Neglected pests of orange : संत्रा पिकावरील दुर्लक्षित कीड : कोळी, सूत्रकृमींचे व्यवस्थापन
1 min readNeglected pests of orange : कोळी अतिसूक्ष्म अष्टपाद प्राणी असून, त्याचे शरीर लंबगोल असते. त्याचा आकार साधारणतः 0.15 ते 0.16 मिलिमीटर (तिळापेक्षा लहान) लांब असतो. त्यांना पायांच्या 4 जोड्या (आठ पाय) असतात. तोंडाची रचना रस शाेषण करण्याजोगी व चावण्यास योग्य अशी असते. त्याचा रंग तांबूस किंवा पिवळसर असतो. इतर कीटक अष्टपदी असतात. ते पाने व फळांवर हल्ला करून त्यातील रस शाेषून घेतात. परिणामी, पानांच्या कडा तांबूस होतात. पाने कोकडतात, रंगहीन होऊन गळून पडतात, तर काही ठिकाणी पानांवर तांबडे ठिपके आढळतात.
☢️ कोळ्यांचा प्रादुर्भाव
कोळी किडीचा हल्ला जास्त प्रमाणात झाल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास अल्प कालावधीतच झाडे मरूनही जातात. कोळ्यांचा प्रादुर्भाव हवामानानुसार कमी-जास्त होतो. हवामान अनुकूल असेल तर एका वर्षात 12 ते 16 पिढ्या पूर्ण होतात. या किडीचा जीवनक्रम 14 ते 20 दिवसांमध्ये पूर्ण होताे. कापूस व फळझाडे यावर यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कोळीच्या काही प्रजाती 3-4 दिवस अंडी अवस्थेमध्ये राहून 1-2 दिवसात अळी व प्रौढ अवस्था पूर्ण करून 9-15 दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करतात.
☢️ प्रादुर्भावाची लक्षणे
संत्र्यावरील रस्टमाईट म्हणजे पाने आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून व त्यातील रस शाेषून घेतल्यामुळे पाने आणि फळांवर करडे ठिपके आढळून येतात. परिणामी, फळावर लालसर रंगाचे चट्टे पडतात. त्यालाच लाल्या असे संबोधल्या जाते. परिणामी, फळाचा रंग बदलून प्रत खालावते. त्यामुळे फळांना बाजारभाव कमी मिळताे. ग्रीन माईटमुळे पानाच्या मुख्य शिरेपासून ते संपूर्ण पानावर पांढुरके ठिपके दिसून येतात. हेच परिणाम फळांवर दिसून येते. संत्रा, मोसंबीवर कोळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात मे व ऑॅगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात आढळून येतो.
☢️ कोळीचे व्यवस्थापन
✳️ उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण दिलेल्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास कोळीचा प्रादुर्भाव वाढतो.
✳️ जैविक उपाययोजनेत अझॅडीरॅक्टीन (1 टक्का) 20 मि.लि. किंवा नीम तेल 100 मि.लि. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फळधारणेच्या वेळी फवारणी केल्यास या किडीचे व्यवस्थापन करता येते. 15 दिवसाच्या अंतराने हाॅर्टीकल्चरल मिनरल ऑईल (2 टक्के) 200 मि.लि. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
✳️ रासायनिक उपाय म्हणून डायकोफाॅल 18.5 ई.सी. 20 मि.लि. किंवा डायफेनथीयुराॅन 50 डब्लूयुपी 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फळधारणेच्या वेळी 15 दिवसाच्या अंतराने फवारणी केल्यास किडीचे व्यवस्थापन होते.
☢️ सूत्रकृमीचे एकात्मिक व्यवस्थापन
लिंबुवर्गीय फळझाडावरील सूत्रकृमी (टायलेनकुलस सेमीपेनेट्रन्स), मुळावर गाठी निर्माण करणारे सूत्रकृमी, डॅगर सूत्रकृमी, विषाणू, बुरशी अनुजीवी मायकोप्लाझमा आणि विषाणू सूत्रकृमीस व रोगास कारणीभूत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात फळझाडांवरील सूत्रकृमीचा जास्त प्रमाणात (15 टक्के) प्रादुर्भाव आढळून येत आहे.
सुत्रकृमी अतिशय सूक्ष्म आकाराचे जंतासारखे, धाग्यासारखे लांब असून, सरासरी लांबी 0.2 ते 0.5 सें.मी. असते. ते जमिनीत अगर झाडांच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करीत असल्याने त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे आतापर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही. सूत्रकृमी दोन्ही टोकाकडून निमुळती असतात. शास्त्रज्ञांनी 15 हजार जातींची माहिती उपलब्ध केली असून, एकूण 600 जाती भारतात आढळून आल्या आहेत. महाराष्ट्रात 50 प्रकारच्या सूत्रकृमी पिकांचे नुकसान करतात, असे आढळून आले आहे. सूत्रकृमीची लांबी साधारणपणे एक मिलिमीटर असते. उष्ण, दमट हवामानात त्यांची वाढ होते. प्रथम ते आपले पुढचे टोक पिकांच्या मुळात घुसवून तेथील पेशींमध्ये पाचक रस सोडतात व तो पुन्हा शाेषून घेतात. त्यामुळे ती पेशी मरते व तेथे गाठ तयार होते. काही वेळा जखम तशीच राहिली तर तो भाग कुजू लागतो. यापैकी कोणत्या प्रकारे नुकसान होईल, ते त्या सूत्रकृमीच्या जातीच्या सवयीवर व त्याने बाहेर टाकलेल्या पाचक रसावर अवलंबून असते.
