जी त्यांच्या मागील वर्षभराच्या जखमांवर फुंकर घालू शकत नाही.

गेलं वर्षभर आम्ही टोमॅटोच्या भावासाठी अक्षरशः झगडत होतो. जेव्हा बाजारात टोमॅटो कवडीमोल भावाने विकला जात होता, तेव्हा कोणीही शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष दिले नाही. पिकवलेला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी केलेला खर्चही निघत नव्हता. शेतकऱ्यांच्या गाड्या भरभरून टोमॅटो बाजारात यायचा, पण खरेदीदार नसल्याने तो तसाच पडून राहायचा. अनेकदा तर माल परत घेऊन जाण्याऐवजी जागेवरच फेकून देण्याची वेळ आली. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी रागाच्या भरात, निराशापोटी आपल्या शेतातील उभा टोमॅटो उपटून फेकून दिला. इतके कष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यांदेखत सडताना पाहण्याचे दुःख शब्दांत मांडणे कठीण आहे.

त्या दिवसांची आठवण आजही अंगावर काटा आणते. अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा शेतीतून हताश होऊन माळरानावर आश्रय घेतला. काही जणांनी वडीलधाऱ्यांच्या खोट्या सल्ल्याला बळी पडून एकरी 20-25 हजारांचे कर्ज काढून टोमॅटो लावला, पण तोट्यात गेल्याने ते कर्ज त्यांच्या मानगुटीवर बसले. कुणी आपल्या व्यथा गावात न सांगता, शेतीच्या बांधावर एकटेच रडले. कुणी शेतावर ठेवलेल्या खताच्या पोत्यांकडे पाहून अश्रू ढाळले, कारण ती खते आणण्यासाठी काढलेले कर्ज आता कसे फेडायचे याची चिंता त्यांना सतावत होती. हे सर्व घडत असताना, माध्यमांनी ‘शेतकरी त्रस्त’ असे मथळे दिले नाहीत, ना कुणी ‘टोमॅटोचे दर इतके खाली गेले की शेतकऱ्यांनी माल फेकून दिला’ हे तोंडभरून सांगितले. ही माध्यमांची एकतर्फी भूमिका शेतकऱ्यांच्या मनाला अधिकच यातना देते.

🎯 माध्यमांचा एकतर्फी गोंधळ आणि शेतकऱ्याचे वास्तव
आज माध्यमांना टोमॅटोचा भाव वाढला, ही एक मोठी आणि ब्रेकिंग न्यूज वाटते. पण, त्यांनी कधी हा विचार केला आहे का, की हे वाढलेले भाव किती दिवस टिकतील? आणि या वाढलेल्या भावाचा फायदा किती टक्के शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मिळत आहे? आपल्या देशातील हवामान नेहमीच लहरी असते. काही भागात गरम वारे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट. कधी फळे फुटतात, तर कधी संपूर्ण झाडच सडून जाते. टोमॅटो हे अत्यंत नाजूक पीक आहे. एका पानावरील करपा किंवा एक छोटा बुरशीजन्य रोगही हजारो रुपयांचे नुकसान करतो. या नैसर्गिक संकटांशी लढतच शेतकरी आपले पीक जपतो.

आता जे थोडे भाव वाढले आहेत, तेही फार कमी शेतकऱ्यांना मिळाले आहेत. कारण सध्या बाजारात आलेला टोमॅटो हा मे महिन्यात लावलेला आहे. उन्हाळ्यातलं रोप उन्हाच्या तीव्रतेतून जिवंत ठेवलेली झाडं, नैसर्गिक संकटांपासून वाचवलेलं उत्पादन या सगळ्यावर शेतकऱ्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे आणि आज जो दर आहे, तो काहीच दिवस टिकणार नाही, हे शेतकऱ्याला अनुभवाने माहीत आहे. तरीही माध्यमांनी असा गोंधळ उडवला आहे की, जणू काही सगळे शेतकरी श्रीमंत झाले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांची नव्हे, तर त्यांच्या शेतमालाची लुटमार सुरू होते. व्यापारी आणि दलाल चढ्या भावाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल खरेदी करतात आणि ग्राहकांना तो चढ्या भावाने विकून नफा कमावतात.

