Rain forecast : दोन आठवडे उघडीपीचीच शक्यता
1 min read
Rain forecast : आगामी दाेन आठवडे म्हणजेच शुक्रवार (दि. 11 जुलै)पासून तर गुरुवार (दि. 24 जुलै)पर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात काहीशा उघडीपीचीच (उघाड) शक्यता निर्माण झाली आहे. या काळात मुंबईसह कोकणातही केवळ मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता (forecast) आहे.
या दाेन आठवड्यांमध्ये संपूर्ण विदर्भ तसेच सांगली, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात गुरुवार (दि. 17 जुलै) व शुक्रवार (दि. 18 जुलै)ला दोन दिवस केवळ मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते. उत्तर जळगाव जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये रविवार (दि. 13 जुलै)पासून पुढील चार दिवस म्हणजेच बुधवार (दि. 16 जुलै)पर्यंत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔆 पावसाच्या उघडीपचे कारण
बंगालच्या उपसागारात तयार झालेले कमी दाब क्षेत्र हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत असून, पश्चिम बंगाल व ओडिशातून उत्तर व उत्तर – वायव्येकडे मार्गक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकल्यामुळे या दोन आठवड्यात पावसाचा जोर कमी जाणवत आहे. या जोडीला जागतिक पातळीवर ही दोन घटना महाराष्ट्रातील पावसासाठी सध्या मारक ठरत आहे.