krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

True Entrepreneurship killed : खरी उद्योजकता कुठे मारली गेली?

1 min read
True Entrepreneurship killed : शेतकऱ्यांसाठी (Farmer) वेगळे कायदे (Laws) आणि साखर उद्योगासाठी (Sugar Industry) वेगळे कायदे केल्यामुळे साखर उद्योगात बांडगुळांची वाढ झाली. कारखानदार हे खऱ्याखुऱ्या उद्योजकांचे विश्वस्त मंडळ असले पाहिजे. कारण, त्यांचा एक रुपयाही या कारखान्यात गुंतलेला नसतो. फक्त त्यांचे श्रम व बुद्धी या कारखान्यात गुंतलेली आहे. साखर कारखान्यात जशी गुंतवणुक करावी लागते, तशी ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपये किंमतीची गुंतवणूक (Investment) करावी लागते. या सर्व प्रक्रियेत खरी उद्योजकता (True Entrepreneurship) कुठे मारली (killed) गेली? हे बघणे आवश्यक आहे.

🎯 ऊस उत्पादनाचा हिशेब व जाेखीम
एक साखर कारखाना चालवण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 हजार एकरवर ऊस लागवड करावी लागते. ऊस पिकणाऱ्या जमिनीची आजची किंमत सरासरी 10 ते 20 लाख रुपये प्रति एकर आहे. हिशेबासाठी आपण 15,000 एकर x 15,00,000 = 2,250 कोटी रुपये दरवर्षी कायम स्वरुपी गुंतवणूक ऊस उत्पादकाला करावी लागते. एक एकर ऊस जोपासायला खर्च येतो जवळपास 1 लाख रुपये प्रति एकर. त्याचा हिशेब होतो 1 लाख x 15,000 एकर = 150 कोटी रुपये. याचा सरळ हिशेब असा की, एक कारखाना चालवण्यासाठी 15 हजार एकरात शेतकरी 2,250 कोटी जमिनीच्या स्वरुपात गुंतवतात. शिवाय, ऊस उत्पादन करण्यासाठी 150 कोटी रुपये गुंतवतात. एकूण 2,400 कोटी रुपये शेतकरी केवळ ऊस उत्पादन करण्यासाठी आपल्या स्व-जोखमेवर खर्च करतात.

🎯 विश्वस्तांची मूळ मालकांशी गद्दारी
तिकडे कारखाने शेअर्स पोटी रक्कम जमा करतात. शेकडो कोटींची ठेव म्हणून जमा करतात. ही केवळ खुल्या बाजारात शेअर्स विक्री करून नोकरदार, व्यापारी किंवा इतर व्यवसायिकांकडून घेतलेले नाहीत, तर ते शेअर्सही ऊस उत्पादकांकडूनच घेतलेले असतात. साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा असूनही हे भान कारखानदार शेतकऱ्याला येऊ देत नाहीत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि मजबुरीचा गैरफायदा विश्वस्त मंडळाने आजपर्यंत घेतला आहे. आम्हीच खरे मालक म्हणून ‘मूळ शेअर होल्डर्स’ मालकाला डच्चू देण्याचे पाप तथाकथीत नकली कारखानदारांनी केले आहे. त्यांनी सरकार सोबत हातमिळवणी करून मालकांशी गद्दारी केली आहे. खरे तर विश्वस्तांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करायला हवे होते. ते ही मंडळी करेनासे झाली आहेत, म्हणून हे ऐतिहासिक भान शेतकरी उद्योजकाला करून देण्यासाठी ही ऊस परिषद बनसारोळा ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे 19 नोव्हेंबर 2023 राेजी आयोजित करण्यात आली होती.

