Rain in Marathwada : मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होणार!
1 min readRain in Marathwada : चंद्रपूरजवळ साेमवारी (दि. 2 सप्टेंबर) केंद्रित असलेला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (An area of intense low pressure) आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे बुधवार (दि. 4 सप्टेंबर)पासून मराठवाड्यातील (Marathwada) बीड, धाराशिव, लातूर, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील पावसाचा जोर या आठवड्यात कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. उर्वरित हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात बुधवार (दि. 4 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. 10 सप्टेंबर)पर्यंत आठवडाभर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता कायम आहे.
🌀 मुंबईसह कोकणात अति जोरदार पाऊस
मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ऑफ-शोअर ट्रफ (offshore trough)ची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत ताशी 48 किमी वेगाने येणारे आर्द्रतायुक्त पश्चिमी वारे, वेग कमी होवून प्रत्यक्षात ताशी 20 ते 25 किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात मंगळवार (दि. 3 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. 10 सप्टेंबर)पर्यंत आठवडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता कायम टिकून आहे.
🌀 मध्य महाराष्ट्र व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस
मंगळवार (दि. 3 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. 10 सप्टेंबर)पर्यंत आठवडाभर खान्देश, विदर्भ तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या 21 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
🔆 सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर पाहता मंगळवार (दि. 3 सप्टेंबर) ते मंगळवार (दि. 10 सप्टेंबर)पर्यंत आठवडाभर धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो, किंवा त्यात अधिक वाढही होऊ शकते. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर परिस्थितीची शक्यता जाणवते.
🔆 विदर्भ वगळता महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 डिग्रीने खालावून ते 28 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास आहे. पहाटेचे किमान तापमानही सध्या सरासरीइतके म्हणजे 22 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास जाणवते आहे. या कमाल व किमान अशा दोन्ही तापमानातील फरक कमी कमी होत 6 डिग्री सेंटिग्रेडपर्यंत खालावला आहे. त्यामुळे सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारीही सरासरीपेक्षा वाढतीकडे झेपावत आहे. या प्रचंड अशा या होणाऱ्या आर्द्रतेच्या उपलब्धतेतून आणि फक्त कमाल तापमानातील विशेष अशा घसरणीमुळे, येथे-तेथे पडणाऱ्या उष्णता संवहनी प्रक्रियेच्या पावसास सध्याचे वातावरण मारक ठरून व्यापक क्षेत्र कव्हर करणाऱ्या मान्सूनच्या पावसाला पूरक ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तशाच प्रकारचा व्यापक क्षेत्र कव्हर करणारा दमदार पावसाचा लाभ होत आहे.
🔆 मंगळवार (दि. 3 सप्टेंबर)पासून दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवार (दि. 5 सप्टेंबर)ला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून सप्टेंबरमधील सध्याच्या पावसाच्या आवर्तनासाठी पूरक ठरेल. जमिनीपासून 3 ते 6 किमी अशा तीन किमी उंच क्षेत्र हवेच्या जाडीत पूर्व-पश्चिम व पश्चिम -पूर्व एकमेकांविरुद्ध वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा असलेला शिअर झोन 20 डिग्री अक्षवृत्तावर स्थित तसेच चंद्रपूरजवळ केंद्रित असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे परभणी व हिंगोलीत अतिजाेरदार पाऊस झाला.बुधवार (दि. 4 सप्टेंबर)पासून या पावसाचा जोर कमी होईल.