Rain & Temperature : पावसाचा जोर ओसरणार, तापमानाचा पारा चढणार!
1 min readRain & Temperature : नांदेड वगळता संपूर्ण मराठवाडा, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 13 जिल्ह्यात मंगळवार (दि. 27 ऑगस्ट) ते शुक्रवार (दि. 30 ऑगस्ट) या चार दिवसात पावसाचा (Rain) जाेर हळूहळू कमी होऊन दुपारी 3 वाजेच्या कमाल तापमान (Temperature) वाढ व हळूहळू उन्हाची ताप वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 13 जिल्ह्यांत दुपारनंतर सायंकाळी झालाच तर तुरळक ठिकाणी केवळ गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
या चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ व खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा 23 जिल्ह्यांत सध्या चालू असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो. त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता रविवार (दि. 25 ऑगस्ट)पासून सह्याद्रीच्या कुशीतील नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम आहे. शनिवार (दि. 31 ऑगस्ट) ते गुरुवार (दि. 5 सप्टेंबर) पर्यंतच्या सहा दिवसांत संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबई अशा 16 जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
सोमवारी (दि.26 ऑगस्ट) बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर वगळता संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील दुपारी 3 वाजताचे कमाल तापमान हे 30 डिग्री सेंटिग्रेड तर उर्वरित महाराष्ट्राचे तापमान 28 डिग्री सेंटिग्रेड होते. खान्देश व नाशिक वगळता ही तापमाने सरासरीच्या आसपास तर खान्देश व नाशिक अशा 4 जिल्ह्यात हे तापमान सरासरीपेक्षा 3 डिग्रीने खालावलेले होते. संपूर्ण मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 18 जिल्ह्यांत दुपारी 3 वाजताचे हे कमाल तापमान वाढून हळूहळू उन्हाची ताप जाणवू शकते.