🎯 महागाईचे खरे मूळ कुठे आहे?
महागाईचा दोष केवळ टोमॅटोला दिला जातो, पण हा निव्वळ सोयीस्करपणा आहे. आपल्या घरामध्ये सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. गॅस सिलिंडर, डाळी, औषधे, शिक्षणाचे शुल्क, प्रवास खर्च, वीज बिल. या सगळ्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत, पण त्यावर कोणी आवाज उचलत नाही. मात्र, टोमॅटोला 5-10 दिवसांसाठी भाव वाढला की, त्यालाच महागाईचे कारण ठरवले जाते.

कोणत्याही घरात महिन्याकाठी 4-5 किलो टोमॅटो लागतो. त्यामुळे जरी टोमॅटोचा भाव वाढला, तरी महिन्याच्या बजेटमध्ये फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात, तेव्हा इतरांना तो त्रास वाटतो. मात्र, शेतकरी महिनोनमहिने तोटा सहन करतो, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती कुणाला कळत नाही. हे असे मध्यमवर्ग, गृहिणी, बाजारपेठ आणि सरकार सगळ्यांनी मिळून ठरवल्यासारखे वाटते, की शेतकऱ्याने कमावू नये. त्याने जगावे, तो पिकवावा, पण त्याचे पोट भरू नये. ही मानसिकता शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायी आहे.

🎯 शेतकऱ्याच्या खर्चाची जळजळीत गोष्ट
टोमॅटो पिकवणे म्हणजे फक्त बियाणे पेरून पाणी घालणे नाही. त्यात खूप मोठा खर्च आणि श्रम गुंतलेले असतात. बियाण्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. खतांसाठी आणि फवारणीसाठी महागडी औषधे आणावी लागतात. मजुरीचा खर्च प्रचंड वाढला आहे आणि कामासाठी माणसे मिळणेही कठीण झाले आहे. पीक काढल्यावर ते बाजारपेठेत नेण्यासाठी पेट्यांचा खर्च, वाहतूक खर्च आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टोमॅटोचे पीक घेण्यासाठी लागणारी हिंमत.

आज फवारणीसाठी एका औषधाची बाटली 1,000 ते 2,000 रुपयांना मिळते. मजुरी वाढली आहे, कॅरेट भाड्याने घ्याव्या लागतात, गाडी लावायची तर दर वाढलेले आहेत. या सगळ्या कष्टांवर शेवटी जेव्हा शेतकरी आपला माल घेऊन बाजारात जातो, तेव्हा तो विकला जाईल की नाही याची कोणतीच हमी नसते. म्हणजे काय? शेतकरी फक्त नशिबावर चालतो? नाही, शेतकरी मेहनतीवर चालतो. पण जेव्हा मेहनतीवर पाणी फिरते, तेव्हा त्याला असह्य दुःख होते. टोमॅटो सडतो, तेव्हा तोच रडतो, आणि आज भाव येतो, तर बातम्यांमध्ये तोच खलनायक होतो!

🎯 बाजार समित्यांचे ‘मूल्य’ की ‘लुट’?
बाजारात ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या नावावर चालतात, त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बाजूने असतात का, हा मोठा प्रश्न आहे. बाजारात सध्या जे दर दिले जातात, ते निवडक कॅरेट मिळतात. एकाच दिवशी चार कॅरेट चांगला दर मिळतो आणि बाकीच्या शंभर पेट्यांना कवडीमोल भाव मिळतो. पण माध्यमे काय दाखवतात? केवळ त्या चार पेट्यांचा फोटो, ज्यामुळे असा भ्रम निर्माण होतो की सगळ्याच शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाने विकला गेला. दलाल, व्यापारी, मोठे एजंट यांना शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे नसते. त्यांना फक्त आपला फायदा बघायचा असतो. त्यामुळे काय होते? शेतकऱ्याला मिळणारा दर अजून अर्धा होतो. मधले दलाल प्रचंड नफा कमावतात, तर शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते.

