Edible oil : गोष्ट गोडेतेलाची : जिभेचे चोचले…!
1 min readआता जे तेल खाण्याच्या हॉटेल्समध्ये वापरले जाते ते सकाळी एकदा तळण – घाणा सुरू झाला की सायंकाळपर्यंत कळकट होईपर्यंत सतत उकळत असते. या वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या वापरामुळे रक्तदाब (Blood Pressure) वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. मोठ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व कमजोर होतात. आतड्याचे नुकसान हाेऊन त्यात बिघाड निर्माण हाेताे, ग्लुकोजचे कमी शोषण, मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे असे अनेक अपाय संभवतात.
न तापवलेल्या किंवा एकदाच गरम केलेल्या तेलाच्या तुलनेत वारंवार गरम केल्या जाणार्या स्वयंपाकाच्या तेलाचे पेरोक्साइड मूल्य (peroxide value) जास्त असते. माणसामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरला (Colorectal cancer) कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांपैकी पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs – Polycyclic aromatic hydrocarbons) उच्च तापमानात तयार होतात. म्हणून एकच तेल परत परत वापरणे म्हणजे विष तयार करणे होय. नेहमीच्या खाण्यातील भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, अंडी आणि मांस यांसारखे पदार्थ तळताना सतत वापरलेल्या तेलामुळे हानिकारक संयुगे तयार होऊन विषारी परिणाम देतात.
एखाद्यावेळी खाल्लं तर त्याला काय होतंय, म्हणता म्हणता फास्ट फूड आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून बसलाय. फक्त शहरी तरुण पिढी बर्गर व पिझ्झाकडे वळली आहे. एवढंच काय तो बदल, परंतु ते ही घातकच. मित्रहो तशीही चव ही जिभेच्या फक्त दोन इंच भागावरच आहे. परंतु त्याचे बरे वाईट परिणाम संपूर्ण शरीराला भोगावे लागतात. ‘जिभेचे चोचले, बुडाला टोचले’ असं नको व्हायला.
तेव्हा शक्यतो या गोष्टी टाळूया. मग आता सिरिअसली तेलाचा घाणा शोधाच. रिफाईंड असो वा वापरलेले असुदे अशा तेलाला रामराम कराच.
🟢 शेवटी हक्क तुमचा आणि निर्णयही तुमचाच…!