krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Crop Insurance : सरकारने विमा कंपनीकडे रक्कम जमा न केल्याने शेतकरी पीकविम्यापासून वंचित

1 min read

Crop Insurance : सरकारने त्यांच्या वाट्याचे 2,028 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा केले नाही. त्यामुळे एवट्या अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना 1,142 कोटी रुपयांच्या पीकविमा (Crop Insurance) नुकसानभरपाई (Compensation) पासून वंचित ठेवण्यात आले आहे. या 2,028 काेटी रुपयांमध्ये केंद्र सरकारच्या वाट्याचे 99.28 काेटी रुपये व राज्य सरकारच्या वाट्याच्या 1,927.52 काेटी रुपयांचा समावेश आहे. ही माहिती ओरिएंटल इन्शुरन्स (Oriental Insurance Company) या पीकविमा कंपनीने पत्राद्वारे दिली आहे.

पीकविमा कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार मागणी व चर्चा करूनही नुकसानभरपाई देत नसल्याने स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडी यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी मेफेयर टॉवर , शिवाजीनगर , पुणे येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन केले. त्याप्रसंगी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांना लेखी पत्र दिले. त्या पत्रात त्यांनी राज्य सरकारकडून 2,028 कोटी रुपये घेणे आहे. परंतु सरकारने अद्याप ती रक्कम दिली नाही, असेही त्यांनी या पत्रात लेखी कळविले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 12 आमदार, 2 खासदार, पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्ह्यातील 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी सरकारकडून विमा कंपनीला जी 2,028 कोटी रुपयांची रक्कम देणे आहे, ती तत्काळ विमा कंपनीकडे जमा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. मगच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळवून दिल्याच्या जाहिरातबाजी व पेपरबाजी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

पीकविमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक श्री विनायक दीक्षित यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्यांच्या नुकसानीची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. ऑगस्टअखेर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा न केल्यास 3 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील शेतकरी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याच आंदोलन करतील, याची दखल घ्यावी. आगामी विधानसभा निवडणुकीत याला जबाबदार असलेल्या जिल्ह्यातील सर्व 12 आमदारांना याचा जाब विचारून त्यांच्या विरोधी मतदान करतील याची दखल जिल्ह्यातील सर्व 12 आमदार, 2 खासदार व पालकमंत्र्यांनी घ्यावी, असा इशारा जिल्ह्यातील 12 लाख पीकविमाधारक शेतकऱ्यांच्यावतीने स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे व शेतकरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!