Honesty Box : Milk, Agricultural goods in Australia : प्रामाणिकतेची पेटी : ऑस्ट्रेलियातील दूध, शेतमाल विक्री
1 min read🐄 प्रामाणिकता महत्त्वाची
प्रामाणिकतेची पेटी म्हणजे ‘ओनेस्टी बॉक्स’! किती समर्पक संकल्पना प्रात्यक्षिक सुद्धा. प्रगल्भ, शिक्षित, नीतीवंत समाजाचे प्रतीक म्हणजे प्रामाणिकतेची पेटी. शेतकरी बाजार, रायतू बाजार, आठवडी बाजार, शेतकरी कट्टा, दैनंदिन विक्री केंद्र यातून हजारो मनुष्यबळ आपल्या देशात वेळ, श्रम, खर्च करत असताना प्रामाणिकतेची पेटी किती उपयुक्त ठरू शकते, याचा विचार करायला हवा. आपल्या देशात किमान शहरात आणि जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत मॉल संस्कृती विस्तारली आहे. मात्र, इथेही सीसीटीव्ही कॅमेरा असल्याशिवाय आणि नियंत्रित केल्याशिवाय विक्री होत नाही. संस्कार, नैतिकता, शिक्षण याही पुढे प्रामाणिकता रुजवली जाणे आणि अंगीकारणे महत्त्वाचे ठरते.
🐄 दूध उत्पादकांची लूट
विषय आहे दूध दराचा आणि राज्यातील नियमित दूध आंदोलनाचा. दूध उत्पादन आणि विक्री यातून शासनाने संपूर्ण माघार घेतली असून, आता सर्व क्षेत्र सहकारी समजल्या जाणाऱ्या खाजगी संस्थांकडे सुपूर्द झाले आहे. जगात प्रत्येक देशात दुग्ध समृद्धी सहकारातून निर्माण झाली. आजही अनेक राज्यात दूध उत्पादनाचा विकास केवळ शेतकऱ्यांच्या परस्पर सहकार्यातून पुढे जात आहे. आपल्या राज्यात मात्र 50 वर्षात दूधकारणास नेहमी भ्रष्टाचाराची, भेसळीची, फसवणुकीची आणि शून्य प्रामाणिकतेची साथ लाभली आहे. तालुका आणि जिल्हा दूध संघानी भरपूर लूट करत कोट्यवधी दूध उत्पादकांना तोट्यासह आत्महत्येच्या खाईत लोटले आहे.
🐄 दूध उत्पादकांची धरसाेड वृत्ती
दूध धंद्यात शेण तेवढं उरतं, हा नेहमीचा सारांश सर्वसामान्य उत्पादकाच्या तोंडी आहे. मात्र, जनावरांच्या शेणातही लक्ष्मीदर्शन मिळवणारे यशस्वी उत्पादक आहेत. दूध दर परवडत नाही, दुधाला भाव नाही, दूध प्रत सांभाळता येत नाही, अशी ओरड कधीही थांबलेली नाही. मुळात शास्त्रोक्त दूध उत्पादन समजावून घेण्याची क्षमता उत्पादकात नाही. अन्यथा सरासरीने 50 लिटर दूध देणाऱ्या गाई उत्पादकाला निर्माण करता आल्या असत्या. धरसोड केला जाणारा दूध व्यवसाय नेहमी दिसून येतो आणि थोड्या काळासाठी प्रतिकूलता दिसली की, गोठा बंद करण्याचा मार्ग सहज स्वीकारला जातो. प्रत्येक जनावराचा उत्पादक हिशोब मांडला जाण्यासाठी क्षमता असणारा शेतकरी दूध व्यवसायात अपेक्षित आहे.
🐄 सकारात्मकतेचा अभाव
महागाई सतत वाढत जाणारी आहे, तिला थांबवता येणं कुणाच्याही हाती नाही, हे माहीत असताना पशुधनाची उत्पादकता वाढवावी व्हावी लागेल, हा विचारच रुजला नाही. आजही प्रत्यक्षात 50 लिटर उत्पादकतेच्या गाई गोठ्यात असणारे शेतकरी एकाही दूध आंदोलनात उतरत नाहीत हे वास्तव आहे. भविष्यात पुन्हा महागाई वाढणार, तेव्हा मी माझ्या गोठ्याची सरासरी उत्पादकता नियमितपणे वाढविणार हा विचार गंभीरपणे करावा लागेल. मुळात जनावरे दूध देतात हा विचार असला की गोठा तोट्यात जातो, मी दूध मिळवतो ही सकारात्मकता केवळ क्षमता, अभ्यास आणि प्रयत्नातून निर्माण होते. दोन-तीन वर्षात काही तरुण गांभीर्याने विचार आणि कृती करत आहेत ही समाधानाची बाब आहे.
🐄 दूध उत्पादकांची पराभूत मनसिकता
शासन पातळीवर लोकआग्रहास्तव कितीही शासन निर्णय झाले आणि कोणताही भाव निर्धारित झाला तरी दूध संकलन यंत्रणेचा भस्मासूर नवनवीन पळवाटा शोधत उत्पादकांना नेहमी रडवत राहणार, हे निश्चित. खरे तर सहकारी होते दूध संघ, मात्र तिथे सदस्य दूध उत्पादक पराभूत मनसिकतेचे होते. आजही दूध संस्थांच्या कारभारात प्रामाणिकता आणि सचोटी नियंत्रित करणारे दूध उत्पादक पुढे येत नाही हेच दुर्दैव. दूध दर आंदोलनाला संघटित शक्ती निर्माण होते. मात्र, दैनंदिन दूध प्रक्रिया, दूध खरेदी, दूध विक्री याबाबत आपल्याच दूध संघात उत्पादक नांगी टाकतात. गोठ्यातून दूध विक्रीची निश्चिंतता मिळवण्यासाठी, दूध संघाच्या कार्यावर यशस्वी अंकुश ठेवण्याची आपली जबाबदारी आहे, ही बाब विसरता कामा नये.
