Cold & cloudy weather : ख्रिसमसला थंडी तर नववर्षाला ढगाळ वातावरणाची सलामी
1 min readशुक्रवार (दि. 22 डिसेंबर 2023)पासून मध्य महाराष्ट्र, गुजरात व मुंबई येथील पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, गुजरात व मुंबईतील सरासरीच्या खाली गेलेले दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत पोहोचले आहे. म्हणजे कमाल तापमान आता वाढले आहे. त्यातच मध्य महाराष्ट्र, गुजरात व मुंबईत दाेन दिवस ढगाळ वातावरणासह (Cloudy weather) तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली हाेती. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअसच्या तर मुंबईसह कोकणातील तापमान 17 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असू शकते.
सकाळच्या वेळी ईशान्य मान्सून कालावधीत दक्षिणेतील राज्यांकडून लोटलेली आर्द्रता, दैनिक उच्चतम पातळीतील आर्द्रतेत मिसळून अधिकच होते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या वेळी कमी उंचीवरच ढगांचे मळभ तयार होतात. जसजशी सूर्यकिरणे हावी होतात, तेव्हा ढगाळता निवळून पुन्हा सर्वत्र निरभ्रता येते. अर्थात कधी कधी तर निरभ्रततेसाठी दिवसाचा अधिक कालावधीही वापरला जातो किंवा दिवसही जातो. दैनिक आर्द्रतेच्या न्यूनतम पातळीनंतर म्हणजे सायंकाळी 4 वाजतानंतर निरभ्रता येते.
शुक्रवारी (दि. 29 डिसेंबर 2023) उत्तर भारतातून येणाऱ्या पश्चिमी झंजावातातून जमिनीपासून उंच्च पातळीवर थंडी व दक्षिण भारतातून महाराष्ट्रपर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलाफातून फक्त मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक नगर ते सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात तसेच धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यात 31 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या तीन दिवसादरम्यानच्या नववर्षात ढगाळ वातावरण जाणवेल. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून ऊबदारपणा जाणवेल.
मध्य महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता फारच कमी असून, झालाच तर मध्य प्रदेशलगतच्या खानदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल व रावेर तालुक्याच्या तुरळक भागात 31 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 दरम्यानच्या तीन दिवसात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.