krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agricultural Import : भारताचा शेतमाल निर्यातीपेक्षा आयातीला प्राधान्य

1 min read

Agricultural Import : मागील काही वर्षात केंद्र सरकारने शेतमालाची निर्यात (Agricultural export) वाढविण्यावर भर देण्यापेक्षा आयातीला (Import) प्रधान्य दिले आहे. सन 2024-25 मध्ये भारतातील विविध शेतमालाच्या आयातीत सरासरी 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात 2,700 काेटी डाॅलर्स किमतीच्या शेतमालाची आयात केली आहे. या आयातीसाठी माेठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागत असले तरी त्याचे साेयसुतक कुणालाही नाही. दुसरीकडे, सन 2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय शेतमालाच्या निर्यातीत (Export) 12.69 टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने त्यांच्या आकडेवारीत स्पष्ट केले आहे.

♻️ आयातीवरील एकूण खर्च
सन 2024-25 या आर्थिक वर्षात विविध डाळवर्गीय पिकांची आयात 46 टक्क्यांनी तर कापसाची आयात दुपटीने वाढली आहे. केंद्र सरकारने तूर, हरभरा, उडीद, पिवळा वाटाणा या शेतमालाची आयात शुल्कमुक्त केली असल्याने या कडधान्यांसाेबतच खाद्यतेल, फळे आणि भाजीपाला यांच्या आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. या शेतमालाच्या आयातीवर सन 2023-24 मध्ये 2,213 काेटी डाॅलर्स तर सन 2024-25 मध्ये 2,700 काेटी डाॅलर्स एवढे परकीय चलन खर्च करण्यात आले.

♻️ खाद्यतेल
भारताच्या एकूण शेतमालाच्या आयातीत खाद्यतेलाची (Edible oil) आयात प्रथम क्रमांकावर असून, त्यानंतर सर्वाधिक म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर विविध डाळी (Pulses) व कडधान्यांची आयात करण्यात आली. फळे (Fruits) व भाजीपाल्याच्या (Vegetables) पिकांची आयात तिसऱ्या क्रमांकावर असून, चाैथ्या क्रमांकावर कापसाची (Cotton) आयात केली असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. सन 2024-25 या आर्थिक वर्षात खाद्यतेलाच्या आयातीवर 1,733 कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले. सन 2023-24 मध्ये खाद्यतेलाच्या आयातीवर 1,487 काेटी डाॅलर्स खर्च करण्यात आले हाेते. अर्थात खाद्यतेलाच्या आयातीचा खर्च हा 16.55 टक्क्यांनी वाढला आहे. खाद्यतेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळेही हा खर्च वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. सन 2023-24 मध्ये 155 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले तर सन 2024-25 मध्ये ही आयात 160 लाख टन एवढी हाेती. यात पाम (Palm), सूर्यफूल (Sunflower) व साेयाबीन (Soybean) तेलाचा (Oil) समावेश आहे.

♻️ डाळी
केंद्र सरकारने तूर (Tur), हरभरा (Gram), उडीद (Urad), मसूर (Lentils) व पिवळ्या वाटाण्याची (Yellow peas) आयात शुल्कमुक्त केल्याने भारतात या शेतमालाची आयात वाढली आहे. सन 2023-24 च्या तुलनेत सन 2024-25 मध्ये ही आयात 46 टक्क्यांनी वाढली असून, त्यावर 547 कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले. सन 203-24 मध्ये 44 लाख टन डाळींची आयात करण्यात आली हाेती तर 2024-25 मध्ये ही आयात 67 लाख टनांवर पाेहाेचली आहे.

♻️ कापूस
कापसाची आयात दुपटीने वाढली आहे. देशात कापसाच्या उत्पादनात सातत्याने घट हाेत असून, जागतिक बाजारातील कापसाचे दर भारतातील दराच्या तुलनेत थाेडे कमी असतात. सन 2023-24 मध्ये 59 लाख डाॅलर्स तर सन 2024-25 मध्ये 129 लाख डाॅलर्स किमतीच्या कापसाची आयात करण्यात आली. फळे व भाजीपाला यांची आयात सरासरी 11 टक्क्यांनी वाढली आहे. यात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, अवाकॅडो, बेरीज अशा फळांचा समावेश आहे. या शेतमालाच्या वाढत्सया आयातीमुळे देशांतर्गत बाजारात दर दबावात येतात आणि भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पेरणी क्षेत्रासाेबत उत्पादन घटत असून, भारताचे परावलंबित्व वाढत चालले आहे.

