krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Orange grower farmer suicide : संत्रा उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने….

1 min read
Orange grower farmer suicide : श्री पद्माकर बापूराव दाराेकर, रा. जरूड, ता. वरूड, जिल्हा अमरावती या 48 वर्षीय संत्रा उत्पादक शेतकऱ्याने (Orange grower farmer) 3 जानेवारी 2024 राेजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास पिंपळगाव, जिल्हा चंद्रपूर येथे आत्महत्या (suicide) केली. त्यापूर्वी ते 1 जानेवारी 2024 राेजी झालेल्या संत्रा उत्पादकांच्या वरूड येथील आंदाेलनात सहभागी झाले हाेते. बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर 88 रुपये प्रति किलाे आयात शुल्क (import duty) लावल्याने नागपुरी संत्र्याची निर्यात (export) मंदावली. त्यामुळे संत्र्याचे दर काेसळले. आर्थिक अडचणी आणि संत्रा विकताना येत असलेल्या समस्यांमुळे पद्माकर दाराेकर यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

भारतात मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य संत्रा उत्पादन करते, असा ग्रह होता. परंतु,देशातील किमान 13 राज्यांत संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार फळाची चव, आकार, गुणवत्ता या बाबी वेगवेगळ्या आहेत. सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेली संत्रा प्रजाती म्हणजे नागपूर मॅडरीन (Nagpur Mandrin), जी आपल्या विदर्भात, पुणे जिल्ह्यातील काही क्षेत्रात, मध्यप्रदेश व राजस्थान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. या भागात संत्र्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागपुरी संत्रा हा चवीला आंबट गाेड असल्याने वेगळेपण जाेपासत आहे.

उत्पादित संत्र्याच्या विक्रीचा प्रश्न दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. हा प्रश्न सर्वच कृषी उत्पादनांच्या बाबतीत देशभरात प्रकर्षाने जाणवत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येते. मात्र, दर्जेदार संत्रा व उत्पादने विकता येत नाही. याच शेतकऱ्यांच्या कमतरतेचा फायदा व्यापारी आणि दलाल या घटकांनी कायम घेतला आहे. कृषकाला नेहमी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या परिस्थितीत राहावे लागले आहे. उत्पादक ते उपभोक्ता ही विक्री व्यवस्था नेहमीच स्वप्नवत वाटत होती. परंतु, स्व. इंदिरा गांधीनी हरित क्रांतीसोबत उत्पादक ते उपभोक्ता अशी विक्री व्यवस्था NDDB (The National Dairy Development Board) अंतर्गत फळ व भाजीपाला विभागाच्या माध्यमातून दिल्ली येथे सर्वप्रथम सुरू केली, जी खूपच मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे.

देशात आज मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी बाजारात येतो आणि व्यापारी, दलाल एकमेकांच्या संगनमताने शेतकऱ्यांना लुबडतात. त्यामुळेच एका दाण्याचे हजारो दाणे पिकवणारा शेतकरी जिथे होता, तिथेच राहिला आणि एकही झाड न लावणारा, एकही दाणा न पेरणारा दलाल आणि व्यापारी संपन्नतेचे उच्चांक गाठत आहेत. उत्पादक ते उपभोक्ता ही विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी गरज आहे.

यावर्षी संत्रा बागायतदार आयात निर्यात धोरण चुकल्यामुळे आर्थिकदृष्ट्या नडल्या गेले. ज्याचा अनिष्ट परिणाम शेतकरी आत्महत्या वाढण्यात झाला आहे. सध्याच्या काळात शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तसेच विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, अपेडा (Agricultural and Processed Food Products Export Development Authority), फलोत्पादन आयुक्त, फलोत्पादन अभियान, फलोत्पादन मंत्रालय, राज्य पणन मंडळ आदी शासकीय यंत्रणा सक्षम व्यवस्था निर्माण करू शकतात.

अलीकडे FPC (Farmer Producer Company) इतक्या झाल्या ज्यांच्या मध्यामातून संत्रा विक्री व्यवस्था उभारता येऊ शकते. FPC, पणन मंडळ, सरकारचा फलोत्पादन विभाग यांनी संत्रा निर्यात सुविधा केंद्र (Nagpur Orange Export Facility Centre) मोठ्या प्रमाणात उभारावे. सुरुवातीला किमान 40 सुविधा उभारल्या गेल्या पाहिजे. या सुविधांमध्ये प्रतवारी केल्या गेलेला संत्रा चांगल्या आकर्षक पॅकिंगमधे डझन, अर्धा डझन असा ग्राहक केंद्रित विक्रीसाठी देशातील सर्व मॉल, महत्त्वपूर्ण बाजारपेठा, महानगर पालिका व्यापार संकुलात, फळ विक्री केंद्र यांच्या माध्यमातून विक्रीला उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!