krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Nutrition & Medicine : झाड असो की, माणूस… खाणं विसरून औषधावर जगणं काहीतरी चुकतंय गड्या!

1 min read

Nutrition & Medicine : कधीतरी आपल्या गावच्या चौकात जरा थांबा, निवांत नजर फिरवा. डावीकडे मोठ्ठं मेडिकल दिसेल, उजवीकडे पॅथॉलॉजी आणि समोर डोळे दिपवणारा हॉस्पिटलचा फलक! पण आपलं किराणा मालाचं दुकान कुठं गेलं? ते शोधायला लागावं लागतं आणि सापडलं तरी त्यात आपले किराणा डाळी, तेल, गूळ कुठं लपलेत, ते शोधावं लागतं! हेच आहे आपलं आजचं वास्तव, हीच आपल्या जगण्याची खरी परिस्थिती.

आज माणूस खाण्यापेक्षा औषधांवर (Medicine) जास्त खर्च करतोय आणि हे फक्त शहरापुरतं मर्यादित नाही. आपल्या खेड्यापाड्यातही आता डॉक्टरांच्या हातात लाखांची बिलं पडायला लागलीत. पण हेच लोक रोजच्या जेवणात काय खातात, पोटात खरंच पोषण (Nutrition) जातंय का, याचा विचारच करत नाहीत. हेच चित्र आपल्या शेतीत पण दिसतंय.

माणूस अन्नापेक्षा औषधांवर अवलंबून
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पाचं उदाहरण बघा ना! आरोग्य विभागावर 20,740 कोटी रुपये खर्च झालेत, तर अन्न व नागरी पुरवठा विभागावर फक्त 4,387 कोटी रुपये! यातही बहुतांश फक्त अनुदान आहे, थेट पोषणासाठी काहीच नाही. मुंबईसारख्या शहरात सरकार एका माणसावर वर्षाला आरोग्यावर ₹ 3,000 – 4,000 खर्च करतं, पण अन्न आणि पोषणावर मात्र फक्त ₹ 400 – 600. म्हणजे आरोग्यावर अन्नाच्या 7 ते 8 पट जास्त खर्च होतोय. याचा अर्थ काय? आधी आपलं खाणं बिघडलं आणि ते सुधारायला मग औषधं आली!

शेतीतही तसंच अन्नद्रव्यापेक्षा रोगावर लाखो खर्च
हेच चित्र आपल्या शेतातही दिसतंय, हो ना? आपल्या जमिनीचं, पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण विसरून गेलोय आणि कीड व रोग नियंत्रणावर मात्र अमाप खर्च करतोय.

फवारणीचा उत्साह पण जमिनीचं पोषण दुर्लक्षित
आज आपल्या शेतात टोमॅटो, मिरची, द्राक्षं, भोपळा, डाळिंब, पपई या पिकांना 10-15 वेळा फवारणी करावी लागते. कधीकधी एका फवारणीत 3-4 औषधं एकत्र मिसळली जातात. शेतकरी म्हणतात, ‘रोज 4-5 हजारांचं फवारतो. तरी रोग जात नाहीत.’ का जात नाहीत? कारण पिकाला लागणारी खरी ताकद – अन्नद्रव्यं – तीच दिली जात नाहीत.

उदाहरणार्थ, झिंक (Zinc) आणि बोरॉनची (Boron) कमतरता बघा. झिंक कमी असलं की झाडाची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात. बोरॉन कमी असलं की फळं लागत नाहीत, लागली तरी गळून पडतात.

पण ही अन्नद्रव्यं आपण कोणत्या स्वरुपात वापरतो? 50 रुपयांत मिळणारा झिंक सल्फेट (Zinc sulfate) वापरण्याऐवजी शेतकरी 500 रुपयांचं चिलेटेड (Chelated) किंवा ऑक्साईड (Oxide) फॉर्म विकत घेतात. कारण काय? मार्केटिंग! कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून आपण महागडी औषधं खरेदी करतो. सेंद्रिय खताचा विसर आणि रासायनिक अतिरेक करताे.

आज आपले शेतकरी सेंद्रिय कंपोस्ट, शेणखत, मळीखत याकडे पाठ फिरवत आहेत. एकेकाळी आपल्या शेतात फुकटात मिळणाऱ्या गोष्टींसाठी आता आपण बाजारातून बॅगा भरून खतं विकत घेतोय. बाजारात मिळणारी जैविक खतं – ती तर 50 टक्के माती आणि 50 टक्के भ्रम असतात!

✳️ जर आपण बेसल डोसमध्ये DAP (Diammonium Phosphate), म्युरेट ऑफ पोटाश (Murate of Potash), झिंक सल्फेट (सल्फेट खतं) योग्य प्रमाणात, सेंद्रिय कोटिंग करून दिली, तर…
🔆 मातीतील लाभदायक जिवाणू वाढतात.
🔆 रूट झोनमध्ये पिकाला अन्न सहज मिळतं.
🔆 फवारणीचा खर्च कमी होतो.
🔆 उत्पन्न आणि फळांची गुणवत्ता वाढते.

✳️ उपाय : पोषणावर आधी लक्ष – मग संरक्षण
यावर एकच उपाय आहे, मित्रांनो! पोषणावर आधी लक्ष द्या, मग संरक्षणाचा विचार करा.

बेसल डोसमध्ये सल्फेट खतांचा वापर करा
🔆 झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, पोटॅशियम सल्फेट.
🔆 हे चिलेटेडपेक्षा 80 टक्के स्वस्त असतात आणि त्यांची बायो उपलब्धता (पिकाला मिळण्याचं प्रमाण) अधिक असते.

सेंद्रिय खतांना पुन्हा स्थान द्या
🔆 शेणखत, कंपोस्ट, बायोगॅस स्लरी यांचा वापर वाढवा.
🔆 ही खतं अन्नद्रव्य शोषणात मदत करतात.

फवारणीचे नियोजन फक्त गरजेनुसार करा
🔆 पाऊस, तापमान, आर्द्रता यांच्या आधारे रोग भविष्यवाणी करूनच फवारणी करा.
🔆 बायोफंगीसायड्स व ट्रायकोडर्मा यांचा वापर करा.

जमिनीच्या आरोग्याचे प्रमाणपत्र घ्या, मृदा परीक्षण करा
🔆 अंदाजे खतं न टाकता, जमिनीच्या रिपोर्टनुसार खत व्यवस्थापन करा.

संशोधन संस्था व कृषी विद्यापीठांची मार्गदर्शक खत योजना वापरा
🔆 प्रत्येक पिकाची अन्नद्रव्यांची गरज वेगळी असते, ती समजून घ्या.

✳️ शेवटी… झाडं असो की माणूस – दोघांचं पोषण सर्वप्रथम!
आपण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक साधं, सोपं तत्त्व विसरलो आहोत – ‘खाणं नीट असेल तर औषध लागत नाही!’ झाडांचं पण तसंच आहे. जर झाडांना योग्य प्रमाणात आणि योग्य स्वरूपात अन्नद्रव्यं मिळाली, तर कीड आणि रोग कमी येतात, उत्पादन वाढतं आणि औषधं कमी लागतात.

आज आपल्याला हॉस्पिटलचं बिल 50,000 रुपये असणं सामान्य वाटतं, पण खाण्याचं बिल 500 जास्त लागले तर आपण ‘महाग झालं’ असं म्हणतो. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. आपण जर पोषणावर, अन्नावर, मूलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं, तर आपला माणूसही वाचेल आणि आपली पिकंही! नाही का?

तुमच मत काय? माझं चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!