♻️ निर्यात पाेहाेचली 5,000 काेटी डाॅलर्सवर
भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण शेतमालाच्या निर्यातीत कृषी व प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) अंतर्गत येणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीचा वाटा सुमारे 51 टक्के आहे. अपेडा अंतर्गत येणाऱ्या शेतमालाची निर्यरत 12.69 टक्के वाढली असून, ती 2,514 काेटी डाॅलर्सवर पाेहाेचली आहे. त्यामुळे भारताची एकूण शेतमाल निर्यात 5,000 काेटी डाॅलर्सवर पाेहाेचली. सन 2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय तांदळाच्या निर्यातीत 19.73 टक्के वाढून ती 1,247 काेटी डाॅलर्सवर डॉलर्सवर पोहोचली. मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि कुक्कुटपालन उत्पादनांची निर्यात 12.57 टक्क्यांनी वाढून ती 5,09 काेटी डाॅलर्स, फळे व भाज्यांची निर्यात 5.67 टक्क्यांनी वाढून ती 3,86 काेटी डाॅलर्स तर धान्य उत्पादने आणि इतर प्रक्रिया वस्तूंची निर्यात 8.71 टक्क्यांनी वाढून ती 3,86 काेटी डाॅलर्सवर पोहोचली. सागरी उत्पादनांची निर्यात 0.45 टक्क्यांनी वाढून ती 740 काेटी डाॅलर्स, सेंद्रिय अन्नधान्य निर्यात 34.6 टक्के वाढून 6,659 लाख डाॅलर्सवर पाेहाेचली आहे. जी सन 2023-24 मध्ये 4948 लाख डाॅलर्स हाेती. ही निर्यात 41 टक्क्यांनी वाढून 3.7 लाख टन झाली आहे. सेंद्रिय डाळींची निर्यात 525 लाख डाॅलर्सवरून 1,789 लाख डाॅलर्सवर पाेहाेचली आहे, असा दावा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने केला आहे.

♻️ चहा, कॉफी, तंबाखू निर्यातीत वाढ
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चहा, कॉफी व तंबाखूसह इतर शेतमालाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2024-25 मध्ये भारतातून 9,238 लाख डाॅलर्स किमतीच्या चहाची निर्यात करण्यात आली. 2023-24 च्या तुलनेत चहाच्या निर्यातीत 11.84 टक्के वाढ झाली. कॉफी निर्यात 40.37 टक्क्यांनी वाढून ती 180 काेटी डॉलर्सवर पोहोचली. तंबाखू निर्यात 36.53 टक्क्यांनी वाढून ती 197 काेटी डॉलर्सवर पोहोचली.

♻️ तेल पेंड व काजू निर्यात घटली
2024-25 मध्ये भारतातील तेलबियांच्या निर्यातीत 6.45 टक्क्यांनी तर तेल पेंडीची निर्यात 21.56 टक्क्यांनी घटली. ही निर्यात 134 काेटी डॉलरवर आली आहे. काजू निर्यात 12.58 टक्क्यांनी घसरून 253.1 लाख टनांवर आली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात काजू निर्यात 0.30 टक्क्यांनी घटून 33.8 कोटी टनांवर आली आहे. व्हिएतनाम हा काजू निर्यातीत अग्रस्थानी आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर 46 टक् आयात शुल्क आकारल्याने भारतीय काजू निर्यातीत वाढ होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

♻️ मसाल्यांच्या निर्यातीत घट
मार्च महिन्यात भारतातील मसाल्यांच्या निर्यातीत 9.46 टक्क्यांची घट झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात देशातील मसाल्यांच्या निर्यातीत 4.78 टक्क्यांनी वाढ होऊन ती 445 काेटी डॉलर्सवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाची संपूर्ण आकडेवारी विचारात घेता भारताची शेतमाल आयात ही निर्यातीपेक्षा कमी असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!