krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Andolan for the price of agricultural commodities : शेतमालाच्या भावासाठी ‘स्वभाप’चे राज्यव्यापी आंदाेलन

1 min read
Andolan for the price of agricultural commodities : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिल व भारनियमन प्रश्न, पीकविमा, वन्यप्राण्यांमुळे हाेणारे पिकांचे अताेनात नुकसान, शेतमालाचे पडलेले दर आणि शेतमाल आयात - निर्यात धोरण या विषयांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली 18 जानेवारी 2024 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रपरिषदेत दिली.

स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा महाराष्ट्र दौरा 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला हाेता. 30 डिसेंबर 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला. श्रीरामपूर येथे झालेल्या पत्रपरिषदेत अनिल घनवट यांनी या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. शेतमाल व्यापारातील सरकारच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे शेतमालाचे भाव पडतात. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आज केंद्र सरकारने देशात गहू, तांदूळ, तेलबिया, कडधान्य, साखर, कांदा आदी पिकांवर निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा सारखे निर्बंध लादले आहेत. शेतमालाची मोठ्या प्रमाणात आयात करून भाव पाडले जात आहेत. त्यामुळे शेतकरी या अनैतिक कर्जात बुडाला आहे.

शेतीसाठी मर्यादेत वेळेत वीजपुरवठा होतो. तो ही रात्री व अपुऱ्या दाबाने केला जातो. वीजबिल वसुलीसाठी पूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केला जातो. शेतकऱ्यांना पीक विम्याची गाजर दाखवून विमा कंपन्यांचे गल्ले भरले जात आहेत. वन्यप्राणी शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान करतात. त्याबद्दल शासन काही नुकसान भरपाई देत नाही. मात्र, एखादा वन्यप्राणी जर मारला गेला तर शेतकऱ्याला तुरुंगात डांबले जाते.

शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 18 जानेवारी 2024 रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती अनिल घनवट यांनी दिली. देशातील शेतीच्या प्रश्नाबरोबरच बेरोजगारी, गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई व अवास्तव कर आकारणी सारखे प्रश्न सोडवायचे असतील तर स्वतंत्र भारत पक्षाने पुरस्कृत केलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेशिवाय पर्याय नाही, असे मत सीमा नरोडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

स्वतंत्र भारत पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत स्वभापच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नीलेश शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मधुकर शिंदे, ॲड. रावसाहेब करपे, कारभारी कणसे, बापूसाहेब आढाव, डॉ. संजय कुलकर्णी, बाळासाहेब सातव, इंदू ओहोळ, संजय करपे, रावसाहेब निमसे, ज्ञानदेव गुळवे, प्रकश जाधव, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेला स्वभापचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह स्वभापचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!