Anarchy in Bangladesh : बांगलादेशपुढे भुकेचे तर भारतापुढे शेतमाल निर्यातीचे आव्हान
1 min readAnarchy in Bangladesh : बांगलादेशात (Bangladesh) बेराेजगारी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदाेलनाने 1 जुलै 2024 पासून हिंसक वळण घ्यायला सुरुवात केली. त्यातच आंदाेलक 5 ऑगस्ट 2024 राेजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या निवासस्थानावर चालून गेले आणि त्यांनी देश साेडताच लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी 5 ऑगस्ट 2024 ला सायंकाळी बांगलादेशच्या सर्व सीमा सील केल्या. अराजकतेमुळे (Anarchy) एकीकडे, बांगलादेशसमाेर जसे भुकेचे आव्हान (The challenge of hunger) निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे भारतासमाेर शेतमाल निर्यातीचे (Agricultural exports) आव्हान निर्माण झाले आहे.
⭕ भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत
बांगलादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करताे. यात बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, विविध डाळी, बेसन, विविध फळे, विशिष्ट प्रजातीचे मासे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल तसेच खाद्यान्नाचा समावेश आहे. बांगलादेशची अर्थव्यवस्था कापड उद्याेगावर अवलंबून आहे. हा निर्यातक्षम कापड तयार करण्यासाठी लागणारी रुई (कापूस) आणि सूत (Yarn) देखील ते भारताकडूनच आयात करतात. बांगलादेशात 5 ऑगस्ट 2024 राेजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत भारतीय शेतमालाची निर्यात सुरळीत सुरू हाेती. त्यानंतर सीमा सील करण्यात आल्याने या सर्व शेतमालाची निर्यात अडचणीत आली आहे. त्यांच्यासमाेर उभे ठाकलेले भुकेचे आव्हान विचारात घेता भारतीय शेतमाल निर्यातदारांनी ‘वेट ॲण्ड वाॅच’ची भूमिका घेतली आहे.
⭕ परंपरागत आयातदार
भारत हा बांगलादेशचा शेतमाल व इतर वस्तूंचा परंपरागत आयातदार देश आहे. भारतातून बांगलादेशात शेतमालासह इतर वस्तूंची निर्यात खूप साेपी आणि कमी खर्चाची आहे. शेतमाल व इतर साहित्य ट्रकद्वारे भारत – बांगलादेशच्या सीमेवर नेले जाते. सीमेवर तपासणीनंतर भारतीय ट्रकमधील माल खाली करून बांगलादेशच्या ट्रकमध्ये भरला जाताे आणि ते ट्रक ताे माल घेऊन ढाकासह इतर शहरातील बाजारपेठांमध्ये जातात.
⭕ खाद्यान्नाचा तुटवडा आणि काळाबाजार
अराजकता आणि सीमा सील केल्याने बांगलादेशात केला जाणाऱ्या शेतमाल व इतर वस्तूंचा पुरवठा सुरुवातीला थांबल्यागत झाला हाेता. त्यामुळे तिथे खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण हाेऊन दरवाढीला सुरुवात झाली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे शेतमालाचा साठा आहे, ते चढ्या दराने विक्री करणार असल्याने दरवाढीसाेबतच काळाबाजार आणि नफेखरीची शक्यता निर्माण झाली. दुसरीकडे, लष्करासमाेर सामान्य बांगलादेशी नागरिकांच्या भुकेचे नवे आव्हान निर्माण हाेऊन ते हळूहळू गंभीर रूप धारण करणार आहे. त्यांना कमी काळात भारताव्यतिरिक्त इतर काेणत्याही देशांकडून तातडीने शेतमाल व इतर वस्तूंची आयात करणे शक्य नाही.
