Cow : गोमये वसते लक्ष्मी : खरचं तथ्य किती?
1 min read
Cow : यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल हा दिवस राज्यात ‘मुंबई मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे करण्यात आले आहे, या निमित्ताने गोमय मूल्यवर्धन आणि विज्ञान युगातील उपयुक्तता याचा विचार आवश्यक ठरतो.
भारतीय संस्कृतीत गोवंश (Cow) रक्षणासाठी आर्थिक स्त्रोत सतत उपलब्ध असण्यासाठी उपयुक्ततेचे अनेक मार्ग वर्णन केले आहेत, त्यातील गोमय भाग खतातून शेती उत्पादकता, अच्छादनातून उष्णतारोध, पर्यावरण रक्षण, मानवी आरोग्य रक्षण यासह अनेक फायदे शाश्वत दिसून आले आहेत. पंचगव्य उपचार पद्धती आयुर्वेदिक उपचारात अनेक मानवी रोगांसाठी प्रभावी आणि फायद्याची असल्याने पुरातन काळापासून अवलंबात येत आहे. गृह उपयोगी वस्तू, शोभिवंत संसाधने, रंग निर्मिती, कागद निर्मिती या क्षेत्रात कल्पकतेच्या क्षितिजांची परिसीमा दिवस वाढत आहे.
राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातून सर्व नगर प्रशासनांना मानवी अंत्यसंस्कारासाठी गोकाष्ठ वापराबाबत सूचना प्रदान करण्यात आलेल्या आहेत. शेतीसाठी सेंद्रिय कर्ब हाच मोठा प्रश्न सोडवण्यासाठी जीवामृत, गोकृपा अमृत अशा अनेक भूमी उपचार पद्धती सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. गोमयामुळे देशी गोवंश हा खताचा कारखाना, इंधन स्त्रोत, बायोगॅस स्त्रोत, नैसर्गिक जंतुनाशक, कृमी कीटक रोधक, भूमी रक्षक, बांधकामाचा घटक, पारंपारिक मानवी उपचार औषधी यासह अनेक प्रकारे आपल्या समृद्ध परंपरेत उपयुक्त ठरत ठरला आहे.
गोमयाबाबत प्रयोगशाळेत पृथ:क्करण केल्यास चाऱ्याचा न पचलेला भाग ज्यात सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लिग्निन यांचा समावेश तर पाणी आणि सर्व प्रकारच्या सूक्ष्मजीवांसह जीवाणू यांचा समावेश असतो. महत्त्वाची बाब अशी की, अनेक सेंद्रिय प्रकारच्या बाबी विघटित होऊन ह्यूमस या उपयुक्त भागासह विविध प्रकारचे क्षार गोमयात दिसून येतात. माती – पाणी – वनस्पती – प्राणी या निसर्ग साखळीस पुन्हा पुन्हा सजीव करण्याचे काम गोमयाद्वारे होते. देशी गोवंशाच्या गोमयात मोठ्या प्रमाणात उपयुक्त सूक्ष्मजीव जिवाणू आणि कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि कॉपर हे पिकांच्या वाढीचे घटक असतात. लवकर कुजण्याची प्रक्रिया देशी गोवंशाच्या गोमयात घडते. म्हशींच्या तुलनेत देशी गोवंशाच्या गोमयात अधिक कर्ब आणि सेंद्रिय प्रमाण दिसून येते.
सतत बदलत जाणाऱ्या मानवी जीवनशैलीत एकविसाव्या विज्ञान युगातील पिढी आम्ही गोरक्षक, गोसेवक, गोप्रेमी आहोत म्हणून मिरवताना गोउत्पादनांचा वापर स्वतः करत असेल तरच गोमय मूल्यवर्धनास महत्त्व निर्माण होईल. केवळ दंतमंजन आणि साबण अशा दोन प्रकारच्या गोमय मूल्यवर्धित बाबी घरोघरी दैनंदिन वापरात आल्यास खऱ्या अर्थाने राज्यातील गोमातेस राज्यमातेचा दर्जा सार्थ ठरेल. वसतिगृहात शिकणारी पिढी संस्कारक्षम असते म्हणून गोमय उत्पादित दंतमंजन आणि साबण वापरण्याची सवय काटेकोरपणे लावली गेल्यास मौखिक आरोग्य आणि सतेज कांती बुद्ध्यांक वाढवण्यास सहाय्यभूत ठरेल.
