Monsoon Rain : मान्सून प्रगतीपथावर मध्यम पावसाची शक्यता
1 min read
Monsoon Rain : संपूर्ण उत्तर भारतात मान्सून (Monsoon) त्याच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे म्हणजे त्याचे सरासरी तारखेचे सातत्य ठेवून सध्या बरोबर पुढे झेपावत आहे. सध्या देशाचा साधारण 85 टक्के भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील 15 दिवसात कदाचित तो संपूर्ण देश काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीत मान्सून जबरदस्तपणे कोसळत आहे. कोकण किनारपट्टीप्रमाणे संपूर्ण गुजरात व मध्य प्रदेशातही मान्सून सेट झाला आहे. त्याच्या प्रेरित परिणामातूनच महाराष्ट्रातील खानदेश, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात मान्सून पावसाच्या (Rain) आशा काहीशा पल्लवीत झाल्या आहे.
🔆 मध्य महाराष्ट्रातील पाऊस
आज (रविवार, दि. 22 जून)पासून पुढील सात दिवस म्हणजे शनिवार, दि. 28 जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मात्र जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
🔆 मराठवाड्यातील पाऊस
छत्रपती संभाजीनगर व जालना हे दोन जिल्हे वगळता बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात पुढील 10 दिवस म्हणजे मंगळवार, दि. 1 जुलैपर्यंत केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔆 विदर्भातील पाऊस
मंगळवार, दि. 24 जूनपासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार, दि. 28 जूनपर्यंत विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरित वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मात्र मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
🔆 कोकणातील पाऊस
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 10 दिवस म्हणजे मंगळवार, दि. 1 जुलैपर्यंत सध्या जाणवतो तसा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यताही कायम आहे.