🐄 भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलनाची गरज
जगात यांत्रिकीकरण आणि खर्चात बचत सुरू असताना दूध संघात यंत्रणेवर, जाहिरातीवर, गळतीवर मोठा खर्च दिसून येतो. आपल्याच दूध संघाचे दूध पदार्थ आणि दूध विक्री याबाबत जाहिरात करण्यास उत्पादकाचे तोंड उघडत नाही, हे वास्तव संपणे गरजेचे आहे. दूध वाहतूक खर्च कमीत कमी होण्यासाठी आपल्या विभागात दूध वापर वाढणारे प्रयत्न उत्पादकांनी केले पाहिजे. दूध भेसळीच्या आणि दुधातील भ्रष्टाचाराच्या कार्यवाहीत सहभाग वाढवायला पाहिजे, तरच दूध संघाकडून योग्य भाव मिळू शकेल. राज्यात आदर्श डोळ्यासमोर असणारे नामांकित दूध संघ असताना भ्रष्ट संस्थांचा उदो उदो करणारी यंत्रणा नामशेष करण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. आमच्या दुधावर पोसले जाणारे बोके नियंत्रित करण्याची जबाबदारी स्वीकारल्याशिवाय दुधाचे दर कधीही परवडणार नाहीत. लोककल्याणकारी योजना लोकसहभागामुळे यशस्वी होतात. तेव्हा शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात करून घेण्याची जबाबदारी उत्पादकांनी समजून घेतली तर हजारो लिटर दूध सांडून शासन निषेध करण्याची गरज पडणार नाही.
🐄 शास्त्राेक्त उपचाराकडे दुर्लक्ष
अगदी उत्पादक गोठ्यांचा विचार केला तरी निम्म्या गायी वर्षाला वासरू या संकल्पनेत येत नाहीत. सतत उलटणाऱ्या जनावरात हजारो रुपयांचा उपचार खर्च करत असताना निरोगी गर्भाशयाचा, सुलभ प्रजननक्रियेचा आणि त्यासाठी अपेक्षित असणाऱ्या निदान सुविधांचा विचार केला जात नाही. अशा खर्चिक बाबींसाठी सर्वोत्तम रोगनिदान आणि उपचार सुविधा मिळवण्यासाठी एकही मागणी दूध उत्पादकांकडून होत नाही. गंभीर बाब अशी की, लाखो रुपयांच्या सोनोग्राफी यंत्राचा वापर आपल्या लाखाच्या गाईत केला जात नाही, याची खंत नसणाऱ्या उत्पादकांना खरंतर दूध दर मागण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कराडच्या प्रदर्शनात 395 किलोची कालवड, 16 महिने वय आणि दोन महिन्याची गाभण दिसताना आपल्या गोठ्याची उद्दिष्टे कधी ठरणार, हा प्रश्न उत्पादकांनी स्वतःला विचारायला पाहिजे.
🐄 अनुकरण कशाचे करावे?
कासदाह आणि गर्भाशय दाह स्वतःच्या कौशल्यातून 90 टक्के कमी करणारा गोठा आपल्या उत्पादक सहकार्याने तयार केला आहे, याचं अनुकरण कधी होणार? सगळ्या पातळीवर गाय विकायची – गाय घ्यायची याची मोठी चर्चा. मात्र, चांगली गाय कशी सांभाळायची, उत्पादक कशी करायची याबद्दल स्वतःचे अनुभव सांगताना किंवा इतरांचे अनुभव मिळवताना किती जण अग्रेसर असतात?. शरीर वजन नोंदीचा टेप आणि वातावरणाचा ताण दाखवणारा तापमापक किती गोठ्यात आहे? उत्पादक गायीचा विचार शून्य आणि दुधासाठी कासेवरची नजर सुटत नाही, अशी रीत दूध उत्पादनात घातक ठरते.
🐄 योग्य व परस्पर समन्वयाची गरज
काय मागायचं? यासाठी चर्चा करायला दूध उत्पादकांची सभा होत नाही. मात्र, दूध दरासाठी होणाऱ्या आंदोलनात दुधाची संबंध नसणारे अग्रेसर असतात. दुधाला दर मिळवू नये, खर्च अधिक असणाऱ्या दुधाची परतावा किंमत मिळू नये, असं कधी वाटणार नाही, असं कधीच घडणार नाही. मात्र, आर्थिक सक्षम करणाऱ्या दूध उत्पादकांच्या खऱ्या समस्या रेटून पुढे नेण्यासाठी योग्य व परस्पर समन्वयाची गरज आहे. एकदा गोठ्यात काळाच्या पुढे उत्पादन देणारी जनावरे निर्माण झाल्यास आणि प्रामाणिकतेची पेटी ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याचा विश्वास मनात असल्यास ‘आपलं दूध, आपला भाव’ सत्यात उतरू शकेल.