🎯 ज्याचा माल चालतो, तो जगतो
या बाजारपेठेत खरंतर हजारो शेतकरी टोमॅटो पिकवत आहेत, पण एखाद्याचे उत्पादन वेळेवर निघते, ते चांगले असते आणि त्याला बाजारात चांगला भाव मिळतो. नेमका त्याच शेतकऱ्याचा फोटो काढला जातो, त्याच्याच मुलाखती घेतल्या जातात. मग बाकीचे शेतकरी काय करतात? ते पुन्हा कर्ज फेडण्यासाठी धडपडतात, टाकलेल्या पैशाचा हिशेब करतात. कुणी उसनवारी मागतो, कुणी शेतीतून पूर्णपणे मागे हटतो. ही वस्तुस्थिती कोणीही दाखवत नाही.

🎯 मूल्यव्यवस्थेची उघडी पडलेली बाजू
आज जिथे टोमॅटो 60 रुपये किलो आहे, तिथे थोडं थांबा, हाच टोमॅटो परवा पुन्हा 20 रुपयांवर येईल. कारण आपले उत्पादन एकाच वेळी बाजारात येते. कोणीही योजना आखून, प्रक्रिया करून, साठवणूक करून, भाव टिकवून ठेवत नाही. सरकार यावर गप्प आहे. मोठ्या कंपन्या डोळेझाक करतात. आणि ग्राहक या सगळ्या भ्रमात असतो. म्हणून दर वाढतो, मग अचानक कोसळतो. याला ना शेतकरी जबाबदार, ना ग्राहक. जबाबदार आहेत. व्यवस्थेतील बेपर्वाई आणि बाजारातील ‘मिळवाटी’. हे एक दुष्टचक्र आहे, ज्यात शेतकरी आणि ग्राहक दोघेही भरडले जातात, तर मधले दलाल आणि व्यापारी मालामाल होतात.

🎯 शेतकऱ्याचा खरा न्याय – भाव नाही, तर धोरण
या सगळ्या परिस्थितीतून एक गोष्ट स्पष्ट होते. शेतकऱ्याला फक्त वाढलेला भाव नको, त्याला स्थिर भावाची हमी हवी आहे. तो कमी भावावरही आपला माल देण्यासाठी तयार आहे, पण त्याला त्यातून किमान नफा मिळाला पाहिजे, तोटा नव्हे. शाश्वत उत्पादनासाठी ठोस धोरणे हवी आहेत, जिथे फुकट पडणारा माल वापरण्यात येईल. प्रक्रिया उद्योग, थेट विक्री व्यवस्था, सरकारी खरेदी केंद्रे – अशा उपाययोजनांची नितांत गरज आहे. आज भाव वाढला म्हणून जो आक्रोश होतोय, तो चुकीचा आहे. आजपर्यंत कमी दरांनी शेतकऱ्याला अक्षरशः ओरबाडले गेले आहे, तेव्हा कुठे होता हा गोंधळ? शेतकऱ्याच्या घामाचे मोल केले जात नव्हते, तेव्हा समाज आणि माध्यमांना त्याची आठवण झाली नाही.

🎯 शेवटी एकच शब्द समजून घ्या!
शेतकऱ्याचे दुःख हे बाजारातील चढ-उतारापेक्षा खूप खोल आहे. त्याला हिवाळा लागत नाही, उन्हाळ्याची पर्वा नसते, पाऊस वेळेवर पडेल याची शाश्वती नसते. तरीही तो दररोज नवीन आशा घेऊन शेतात उभा राहतो, आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करतो. आज जर त्याच्या मेहनतीला थोडासा भाव मिळालाय, तर त्यात दोष कुठे आहे? त्याच्या श्रमाला दाद दिली पाहिजे. त्याच्या ताटात जेवण येण्यासाठी केवळ वाढलेल्या भावाची नव्हे, तर मानवतेच्या आणि सहानुभूतीच्या दृष्टीची गरज आहे. शेतकऱ्याला समजून घेणे, त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. अन्यथा, एक दिवस असा येईल, जेव्हा हे अन्न पिकवणाराच आपल्यासाठी अन्न पिकवणे सोडून देईल आणि तो दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भयावह असेल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!