krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

New concepts in agriculture : शेतीतील नवीन संकल्पना

1 min read

New concepts in agriculture : गेल्या काही वर्षात विशेषतः सोशल मीडिया आणि ‘जिओ’च्या आगमनानंतर इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे शेती क्षेत्रात घडलेले बदल लक्षणीय आहेत. इंटरनेटमुळे देशभरातील शेतकऱ्यांचे प्रयोग आणि अनुभव सगळीकडे पोहोचले. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन त्यांनी आपले प्रयोग यशस्वी करून दाखवले. ही नव्या शेतीची सुरुवात आहे. जेव्हा आपण शेती (agriculture) क्षेत्रातील होत असलेल्या बदलांवर आणि नव्या संकल्पनांवर (New concepts) विचार करतो, तेव्हा एक प्रश्न उपस्थित होत्तो, येथे खरंच काही नवे घडत आहे का, की जुन्याच गोष्टी केवळ नव्या स्वरूपात पुन्हा मांडल्या जात आहेत?

अलीकडेच वर्धा जिल्ह्यातील गोपुरी येथे विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळाच्या परिसरातील विविध प्रकल्पांना भेटी देण्याचा योग आला. या भागात शेती आणि पूरक उद्योग यांची प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. पिकांवर आधारित उद्योग, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण सक्षमीकरण ही त्यामागची संकल्पना आहे. ग्रामस्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत शेतकरी आणि ग्रामीण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा त्यांचा उद्देश आहे.

त्याआधी सुमारे सवाशे वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा पंडिता रमाबाईनी आपला आश्रम पुण्याजवळील केडगाव या माळरानावर हलवला. तिथेही त्यांनी महिलांच्या सहकारातून कृषिपूरक उद्योगांची एक प्रयोगशाळा सुरू केली होती. आज शहरांमध्ये जशा ‘फूड बास्केट्स’ पोहोचतात, तसाच प्रयत्न त्यांनी तेव्हा केला होता. गेल्या दोन दशकांत भारतीय शेतीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, जे मी आणि माझ्यासोबतच्या पिढीने अनुभवले आहेत. शेती ही तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि सरकारी धोरणांनी कशी बदलती आहेत यावर उहापोह यात आहे.

🌀 माती, पाणी महत्त्व आणि बदल
गेल्या दोन दशकांत मातीच्या आरोग्याबद्दल आणि शेती क्षेत्रातील पाणी वापराबद्दल खूप जागरुकता बाढली आहे. सेंद्रिय कर्ब, मातीची गुणवत्ता आणि त्यातील असलेल्या घटकांची उपलब्धता यावर चर्चा करून शेतकरी गुणवत्ता टिकवणे आणि सुपीकता वाढवणे यावर अनेक प्रयोग करत आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे लक्षात आल्याने शेतकरी आता सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि जैविक घटकांचा वापर करण्याकडे वळले आहेत. माती आणि पाणी परीक्षणाचा सरकारी कार्यक्रम तितकासा यशस्वी झाला नसला तरी मातीची उत्पादनक्षमता टिकवण्यासाठी कमी मशागत, मल्चिंगसोबत सूक्ष्म सिंचन यासारख्या पद्धतींवर भर दिला जात आहे.

🌀 मजूर टंचाई आणि यांत्रिकीकरणाचा वेग
शेती क्षेत्रात कर्ज उपलब्धता सोपी झाल्याने मजुरांचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी जास्त यांत्रिकीकरण करण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. ट्रॅक्टर, नांगरणी यंत्रे, पेरणी मंचे, काढणी यंत्रे (हार्वेस्टर) आणि थ्रेशिंग मशीन्सचा वापर सामान्य झाला आहे. यामुळे वेळ आणि मजुरी दोन्हीमध्ये बचत झाली आहे. ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फवारणीसाठी सुरू झाला आहे. मानवी श्रमावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. फक्त यांत्रिकीकरण नव्हे तर त्यातील ऑटोमायझेशनवरदेखील भर दिला जात आहे. पूर्वी भारतात मशीन्स आयात होत होत्या, आता अनेक स्थानिक शेती मशीन्स निर्यात होत आहेत.