🎯 ऊस उत्पादक व कारखानदार अशी फाळणी
सन 1980 च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, तुमची गरीबी दैवामुळे नाही, धर्मामुळे नाही किंवा नैसर्गिक कोप होतो म्हणून नाही तर सरकारचे धोरण शेती व्यवसायाच्या विरोधात आहे म्हणून तुम्ही गरीब आहात, याचे भान शरद जोशी यांनी दिले. चार दशकांनंतर ही परिषद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हीच खरे या कारखानदारीचे मालक आहात, तुम्हीच खरे उद्योजकही आहात हे भान देत आहे. येथेच शेतकरी आंदोलनाच्या विचाराला नवी वाट मिळण्याची सुरुवात होईल, असे मला वाटते. ऊस उत्पादक वेगळा आणि ऊस कारखानदार वेगळा ही फाळणी केली आणि येथेच खऱ्या उद्योजकतेचा घात झाला. शेतकऱ्यांसाठी वेगळे कायदे आणि उद्योजकासाठी वेगळे कायदे करून खोट्या उद्योजकांशी हातमिळवणी करून शेती व्यवसाय लुटण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्याला किंवा ऊस शेतकऱ्यांना केवळ कष्ट करून ऊस उत्पादन करणारे साधन समजण्यात आले. तर कारखाना चालवणाऱ्या विश्वस्त मंडळालाच खरे उद्योजक समजण्यात आले. याचा दुष्परिणाम असा झाला की, ऊस व्यवसायिक सतत नाडला गेला. ऊस उत्पादक आणि कारखाना यात परस्पर पुरकतेऐवजी मुजोरी, लबाडी, लाचारी आणि मुर्खपणा इत्यादी दुरीतांच्या गुणधर्मांचा जन्म झाला. विपरित आणि विकृत उद्योजकतेचा जन्म झाला. परस्परपूरकता निर्माण होण्याऐवजी बांडगुळ विरुद्ध सृजक असा संघर्ष निर्माण होवून खरी उद्योजकता आणि खरा उद्योजक मारला गेला. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की, शेतकरी हे केवळ राबणारे जनावर नसून, खरे उद्योजक आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना तुम्हीच उद्योजक आहात, हे औद्योगिक भान देणे आगत्याचे झाले आहे. त्या दिशेने अर्थकारणाची, तंत्रज्ञाची आणि राजकारणाची दिशा बदलणे आवश्यक झाले आहे.

🎯 शेतकरी दोन्ही बाजूने पराभूत
जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊन जवळपास 86 टक्के शेतकरी आल्पभूधारक झाले आहेत. त्यांना औद्योगिकीकरणात सामील करून घेणे, ही काळाची आणि निकडीची गरज निर्माण झाली आहे. शेतीचे इतके लहान तुकडे झाले आहेत की, त्याला कितीही भाव मिळाले तर शेतकरी सन्मानाने जगू शकत नाही. यापुढे शेती कोणी करेल की नाही, अशी समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी हा या देशाच्या अर्थकारणात प्रामुख्याने दोन भूमिका घेत असतो. तो एका बाजूला उत्पादन करत असतो तर दुसऱ्या बाजूला ग्राहक असतो. तो या व्यवस्थेत उत्पादक म्हणून यशस्वी झाला आहे. धान्याचे प्रचंड ढीग घालून त्याने ते सिद्ध केले आहे. पण तिथेही बाजारपेठेत त्याला पराभूत करण्यात येते आहे तर ग्राहक म्हणून इतर ग्राहकांसारखा तोही सपशेल पराभूत होत असतो. सरकार प्रायोजित भांडवलशाही राज्यव्यवस्थेने त्याला दोन्ही बाजूने पराभूत केले आहे. मग ती भांडवलशाही राज्यव्यवस्था लोकशाहीवादी आसो, समाजसत्तावादी वा फुकटकल्याणकारी असो की हुकुमशाहीवादी आसो.

🎯 नफ्याचा वाटेकरी शेतकरी असावा
या तिन्ही प्रकारच्या राज्यव्यवस्थेने शेतकऱ्यांची आणि श्रमिकांची उत्पादक म्हणून असलेली उद्योजकता व ग्राहक म्हणून असलेली क्षमताही हिराऊन घेतली आहे. तेव्हा ती उद्योजकता शेतकऱ्यांना आणि श्रमिकांना परत मिळवून किंवा प्राप्त करून द्यावयाची असेल तर शेती उत्पादनावर जी प्रक्रिया केली जाते व ज्यामुळे व्हॅल्यू अ‍ॅडिशन होऊन त्या प्रक्रिया उद्योगाला नफा मिळतो, त्या नफ्याचा वाटेकरी शेतकरी झाला पाहिजे. खऱ्याखुऱ्या उद्योजकतेचा उदय व्हावा, असे वाटत असेल तर उद्योगाच्या नफा व तोट्यात शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. तरच शेतकरी उद्योजक म्हणून पुढे येईल. मात्र, त्यासाठी त्याला प्रस्थापित कारखानदारीत व नव्याने उभ्या राहणाऱ्या शेतूपुरक उद्योगात किंवा अॅग्रोप्रोड्युसर्स कंपन्यात त्याच्या जमीन या भांडवलासह सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ज्याचे जेवढे योगदान तेवढे त्याला योगदानमूल्य मिळवून देणारा नव्या उद्योगाचा पाया घातला तर त्या उद्योजकतेच्या नव्या युगाचा शेतकरी हा खरा खुरा उद्योजक असेल, नव्या युगाचा नायक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!