Rain possibility : विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
1 min read🎯 थंडी
बुधवार (दि.21 फेब्रुवारी) ते शुक्रवार (दि. 23 फेब्रुवारी) या तीन दिवसात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यात उत्तरेकडून शिरणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेचे किमान तापमान 14 तर कमाल 30 ते 32 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित 27 जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असून ती 17 व 34 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे.
🎯 कशामुळे ही शक्यता निर्माण झाली?
फेब्रुवारी अखेर सध्याचा हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह विजा व गारांचा पाऊस कोसळत असतो. सध्या अशीच हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडितता प्रणाली असून बंगालच्या उपसागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तेकडून एक किमी उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील 15 जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.