☢️ सूत्रकृमींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने तीन प्रकारे होतो
✳️ मुळाबाहेर राहून उपद्रव करणाऱ्या सूत्रकृमी मुळातील रस शाेषून घेतात. त्यामुळे मुळातील पेशींमध्ये विकृती निर्माण होते. होप्लोलॅमस, हेलिकोटायलेंक्स, हायलेकोरिकंस आणि हेमीक्रिकोनीमाइडीस आदी कृमी या वर्गात मोडतात. या कृमी तृणधान्य, कडधान्य आणि फळझाडे आदी पिकांचे नुकसान करतात.
✳️ मुळाच्या आंतरभागात राहून उपद्रव करणाऱ्या सूत्रकृमीमुळे मुळावर गाठी तयार होऊन झाडाची वाढ खुंटते. परिणामी, झाड सुकून मरते. अश सूत्रकृमीस रूटनाॅट नेमॅटोड असे म्हणतात. विशेषतः भाजीपाल्याच्या पिकांवर यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कापूस व ऊस पिकांवर या सूत्रकृमीचा उपद्रव आढळून येतो. गहू व जवस पिकांवर मोल्या नावाचा रोग या सूत्रकृमीमुळे आढळून येतो.
✳️ मूत्रपिंडाच्या आकाराची सूत्रकृमी : ही सूत्रकृमी उष्णकटिबंधीय प्रदेशात कापूस, एरंडी, चवळी, द्राक्ष, केळी, पपई, ऊस, भेंडी, मोसंबी, आंबा व बटाटा या पिकांवर आढळून येतो. या सूत्रकृमीमुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पादन आणि उत्पन्नात घट येते. अशाप्रकारे सूत्रकृमीचा हल्ला झाला की, पिकांची अन्नग्रहण करण्याची शक्ती कमी होते व झाडाची वाढ खंटते. त्यामुळे उत्पादन घटते.
☢️ सूत्रकृमीचे व्यवस्थापन
✳️ सूत्रकृमीची लागण झालेल्या लिंबुवर्गीय पिकांमध्ये मे ते जून महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा झाडाचा परिघ सोडून खोल नांगरटी करावी.
✳️ पीक फेरपालट करून सूत्रकृमीचे व्यवस्थापन करावे. (उदा. मका, बाजरी) व लिंबवर्गीय पिकामध्ये झेंडुची लागवड झाडांच्या आळ्यांमध्ये करावी.
✳️ लिंबुवर्गीय नर्सरीमध्ये पातळ पाॅलिथिन झाकुन 2 ते 3 आठवडे सूर्य संस्करण केल्यामुळे सूत्रकृमीचे व्यवस्थापन होते.
✳️ कंदवर्गीय पिके उदा. अद्रक, बटाटे, हळद यासारख्या पिकांची रोगरहीत शेतामध्ये लागवड करावी.
✳️ कार्बोफ्युराॅन प्रती हेक्टरी 20 ते 25 किलो या प्रमाणात लिंबुवर्गीय पिकास दिल्यामुळे सूत्रकृमी घट होण्यास मदत होते.
✳️ जैविक व्यवस्थापनाकरिता पॅसीलामोयसीस लीलासीनस बुरशी तसेच पॅच्युरिया पेनट्राॅन्स व बॅसीलस सबटीलस यासारखे जीवाणू वापरून सूत्रकृमीचे व्यवस्थापन करता येते.
✳️ सूत्रकृमीसाठी भू-सुधारक म्हणून नीम, महुआ, मोहरी, सोयाबीन, एरंडी याचे मिश्रण 60 ते 70 किलो प्रती हेक्टरी याप्रमाणात मिसळून त्यात लाकडी भुसा 20 ते 25 क्विंटल प्रती हेक्टर या प्रमाणात शेतामध्ये मिसळून सूत्रकृमीचे व्यवस्थापन करता येते.
✳️ लिंबुवर्गीय पिकास 5 वर्षांवरील झाडास 750 ग्रॅम प्रती झाड निंबोळी चुरा प्रती वर्ष दिल्यास सूत्रकृमीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.
✳️ सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यावेळी झाडाच्या भोवती समांतर रिंग करून कार्बोफ्युराॅन 50 ते 60 ग्रॅम प्रती झाडास देऊन त्यावर झारीने पाणी द्यावे.
✳️ सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता निंबोळी अथवा करंजीच्या पेडींचा प्रति हेक्टरी 1500 किलो या प्रमाणात वापर करावा. त्यामुळे व्यवस्थापनाबरोबर जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते.