Cloudy and smoky atmosphere : महाराष्ट्रात ढगाळ तर मुंबईत धूरयुक्त धुक्याचे वातावरण
1 min read
गुरुवारी (दि. 4 जानेवारी) संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान 16 डिग्री सेंटिग्रेड व दुपारचे कमाल तापमान 30 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमान सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 4 डिग्री सेंटिग्रेड अधिक आहे तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार (दि. 7 जानेवारी)पर्यन्त ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात सध्याचे पहाटेचे किमान तापमान 20 डिग्री सेंटिग्रेड व दुपारचे कमाल तापमान 30 ते 32 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. तेथील ही दोन्हीही तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री सेंटिग्रेडने अधिक आहे.
ही दोन्हीही तापमाने रविवार (दि. 7 जानेवारी)पर्यंत याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते.
विना अडथळा उत्तरेकडून अधिक उंचीवरून मुंबईत येणारे थंड व कोरडे वारे व निम्न पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्व दिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, ज्यांचे सह्याद्रीमुळे दिशा बदलातून गुजरातच्या डांगी घळीतून सध्या मुंबईत प्रवेशित होत आहे. या दोन वाऱ्यांच्या संयोगातून महाराष्ट्राबरोबर मुंबईत ढगाळ वातावरण जाणवत आहे.
परंतु, ढगाळ वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश व समुद्र सपाटीमुळे मुंबईत सध्य:स्थितित असलेला हवेचा उच्च दाब व त्यात मुंबईतील धूरयुक्त प्रदूषित शांत हवा या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगतच धूरयुक्त धुक्याचे (Smoky atmosphere)(स्मोक+फॉग=स्मॉग – Smoke+fog=smog) मळभ सध्या मुंबईत जाणवत आहे. मुंबईत हे वातावरण कदाचित पुढील तीन दिवस म्हणजे रविवार (दि. 7 जानेवारी)पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.