Rain forecast : राज्यात कुठे मध्यम तर कुठे किरकाेळ पाऊस
1 min read
Rain forecast : लहान एकादशी अर्थात पहिला श्रावण साेमवार (दि. 21 जुलै)पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जाेरदार (Moderate to heavy rain) आणि काही जिल्ह्यामध्ये तुरळक व किरकाेळ पावसाची शक्यता (Rain forecast) निर्माण झाली आहे.
🔆 मध्यम ते जोरदार पाऊस
मुंबईसह संपूर्ण कोकण विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यात, संपूर्ण विदर्भ विशेषतः अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ या आठ जिल्ह्यात तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे व सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी व चांदगड या तालुक्यांच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात नंदुरबार, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड व परभणी अशा 10 जिल्ह्यात म्हणजेच राज्यातील एकूण 32 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
🔆 तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटा खालील वर्षच्छायेच्या प्रदेशातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व सातारा जिल्ह्यातील तालुक्यात 21 ते 28 जुलै या आठवड्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔆 जुलै महिन्याचा अंदाज व सध्यस्थिती
11 ते 24 जुलै दरम्यानच्या दोन आठवड्यात कोकण व विदर्भ वगळता संपूर्ण खान्देश, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा अशा एकूण 18 जिल्ह्यात अंदाजानुसार तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस वजा जाता उघडीपच जाणवत आहे. परंतु, त्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजे सोमवार दि. 21 जुलैपासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रासाठी सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाचा अंदाजाची पूर्तता येणाऱ्या 10 दिवसातील मध्यम ते जोरदार पावसामुळे होण्याची शक्यता जाणवते.
🔆 जल आवक व धरण संचयसाठा स्थिती
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा,भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती नद्यांच्या खोऱ्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीतही या 21 ते 28 जुलैच्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे नजीकच्या काळात जायकवाडी धरणही त्याच्या शतकी जलसाठ्याकडे झेपवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.