🌀 बियाणे किंवा आयात वाणे
संशोधन आणि विकासामुळे नवनवीन सुधारित बियाणे आणि संकरित वाणांची उपलब्धता आता वाढली आहे. दुष्काळ, रोग आणि कीटकांना प्रतिरोधक असणारे वाण विकसित होत आहेत. हायब्रीड वाणांमुळे पिकांची उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यासोबत स्थानिक वाणांचे जतन व्हावे याकरिता देखील अनेक संस्था आणि शेतकरी पुढाकार घेऊन काम करताना यात दिसत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांनी शोधलेल्या वाणांनादेखील मान्यता देत असल्याने अनेक शेतकरी स्वतः ये वाण बाजारात आणत आहेत. काही वर्षात सह्याद्रीसारख्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जागतिक बाजारात मागणी असलेले द्राक्ष आणि संत्रा फळ पिकांचे वाण भारतीय शेतीत आणले आहेत. फक्त भारतीय बाजारात टिकण्यासाठी नव्हे तर जागतिक बाजाराची स्पर्धा करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

🌀 निविष्ठा क्षेत्रातील बदल
दोन दशकांत निविष्ठा क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशकांच्या पारंपरिक वापरातून जैविक खते, बायो-कीटकनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे लक्ष वळले आहे. सरकारच्या धोरणांमुळे आणि शाश्वत शेतीच्या निर्यातक्षमतेची गरज ओळखून अनेक कंपन्यांदेखील सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक निविष्ठा आणत आहेत. शेतकन्यांना विविध निविष्ठा सहज उपलब्ध होत आहेत, पण या निविष्ठावरील अवलंबित्व वाढल्याने शेती क्षेत्रातील खर्चदेखील त्या प्रमाणात वाढला आहे.

🌀 डिजिटायझेशन, AI आणि ट्रेसीबिलिटी
शेतीमध्ये डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ट्रेसीबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू वाढत आहे. हवामानाचा अंदाज, मातीचे आरोग्य आणि पिकांची वाढ यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि सेन्सर्स वापरले जात आहेत. ‘एआय’च्या मदतीने पिकांच्या रोगांचे निदान, आवश्यक निविष्ठा आणि पाणी वापर करणे सोपे झाले आहे. ट्रेसीबिलिटीमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे ग्राहकांना उत्पादनाचा स्त्रोत शोधणे सोपे होते.

🌀 शेतीच्या समूहिकरणाचा प्रयत्न
प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग बानि निर्यात या सर्व गोष्टी एका छताखाली करणे एकट्या शेतकऱ्याला शक्य नसल्याने समूहाने शेतकरी निर्यातक्षम वाण उत्पादन करून त्याचे ब्रेण्डिग करून विक्री करत आहेत. याच वर्षी विदर्भातील ‘कृषक स्वराज ‘नामक कंपनीने मिरची पिकाची मूल्यसाखळी विकसित करून तसेच स्थानिक मिरची विविध निर्यातदार कॉर्पोरेटला सोबत घेऊन विविध देशात निर्यात केली. तेवढ्यावर न थांबता प्रक्रिया करून विविध उत्पादने बाजारात आणली आहेत.

शेती क्षेत्रातील बदल हा सहज सोप्या मार्गातून घडत नाही. त्यामुळे दहा हजार वर्षांचा शेतीचा इतिहास किती आर्थिक सक्षमता किती लोकांना देतो हा येणाऱ्या स्थित्यंतरांवर अवलंबून आहे. इतर क्षेत्रात जितक्या जलद गतीने बदल होतात तेवढ्या गतीने इकडे बदल होत नाहीत, पण बदल जरूर होत आहेत एवढे नक्की.

साभार :- दैनिक ‘सामना’

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!