Orange Fruit dropping : संत्रा, माेसंबी फळगळ; आयसीएआर-सीसीआरआय पांढरा हत्ती
1 min readOrange Fruit dropping : नागपुरी संत्री (Nagpuri Orange) असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल माेठं आकर्षक वाटतं. परंतु, या संत्र्याचे उत्पादन करणारा शेतकरी मात्र सलग सातव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांमध्ये हाेत असलेली माेठ्या प्रमाणातील फळगळ! हीच अवस्था माेसंबीच्या पिकाचीदेखील आहे. मागील दोन महिन्यांपासून सततच्या व अति पावसामुळे ही फळगळ (Fruit dropping) वाढत चालली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या झाडांवर मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्रा शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील माेर्शी व वरुड तसेच नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटाेल हे चार तालुके संत्र्याच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, बुरशीजन्य राेगांचा (Fungal diseases) प्रादुर्भाव व त्यातून हाेणाऱ्या फळगळतीमुळे या भागातील संत्रा उत्पादकांचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान हाेत असल्याने तसेच सरकारी पातळीवर काहीही उपाययाेजना केल्या जात नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ही अवस्थेत अंबिया बहाराच्या संत्रा व माेसंबीचे उत्पादन घेणाऱ्या सर्व तालुक्यांमधील संत्रा व माेसंबी उत्पादकांची आहे. ही संपूर्ण परिस्थिती केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन केंद्रातील (ICAR – Central Citrus Research Institute) शास्त्रज्ञ आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाला माहिती आहे. मात्र, कुणीही शेतकऱ्यांच्या संत्रा, माेसंबी बागांमध्ये येऊन पाहणी करायला आणि याेग्य उपाययाेजना सुचवायला तयार नाही.
खरं तर, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर (सीसीआरआय)ने आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक उत्प्रेरक (कॅटलिस्ट) म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आले पाहिजे. या संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यासाठी इतर संस्थांसोबत संयुक्त भागीदारी केली पाहिजे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन केले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांना वेळाेवेळी मार्गदर्शन करायला पाहिजे. संत्रा उत्पादकांना 50 टक्के अनुदानावर बुरशीनाशके, कीटकनाशके उपलब्ध करून दिली पाहिजे.
अमरावती, नागपूरसह इतर जिल्ह्यातील शेतकरी संत्रा फळगळीमुळे हवालदिल झाले आहेत. महागड्या बुरशीनाशकांची बागांवर वारंवार फवारणी करूनही ही फळगळ नियंत्रणात येत नसल्यावर त्यावर केला जाणारा खर्च वाया जात आहे. परिणामी, संत्र्याच्या उत्पादन खर्चात अताेनात वाढ हाेत असून, उत्पादन घटत आहे. दुसरीकडे, संत्राला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी माेठा ताेटाच पडत आहे. हा प्रकार मागील चार वर्षांपासून सतत सुरू आहे. संत्रा उत्पादकांच्या जीवावर उठलेल्या या फळगळीच्या व्यवस्थापनासाठी याेग्य उपाययाेजना करण्याबाबत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी काडीचीही मदत करीत नसल्याने तसेच आजवरचे कार्य विचारात घेता ही संस्था पांढरा हत्ती ठरत आहे.