Rain in September : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कसा असेल?
1 min readRain in September : शनिवार (दि. 31 ऑगस्ट) ते गुरुवार (दि. 5 सप्टेंबर) दरम्यानच्या सहा दिवसांत महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यात, भागवार स्पष्टीत तीव्रतेच्या पावसाची (Rain) शक्यता जाणवते.
🔆 अतिजोरदार पाऊस
मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील एकूण 18 जिल्ह्यात शनिवार (दि. 31 ऑगस्ट) ते गुरुवार (दि. 5 सप्टेंबर) दरम्यान तसेच खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या 10 जिल्ह्यात मंगळवार (दि. 3 सप्टेंबर) ते गुरुवार (दि. 5 सप्टेंबर) दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात सोमवारी (दि.2 सप्टेंबर) रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
🌀 अतिजोरदार म्हणजे अंदाजे 12 ते 20 सेंटिमीटर दरम्यानच्या श्रेणीतील एका दिवसात होऊ शकणाऱ्या पावसाला अतिजोरदार पाऊस संबोधतात. म्हणजे तेवढा पाऊस होण्याच्या शक्यतेचे वातावरण त्या ठिकाणी तयार होऊ शकते.
🔆 जोरदार पाऊस
खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 10 जिल्ह्यात रविवार (दि. 1 सप्टेंबर) व साेमवारी (दि. 2 सप्टेंबर) तर मराठवाड्यात दि. 1, 3 व 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
🌀 जोरदार पाऊस म्हणजे अंदाजे 7 सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक व 12 सेंटिमीटरच्या खाली अशा श्रेणीतील एका दिवसात होऊ शकणाऱ्या पावसाला जोरदार पाऊस संबोधतात.
🔆 मध्यम पाऊस
संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात मंगळवारी ( दि. 5 सप्टेंबर) रोजी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
🌀 मध्यम पाऊस म्हणजे अंदाजे 2 सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक व 7 सेंटिमीटरच्या खाली अशा श्रेणीतील एका दिवसात होऊ शकणाऱ्या पावसाला मध्यम पाऊस संबोधतात.
🔆 एका दिवसाचा पाऊस कसा ठरवतात?
एका दिवसाचा पाऊस म्हणजे आज सकाळी 8.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजेपर्यंत (03 ते 03 ग्रीनव्हीच मिन टाइम) पडलेल्या पावसाच्या मोजमापाला आजच्या तारखेला पडलेल्या एका दिवसा (24 तास)चा पाऊस म्हणतात.
🔆 धरणातील जलविसर्ग
रविवार (दि. 1 सप्टेंबर)पासून नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांमधून चार दिवसासाठी खालावलेला जलविसर्गानंतर सोमवार (दि. 2 सप्टेंबर)पासून पुन्हा एकदा धरण-जलविसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावरील पूर परिस्थितीही त्या वेळच्या पाऊस तीव्रतेवर अवलंबून असेल.
🔆 चक्रीवादळ
मागील आठवड्यात उत्तर पश्चिम बंगालमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मार्गे 27 ऑगस्टला आग्नेय राजस्थानात अतितीव्र क्षेत्रात रुपांतर झाले. शुक्रवारी (दि. 30 ऑगस्ट) संध्याकाळी कच्छच्या किनारपट्टीवरून अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. ते शनिवारी (दि. 31 ऑगस्ट) मध्यरात्री ओमानच्या किनारपट्टीवर धडकले.या चक्रीवादळाचा मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.