krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain in Shravan : उघडीपीनंतर श्रावणसरींची शक्यता!

1 min read

Rain in Shravan : सध्या पावसाची उघडीप आहे. काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy weather) कायम आहे. या उघडीपीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या आंतरमशागतीला वेळ मिळत आहे. या उघडीपीनंतर पुन्हा श्रावणसरींची (Rain in Shravan) शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनच्या गेल्या सव्वादोन महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतक्या तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

🎯 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पावसाची विभागवार टक्केवारी
🔆 मराठवाडा :- 41 सेंटिमीटर (19 टक्के अधिक)
🔆 कोकण :- 274 सेंटिमीटर (39 टक्के अधिक)
🔆 विदर्भ :- 74 सेंटिमीटर (31 टक्के अधिक)
🔆 मध्य महाराष्ट्र (खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हे) :- 65 सेंटिमीटर (46 टक्के अधिक)

🎯 जिल्हावार पावसाची टक्केवारी
🔆 सरासरीपेक्षा अत्याधिक पावसाचे दाेन जिल्हे :- पुणे व सांगली (67 टक्के अधिक)
🔆 सरासरीपेक्षा कमी पावसाचा जिल्हा :- हिंगोली (47 टक्के कमी)
🔆 सरासरी इतक्या पावसाचे नऊ जिल्हे :- नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया (-19 ते 19 टक्के)
🔆 उर्वरित 24 जिल्हे हे सरासरीपेक्षा अधिक पावसाचे (20 ते 59 टक्के अधिक)

🎯 ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातील पाऊस
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (8 ते 15 ऑगस्ट) दरम्यान मुंबईसह कोकण, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचीच शक्यता असल्यामुळे सध्या कमीच पावसाची नोंद होत आहे. परंतु, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा अपवाद असून तेथील धरण पाणलोट क्षेत्रात सध्या होत असलेल्या मध्यम पावसातून धरण जल-आवकेतील सातत्य टिकून आहे.

🎯 ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसाची शक्यता
🔆 शुक्रवार (दि. 16 ऑगस्ट) ते रविवार (दि.25 ऑगस्ट) म्हणजे गोकुळअष्टमी उजाडेपर्यंतच्या 10 दिवसात महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 22 जिल्ह्यात एम.जे.ओ. (Madden–Julian oscillation)मुळे पावसासाठी अनुकूलता वाढू शकते. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. या आठवड्यात घाटमाथ्यावरील धरणांच्या जल-आवकतेतील सातत्य मात्र तसेच टिकून राहील. त्यात बदल नाही.
🔆 रत्नगिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर संपूर्ण मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर वगळता) बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 14 जिल्ह्यात सरासरी इतक्या म्हणजेच केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

🎯 पावसाच्या स्वरूपात किंचित बदल
सध्या दुपार 3 वाजेचे कमाल तापमान हे अधिक जाणवत आहे. त्यामुळे उष्णता संवहनी प्रक्रियेतून उर्ध्वगामित झालेल्या दमट बाष्पाचा अधिक उंचीवर समुद्रावरून अगोदरच संक्रमणित झालेल्या थंड बाष्पाशी संयोग घडून येतो. या दोन वेगळ्या तापमानाच्या बाष्पातून क्यूमुलोनिंबस प्रकारचे ढगनिर्मिती व त्यात होणाऱ्या सांद्रीभवनातून पाऊस होतो. त्यामुळे या पुढील 10 दिवसात शक्यतो दुपारनंतर मर्यादित क्षेत्रावर विजा व ढगांच्या गडगडाटीसह पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!