krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Half rainy season over : निम्मा पावसाळा संपला, अर्ध्या पाणकळ्यातील पाऊस?

1 min read

Half rainy season over : ऑगस्ट महिना सुरू हाेताच निम्मा पावसाळा संपल्यात (Half rainy season over) जमा झाला आहे. आता अर्ध्या पाणकळ्यातील पाऊस कसा असेल, याचा अंदाज तूर्तास बांधणे कठीण आहे. साेमवार (दि. 5 ऑगस्ट)पासून नवीन आठवडा सुरू झाला असून, या आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल?

गेल्या पाच दिवसात मान्सूनची सक्रियता चांगलीच जाणवली. मंगळवार (दि. 6 ऑगस्ट)पर्यंत कोकण, विदर्भ, नाशिकसह खान्देश वगळता उर्वरित अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अशा 14 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यात मध्यम तर विदर्भात जोरदार आणि मुंबईसह कोकणात आठडाभर अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

🎯 ऑगस्टमधील महाराष्ट्रातील पावसाची ठळक वैशिष्ठ्ये
🔆 ऑगस्ट अखेरीस ला-निना (La Nina) डोकावणार.
🔆 ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीच्या कमीच राहणार.
🔆 अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाची परिस्थिती जैसे थे.
🔆 ऑगस्टमध्ये विदर्भातही पावसाची ओढ कायम राहणार.
🔆 ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक.
🔆 धरण क्षेत्रात पावसाचा जोर टिकून राहणार.
🔆 पुणे, सातारा, कोल्हापूरमधील धरणे ओसंडणार व नद्या खळाळणार.
🔆 ना ला-निना, ना आयओडी (Indian Ocean Dipole) तरीही ऑगस्टमध्ये पाऊस कमी.

🎯 ला-निना व आयओडीचा काय परिणाम जाणवेल?
🔆 ला- निना :-

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील एन्सो तटस्थेतील पहिले तीन आठवडे पावसासाठी अटकाव करणारे नसले तरी ही स्थिती अधिक जोरदार पावसासाठी पूरकही नाही.

🔆 आयओडी (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता) :-
संपूर्ण ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दोन महिन्यात आयओडी तटस्थ राहणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील पावसासाठी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागीय पाण्याचे समान असणारी तापमानीय स्थिती पावसास अटकाव करणारी जरी नसली तरी महाराष्ट्रात सध्या अधिक पावसाची गरज असताना ती पावसासाठी पूरकही जाणवत नाही.

🎯 तापमानाचा पावसावर काय परिणाम जाणवेल?
🔆 कमाल तापमान :-

ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे 3 वाजताचे कमाल तापमान हे ऑगस्टमधील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे तापमान अधिक म्हणून अधिक आर्द्रतेची निर्मिती आणि त्यामुळेच केवळ काही भागातच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.

🔆 किमान तापमान :-
संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पहाटे 5 वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही पावसाळी भागाबरोबर काही भाग केवळ ढगाळच जाणवेल. एकूणच अशा आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.

🎯 ऑगस्टमध्ये पावसाचे खंड असतील काय?
जेव्हा ऑगस्टमध्ये महाराष्ट्र व मध्य भारतात पावसाचा खंड येतो, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळाच्या कोकणातील पश्चिम किनारपट्टीवरील तसेच आसामकडील पूर्वोत्तरातील 7 राज्ये आणि हिमालयाच्या पायाथ्यातील गंगेच्या खोरे प्रदेशातील सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल शिवाय बिहार, झारखंड व तामिळनाडू व रायलसीमा भागात अधिक तीव्रतेने पाऊस होतो. ऑगस्ट महिन्यात वर स्पष्टीत भागात पावसाची तीव्रता पाहता महाराष्ट्रात पावसाचे खंड पडण्याची शक्यता कमीच जाणवते.

🎯 महाराष्ट्रात सप्टेंबरमधील पाऊस कसा असेल?
ला-निनाच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात नाशिक व अहमदनगर असे दोन जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 34 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मात्र मासिक सरासरीपेक्षा केवळ कमी पावसाची शक्यता आज तरी दीर्घपल्ल्याच्या अंदाजातील स्थितीनुसार जाणवते. अर्थात 1 सप्टेंबरला दिल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या मासिक अंदाजात यात अधिक स्पष्टता जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!