भौतिक अवस्थेत उपलब्ध असणाऱ्या गोमयाचा शास्त्रीय अभ्यास भारतीय अभियंत्यांनी केला असून त्यातील लिग्निन, सेल्युलोज म्हणजे तंतू आणि हेमी सेल्युलोज या घटकांचा भाग अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो आकारात उपलब्ध करून गोमयाची उपयुक्तता 100 पटीने अधिक असल्याचे सिद्ध केले आहे. लिग्निनच्या अंतर्भावामुळे गोमयाचा महत्त्वाचा उपयोग डिंकासारखा चिकटणारा भाग म्हणून सिमेंट सारखा करण्यात येत आहे. हलक्या वजनाच्या, उष्णतारोधक, अधिक पोकळ गोमय विटा बांधकाम क्षेत्रात उद्या वापरण्यात येणाऱ्या सिमेंट पेक्षा पस्तीस टक्के अधिक ताकद क्षमता असल्याने निर्माण केल्या जात आहेत. औषधी मात्रा पोटात नेण्यासाठी अतिसूक्ष्म गोमय वेस्टने वापरून शरीरात योग्य ठिकाणी औषधी पोहोचवण्याची पद्धती करण्यात येत आहे. त्वचेवर उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने विघटन पावणारा संरक्षक द्रव सौंदर्यप्रसाधनात गोमयातून निर्माण करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर जखमेवर वापरण्यात येणारी पट्टी नॅनो सेल्युलोस वापरातून तयार करून प्रतिजैवकांची गरज पूर्णपणे टाळणे शक्य आहे.
जगातील विस्तीर्ण भूमी वाळवंटी असून शेतीसाठी उपयुक्त नाही, त्यामुळे गोमयाच्या नॅनो सेल्युलोज वापरातून आहे त्या तणक, वालूकामय भूपृष्ठभागात पाणी धरून ठेवणारा घटक निर्माण करून शेती उत्पादन शक्य होणार आहे. वाळवंटातील अशी शेती म्हणजे सेंद्रिय सुपीक जमिनीची निर्मिती ठरणार आहे. मानवी अन्नपदार्थ, फळे, फुले, कारखान्यातील उत्पादने योग्य प्रकारे ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय पातळ ते सुरक्षित जाड असा कागद आणि आवेष्टने तयार करण्यासाठी गोमयाचा वापर अगदी पर्यावरण पूरक ठरणार आहे, आणि प्लास्टिक वापरासाठी पर्याय उपलब्ध होत आहे. गोमयातील तंतुमय सेल्युलोज कपडा निर्मितीसाठी आणि पाणी शोषक- पाणी रोधक अशा वापरासाठी उपयोगात आणला जात आहे.
गोमया बाबत अभियांत्रिकी क्षेत्रात सुरू असलेले संशोधन आणि नवनवीन निष्कर्ष बाजारपेठेत पोहोचण्यास फार वेळ लागणार नाही, कारण भारतीय अभियांत्रिकी संस्थेतील तज्ञ याबाबत युद्ध पातळीवर काम करत आहेत. गोमयातील किंमत अशा संशोधनातून सिद्ध होणार असल्यामुळे भारतीय गोवंश ‘वेद आणि विज्ञानाचा सेतू ठरणार आहे’, यासाठी गोसेवकांची नव्हे तर गो उत्पादने वापरासाठी स्वीकृत करणाऱ्यांची गो उद्योजकांची पिढी गरजेची आहे. 21 व्या शतकात विज्ञान सिद्धता हीच स्वीकृती मानणारी पिढी एवढ्या मोठ्या गोमय क्रांतीसाठी सज्ज झाली असताना सामान्य नागरिकात सामाजिक जागृती आणि विचारांची प्रगल्भता वाढणे गरजेचे आहे. अन्यथा, “गोमये वसते लक्ष्मी” यात काही तथ्य आहे का? हाच प्रश्न रेटला जाईल.