Liquor shops increasing : प्रिय अजितदादा, दारूची दुकाने वाढवून लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका!
1 min read
Liquor shops increasing : दादा, राज्यात 328 नवी दारूची दुकाने (Liquor shops) उघडण्याचा निर्णय जवळपास होणार आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे. यासाठी 50 वर्षांपासून एकही दुकान न वाढवण्याचा तेव्हापासून सर्व सरकारने पाळत आणलेला निर्णय तुम्ही मोडीत काढला हे जास्त वाईट आहे… दादा, ज्या लाडक्या बहिणींनी तुमचे सरकार निवडून दिले. तुमच्यावर विश्वास टाकला. त्यांचेच संसारात माती कालवण्याचे काम तुम्ही भाऊ म्हणून करत आहात… या बहिणींचे तळतळाट तुम्ही घेत आहात, हे अत्यंत स्पष्टपणे सांगावे लागेल… एकीकडे लाडक्या बहिणीला 1,500 द्यायचे आणि तिच्या नवऱ्याने ते हिसकावून घेत दारू दुकानातून पुन्हा सरकारकडे द्यायचे, या वसुलीसाठी ही दुकाने तुम्ही आणत आहात का?
⭕ दादा… मुळात तुम्ही सरकारात असताना 2011 साली तुमच्याच सरकारने व्यसनमुक्ती धोरण मंजूर केले. त्या धोरणात राज्य व्यसनमुक्त करण्यासाठी दारूचा खप कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अभिवचन दिले आहे आणि ते धोरण आणणारे तुम्ही आज 328 दुकाने वाढवत आहात, हे कसे समजून घ्यायचे सांगा ना? एकतर ते धोरण मागे घेतल्याचे जाहीर करा, ते धोरण फाडून टाका आणि मगच असले विसंगत निर्णय घ्या.
⭕ अगोदरच महाराष्ट्रात गावोगावी दारू मिळते. लायसन्सची दुकाने जरी प्रत्येक तालुक्यात 10 असली तरी ते दुकानदार आजुबाजूच्या 10 गावात दुकाने, हॉटेल येथे दारू पोहोचवतात. तिथे अवैध दारू म्हणून ती विकली जाते. त्यामुळे आज लायसन्स जितक्या गावात आहेत, त्याच्या किमान 10 पट गावात दारू खुलेआम विकली जात आहे. आमच्या नगर जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी ग्रामीण भागात तर किराणा दुकानदार दुकानात ही अवैध दारू विकतात, असे समजते. हीच परिस्थिती अनेक तालुक्यात आहे. अनेक विक्रेत्यांनी तरुण मुलांमार्फत रोज खेड्यात दारू पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. इतकी प्रचंड दारू गावागावात आज विकली जाताना आणखी दुकाने आणून आणखी 3,000 गावे नासवायची आहेत का दादा?
⭕ एखाद्या युद्धात जितकी माणसे मरत नसतील तितकी माणसे आज दारूने मेली आहेत दादा… भारतात दरवर्षी 4 लाख 82 हजार माणसे दारूने मरतात. अप्रत्यक्ष रितीने दारूमुळे अपघात आणि आजाराने मरणारे मोजले तर
ही संख्या 10 लाख असेल. एखाद्या युद्धात मेली नसतील, त्यापेक्षा जास्त माणसे दारूने मरतात. माझ्या गावात गरीब वस्तीत 398 कुटुंबे आहेत, त्यात 23 तरुण दारू पिऊन मेले आहेत. किनवट येथील गरीब वस्तीत एका तरुणाने मला दारूने मेलेल्या 54 जणांची यादी दाखवली होती. इतके हे भयानक आहे. वस्ती-वस्तीत गावा-गावात आज माणसे मरत आहेत. मी विधवा महिलांवर काम करतो. नवरा कशाने वारला हे विचारले की, बहुतेक महिला दारू हेच कारण सांगतात. लाडक्या बहिणींना दीड हजारांपेक्षा त्यांचे नवरे जिवंत असायला हवेत दादा आणि त्यांचे रक्षण करायचे सोडून सरकार दुकाने वाढवून गरिबांच्या मरणाची तिरडी बांधत आहात.
⭕ मुळात दारूचे उत्पन्नातून सरकारला फायदा होत नाही, हे अनेक अभ्यास सिद्ध करतात. बंगळुरू येथील NIMHAN या संस्थेने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, दारूने सरकारला जो महसूल मिळतो, त्यापेक्षा जास्त खर्च सरकारला दारूमुळे जे प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्यासाठी खर्च करावा लागतो. दारूमुळे माणसांची कार्यक्षमता कमी होते. दारूमुळे गुन्हेगारी वाढते, आरोग्यावर सरकारला जास्त खर्च करावा लागतो, उत्पादन शुल्क जमा करण्यासाठी त्या यंत्रणेवर खर्च करावा लागतो. त्यामुळे हा गैरसमज दूर करायला हवा. जर लोक दारू पिले नाही तर ती रक्कम इतर टॅक्स मधून सरकारकडे येते हे बिहारमधील उदाहरणातून स्पष्ट होते. बिहारमध्ये दारुबंदी झाल्यावर कपडे, धान्य, दूध, लहान मुलांच्या वस्तू यांचा खप वाढला. गरीब लोक यावर खर्च करायला लागले. इतके हे स्पष्ट असताना सरकार का दारू हाच एकमेव मार्ग मानते आहे ?
⭕ एकीकडे गुजरात मॉडेलवर निवडणुका भाजपाने जिंकल्या. ते गुजरात जर खरेच विकसित असेल तर मग दारूचा आधार नसताना त्यांनी विकास कसा केला? याचे उत्तर भाजपने द्यावे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक भाजप लढवतो आहे. त्या नितीशकुमार यांनी दारुबंदी खूप चांगल्या रितीने हाताळली आहे. मी स्वतः बिहारमध्ये जाऊन तेथील दारूबंदीचा अभ्यास करून आलो. सरकारची इच्छाशक्ती असेल तर किती प्रभावी दारुबंदी होऊ शकते याचे बिहार उदाहरण आहे. तक्रार करण्याच्या हेल्प लाइनवर दारू विकण्याची तक्रार केली की, दोन तासात तक्रार करणाऱ्याला पुन्हा फोन करून कारवाई काय केली हे सांगितले जाते. दारू ज्या ठिकाणी विकली जाईल त्या घर मालकावर केस केली जाते आणि 8 लाख दारू विकणारे तुरुंगात घातले. इतका कठोर दृष्टिकोन दाखवला आहे. भाजप सरकार नितीशकुमार यांचेकडून काही शिकेल का..?
⭕ दादा, सर्वात चिंता तरुण मुलांची वाटते. 1990 साली दारू पिण्याचे महाराष्ट्रातील सरासरी वय हे 19 होते. 2006 साली ते 16 वर्षाचे होते आणि आज 13 वर्षाची पोरे चिल्लर पार्टी करत आहेत. निवडणुका आणि वराती या नव्याने दारू प्यायला शिकवणारी प्रशिक्षण केंद्र झाली आहेत. राज्यातील तरुणाई इतकी नासत असताना आणखी दारू दुकाने आणून तुम्ही काय साधणार आहात दादा…?
तेव्हा राज्याचा महसूल वाढवायला इतर मार्ग आहेत, पण त्यासाठी गरिबांच्या संसारात हात घालून आया बहिणींचे तळतळाट घेऊ नका…!