⭕ टकाचे अवमूल्यन व महागाई
निर्मित परिस्थितीमुळे बांगलादेशी चलन टकाचे सुरुवातीच्या 48 तासांत 30 टक्क्यांनी अवमूल्यन झाले. त्यामुळे बांगलादेशात शेतमालाच्या किमती किमान 40 ते 45 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सुरुवातीच्या काळात सीमा सील आणि शेतमालाचा उपलब्ध साठा विचारात घेत तेथील व्यापारी काही प्रमाणात का हाेईना शेतमालाची चढ्या दराने विक्री करीत हाेते. ही परिस्थिती गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच लष्काराने शेतमालाची आयात सुरू ठेवण्यासाठी भारताच्या सीमा काही काळासाठी का हाेईना खुल्या केल्याने सध्या भारतातून बांगलादेशात राेज 75 ते 85 ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतमालाची निर्यात केली जात आहे. त्यामुळे बांगलादेशातील वाढती महागाई आणि काळाबाजाराला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.
⭕ अर्थव्यवस्था व कापड उद्याेगावर दूरगामी परिणाम
बांगलादेशने सन 2009 पासून सरासरी वार्षिक 6 टक्क्यांहून अधिक दराने विकासाची नोंद केली आहे. सन 2021 मध्ये बांगलादेशने दरडोई उत्पन्नामध्ये भारताला मागे टाकले होते. बांगलादेशातील या आर्थिक वाढीतून होणाऱ्या फायद्यांचे वितरण मात्र विषमपणे झाले. सन 2022 मधील सरकारी आकडेवारीनुसार, 15 ते 24 वयोगटातील 180 लाख बांगलादेशी नागरिकांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेणे व उफाळून येणे स्वाभाविक हाेते. बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची अर्थव्यवस्था मुख्यत: याच उद्याेगावर अवलंबून आहे. मात्र, देशात निर्माण झालेल्या या अराजकतेचा तेथील वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. भीषण हिंसाचाराच्या काळात देशातील बहुतांश कारखाने बंद पडले आहेत. बांगलादेशात कपड्यांचे 3,500 कारखाने आहेत. हे कारखाने बांगलादेशच्या एकूण वार्षिक निर्यातीपैकी 85 टक्के म्हणजेच 55 अब्ज डॉलर्स इतक्या रकमेच्या उत्पादनाची निर्यात करतात. बांगलादेश जगातील अनेक मोठमोठ्या ब्रँड्सना कपड्यांचा पुरवठा करतो. लेव्हीज्, झारा, एच अॅण्ड एम यासारख्या ब्रँड्सना कपड्यांचा पुरवठा करीत असल्यामुळे चीननंतर बांगलादेश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा कापड निर्यातदार देश आहे. हुला ग्लोबल या वस्त्रनिर्मात्या कंपनीनेही बांगलादेशमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्पादनामध्ये घट केली आहे. त्यांनी उर्वरित वर्षासाठी बांगलादेशला जाणाऱ्या सर्व नवीन ऑर्डर्स तूर्तास थांबविल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यावेळी नेपाळमधील महागाई 45 टक्क्यांनी वाढली हाेती. बांगलादेशातील परिस्थिती आणखी काही काळ अशीच कायम राहिली तर त्याचा कापड निर्यात व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे.
⭕ भारतीय कापड उद्याेगाला संधी
या यादवीमुळे बांगलादेशचे 90 टक्के, तर भारताचे 10 टक्के आर्थिक नुकसान झाले आहे. जागतिक स्तरावर कापड निर्यातीमध्ये बांगलादेशचा वाटा 24 टक्के आहे. ते सध्या भारताऐवजी ऑस्ट्रेलियातून रुई व सूत आयात करतात. यादवीमुळे ही आयात आणि त्यांची कापड निर्यात प्रभावित झाली आहे. याचा फायदा भारतीय कापड निर्यातदारांना नक्की हाेऊ शकताे. त्यासाठी भारतीय उद्याेगांनी कापडाचा दर्जा कायम राखणे आणि केंद्र सरकारने त्या दिशेने याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.