Yellow Mosaic on Soybean : सोयाबीनवरील येल्लाे मोझॅक व व्यवस्थापन
1 min readYellow Mosaic on Soybean : सोयाबीनच्या (Soybean) पिकावर (Crop) आढळून येणारा येल्लाे मोझॅक (Yellow Mosaic) या विषाणूजन्य रोगाचा (virus disease) प्रादुर्भाव मुख्यत: बियाण्याद्वारे (Seed) होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार पांढरीमाशी (Whitefly) या किडीमुळे होतो. सोयाबीन पिकावर येल्लाे मोझॅकचा (YMD – Yellow mosaic disease) प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानांवर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसतात. त्यानंतर पानांवर चमकदार पिवळ्या, हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. रोगग्रस्त झाडे खुजी व खुरटी होतात तसेच अशा झाडाला फुलोरा कमी व उशिरा येतो. फुलांचे शेंगात रूपांतरित होण्याचे प्रमाण अत्यल्प राहते व शेंगांमध्ये दाणे कमी भरतात. सोयाबीन पिकातील येल्लाे मोझॅकने प्रादुर्भावग्रस्त असलेली झाड अर्धी हिरवी पिवळी पाने असलेली दिसतात व असे झाड लांबून ओळखता येते. सुरुवातीच्या 75 दिवसात सोयाबीनवर येल्लाे मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव जर झाला, विशेषत: सोयाबीन पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत झाल्यास सोयाबीन पिकात उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते.
🎯 या रोगाच्या प्रतिबंधासाठी काय करावे?
➡️ सोयाबीन पिकामध्ये स्थानिक कृषी विद्यापीठाने त्या त्या भागासाठी शिफारस केलेले कीड व रोगांसाठी प्रतिकारक असलेल्या सोयाबीनच्या वाणाची पेरणी करावी.
➡️ सोयाबीन पिकाची पेरणी करताना विद्यापीठाने शिफारस केलेल्या अंतरावर योग्य शिफारशीत बियाण्याचा दर राखून पेरणी करावी. अति दाट पेरणी टाळावी तसेच नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर विशेषत: उभ्या पिकात अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळावा.
➡️ सोयाबीनच्या शेताचे बांध व सोयाबीनचे शेत तणमुक्त ठेवावे तसेच सोयाबीन पिकावरील किडींच्या पूरक खाद्याचा नाश करावा.
➡️ सुरुवातीला सोयाबीनचे एकटे दुकटे पिवळा मोझॅकग्रस्त झाड शेतात आढळून आल्यास, असे झाड शेताबाहेर काढून नष्ट करावे.
➡️ या रोगाचा दुय्यम प्रसार पांढरी माशी या किडीमुळे होत असल्यामुळे या किडीच्या सनियंत्रणाकरिता व व्यवस्थापनाकरिता सुरुवातीला सोयाबीन पिकामध्ये 15 बाय 30 सेंटिमीटर आकाराचे एकरी 20 ते 25 पिवळे चिकट सापळे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावे.
➡️ सुरुवातीला सोयाबीन पिकावर विविध किडीच्या प्रतिबंधासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
➡️ वर निर्देशित उपाययोजनेबरोबर सोयाबीन पिकामध्ये वेळोवेळी सर्वेक्षण आणि निरीक्षण घेऊन पांढरी माशी या किडीच्या प्रादुर्भाव बाबतीत जागरूक राहावे. या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.
🔆 Thiamethoxam 25 % WG 3 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा Fonicamid (फ्लॉनीकॅमीड) 50 % WG 3 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा Imidachloprid 17.8 % SL 2.5 मिली अधिक 10 लिटर पाणी किंवा Acetamaprid 25 % + Bifenthrin 25% WG (संयुक्त कीटकनाशक) 5 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी गरजेनुसार स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आर्थिक नुकसानीची पातळी पाहून सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करून गरज असेल तर फवारणी करावी.
(❇️ टीप :- वर निर्देशित कीटकनाशकाच्या शिफारसी तदर्थ स्वरुपाच्या असून (Adhoc स्वरुपाच्या ) वर निर्देशित सर्व कीटकनाशकाचे लेबल क्लेम शिफारस नाहीत. लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीटकनाशके वापरणे तसेच अद्यावत लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून घेणे व स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही हितावह असते. कोणतीही रसायने फवारण्यापूर्वी अद्ययावत लेबल क्लेम शिफारशीचा संदर्भ घेऊन लेबल क्लेम शिफारशी प्रमाणेच रसायने फवारणी करावी. रसायने फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा अंगीकार करावा. अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे. रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच वापरणे गरजेचे आहे.)