Import duty, Soybean prices : खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात, साेयाबीनचे दर ‘एमएसपी’पेक्षा कमी राहणार!
1 min read
Import duty, Soybean prices : केंद्र सरकारने कच्च्या साेयाबीन, सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क (Import duty) 20 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. हा निर्णय 30 मे 2025 राेजी घेण्यात आला. शुल्क कमी केल्याने या तिन्ही तेलांची आयात वाढणार असल्याने ऑक्टाेबर 2025 पासून पुढे साेयाबीनचे दर (Soybean prices) किमान आधारभूत किमती (MSP – Minimum support price)पेक्षा कमी राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील साेयाबीन उत्पादकांना जबर फटका बसणार आहे. दुसरीकडे, गेल्या एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती 6 ते 7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मे 2025 मध्ये पामतेलाची आयात 84 टक्क्यांनी वाढली असून, 5.93 लाख टन एवढी आहे. ही गेल्या सहा महिन्यातील उच्चांकी आयात आहे.
♻️ बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
केंद्र सरकारने 2024 मध्ये कच्च्या खाद्यतेलावर 20 टक्के, तर रिफाइंड खाद्यतेलावर 29.75 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला हाेता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीसाठी 27.50 टक्के, तर रिफाइंड तेलासाठी 35.75 टक्के शुल्क द्यावा लागायचा. देशात साेयाबीन पेरणीची धावपळ सुरू हाेताच केंद्र सरकारने बिहार व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 30 मे 2025 राेजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये 50 टक्क्यांनी कपात केली आहे. रिफाइंड साेयाबीन, सूर्यफूल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीला उपकरांसह 16.50 टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे. कच्च्या साेयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेल खाद्यतेलावरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD – Basic Customs Duty) 20 टक्क्यांवरून 10 टक् केल्याने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांमधील आयात शुल्कातील फरक 8.75 टक्क्यांवरून 19.25 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
♻️ तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मारक निर्णय
देशांतर्गत खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी तसेच तेल शुद्धीकरण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिनाभरात खाद्यतेलांच्या किमती 6 ते 7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या किमती आणखी कमी हाेण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना दिलासा मिळेल. दुसरीकडे, साेयाबीनसह अन्य तेलबियांचे दर आताच दबावात आले आहेत. ऑक्टाेबर 2025 पासून शेतकऱ्यांचे साेयाबीन बाजारात यायला सुरुवात हाेईल. त्यावेळी साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल 4,000 रुपयांपेक्षा कमी राहील. कारण देशातील उद्याेगांकडे शुद्धीकरणासाठी आयात केलेल्या पुरेश कच्च्या तेलाचा साठा असेल. त्यांना साेया ढेपे विकण्याची चिंता नसेल. त्यामुळे हे उद्याेग माेठ्या प्रमाणात साेयाबीनची खरेदी करणार नाही. याच दराचा परिणाम माेहरीवर हाेणार असून, दर कमी मिळाल्यास रब्बी हंगामात माेहरीचे पेरणीक्षेत्र कमी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देणारा केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे.
♻️ पेट्रोलियम उत्पादन व पामतेल
येत्या काळात खाद्यतेलांच्या किमती दबावात राहतील. तथापि, इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढू शकतात, अशी शक्यता खाद्यतेल उद्याेगांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियाकडून भारतात आयात हाेणाऱ्या पामतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत जास्त वाढ झाल्यास इंडोनेशिया पेट्रोलियम उत्पादनांना पर्याय म्हणून पामतेलाचा अधिक वापर करण्याचा निर्णय घेऊ शकते. त्याचा परिणाम पामतेलाच्या दरवाढीवर हाेणार आहे. पुढे याच बाबींचा वापर देशांतर्गत बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार करून खाद्यतेलाच्या किमतीत वाढ करण्यासाठी केला जाऊ शकताे. ही परिस्थिती ऑक्टाेबरच्या शेवटी किंवा नाेव्हेंबरच्या सुरुवातीला उद्भवू शकते.
♻️ पामतेल आयात वाढली
सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या तुलनेत पामतेलाच्या किमती कमी असल्याने रिफायनर्स पामतेलाची खरेदी वाढवत आहेत. त्यामुळे मे 2025 मध्ये भारताची पामतेल आयात सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. मे महिन्यात पामतेल आयात एप्रिलच्या तुलनेत 84 टक्क्यांनी वाढून 5.93 लाख टन झाली. नोव्हेंबर 2024 नंतरची ही सर्वाधिक पामतेल आयात आहे. सोयाबीन तेल आयात 10.4 टक्क्यांनी वाढून 3.99 लाख टन झाली आणि सूर्यफूल तेल आयात 1.9 टक्क्यांनी वाढून 1.84 लाख टन झाली. मे महिन्यात भारताची एकूण वनस्पती तेल आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढून 11.9 लाख टन झाली. डिसेंबर 2024 नंतरची ही सर्वाधिक आयात आहे, अशी माहिती सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA – Solvent Extractors Association of India)च्या सूत्रांनी दिली. भारत आपल्या मागणीच्या 70 टक्क्यांपेक्षा वनस्पती तेलाची आयात करून गरज भागवते. भारत इंडोनेशिया व मलेशिया येथून पामतेल आणि अर्जेंटिना व ब्राझिल येथून सोया तेल आणि रशिया व युक्रेनमधून सूर्यफूल तेल आयात करते.
♻️ ऑगस्टपासून डिलेव्हर सुरू
यात सर्वाधिक कच्च्या साेयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी साैदे सुरू केले असून, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये ते तेल देशात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे साेयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर 3,500 ते 3,800 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार शेतकऱ्यांकडील संपूर्ण साेयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची सुतराम शक्यता नाही.
♻️ ब्राझिलचे साैदे 11 डाॅलर प्रतिबुशेल
ब्राझिलमध्ये साेयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन 2026 साठी त्यांच्या साेयाबीनचे 11 डाॅलर प्रतिबुशेल (1 बुशेल-27.22 किलाे) दराने आताच साैदे केले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात साेयाबीनचे दर 3,458 ते 3,550 रुपये प्रतिक्विंटल असेल. या हंगामासाठी केंद्र सरकारने साेयाबीनची एमएसपी 5,328 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील खाद्यतेल उत्पादक कंपन्यांच्या फायद्याचा ठरणार असून, शेतकऱ्यांना मात्र ‘एमएसपी’पेक्षा कमी दरात साेयाबीन विकावे लागणार आहे.