krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Alibag Tourism : अलिबाग आणि पर्यटन व्यवसायाचे भविष्य

1 min read
Alibag Tourism : कामानिमित्त अलिबाग(Alibag)मध्ये (जिल्हा रायगड) येऊन आज बरोबर एक महिना झाला. आमच्या संस्थेतर्फे येथील 10 गावांमधे पर्यावरण (Environment), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), जैवविविधता (Biodiversity) अशा विविध पैलूंवर आम्हाला या गावांमधे काम करायचे असल्याने गावात फिरणे सुरू आहे. या महिनाभरात त्या निमित्ताने मला हा परिसर अगदी जवळून पाहता येतो आहे. इथे पर्यटन (Tourism) हा सर्वात मोठा उद्योग आहे. ज्यावर इथले 75 ते 80 टक्के स्थानिक निर्भर आहे. जवळपास 90 टक्के घरांमध्ये हा व्यवसाय चालतो. शिवाय याच उद्योगामुळे येथील मासेमार समाजाचे देखील भरण पोषण होते आहे. कारण पकडून आणलेले मासे विकायला फार लांब जावे लागत नाही.

येथील खाड्या बहुतांशी रासायनिक सांडपाणी विरहित जरी दिसत असल्या तरी शहरात मात्र बहुतांशी सांडपाणी आणि घरघुती कचरा खारफुटीमध्येच टाकला जातोय. येथे कोणत्याही इतर वनस्पतीपेक्षा खारफुटी सर्वात जास्त प्रमाणात आढळते. किंबहुना; संपूर्ण अलिबागच पाणथळ जमिनी आणि खारफुटी यांनी वेढलेले आहे. येथे माणसाला राहण्यायोग्य आणि शेती करण्यायोग्य अशा थोड्याच जमिनी आहेत. बहुतांशी जमिनी या सखल असल्याने खाडी समुद्राचे पाणी परिसरात दूरवर पसरते. ज्यामुळे येथील बहुतांशी भूजल खारे आणि फार थोडे भूजल पिण्यायोग्य आहे. पर्यटन व्यवसायामुळे या भूजल साठ्यांवर आधीच खूप मोठा ताण असून, ते वेगवान गतीने उपसले जाते आहे. भूजल उपसण्याचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच ते कमी झाल्याने या रिकाम्या झालेल्या भूजलाची जागा समुद्राचे खारे पाणी घेईल, असे मला वाटते. यासाठी यावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

अनियंत्रित पर्यटनाच्यामुळे शनिवार व रविवार दरम्यान येथील हवेत खूप मोठ्या येथील हवेची गुणवत्ता ढासळते. शिवाय दूरवर उभ्या असलेल्या एका प्रकल्पातून उडालेली राख संध्याकाळी वारे समुद्राकडे वाहायला लागल्यावर संपूर्ण परिसरात पसरते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी फेरफटका मारताना समुद्राच्या अगदी जवळ असून देखील घसा कोरडा पडतो. या राखेत मोठ्या प्रमाणात जड धातू असल्याने परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले असावे असा अंदाज आहे. ज्यासाठी नगरपालिका, गावे इत्यादी स्तरावर कॅन्सर पेशंट किती आहेत, याचा अंदाज घेऊन योग्य ती पाऊले उचलता येतील. सध्या तरी ही राख येथील परिसरातील नारळी पोफळीच्या पानावर सहज पाहता येते. या राखेमुळे केवळ माणसांनाच त्रास होतोय असं नाही, पण राख नारळीच्या फुलांतील चिकट स्त्री केसरावर चिकटल्याने स्त्री केसर कोरडा पडतो. ज्यामुळे परागीभवन प्रक्रियेत अडथळा येत असून, नारळाच्या उत्पादनात देखील घट होते.

लवकरच विरार – अलिबाग कॉरिडॉर सुरू होणार आहे. ज्यामुळे या समस्या अधिक वाढण्याचा संभव आहे. उद्या हा कॉरिडॉर सुरू झाल्यास मुंबईहून अगदी सहज अलिबागमध्ये येता येईल, ज्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ आजच्यापेक्षा पाच पटीने वाढेल. तसे झाले तर अलिबाग मधला सर्वात पहिले नैसर्गिक स्त्रोत असलेले भूजल झपाट्याने संपून जाईल. शिवाय मोठ्या प्रमाणात परिसरात असलेल्या शेती, वाड्यांमध्ये मोठं मोठ्या बांधकाम प्रकल्पांना उधाण येईल. ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनीवर सिमेंट ओतले जाईल. ज्यामुळे आधीच कमी असलेल्या भूजलाचे पुनर्भरण होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर थांबून जाईल. शिवाय येथील खारफुटीवर अतिक्रमण वाढेल, ज्यामुळे परीसरात अतिवृष्टी, मोठ्या भरतीचे पाणी समुद्रात वाहून जाण्याची प्रक्रिया थांबल्याने पुराच्या समस्या वाढणार आहेत.

पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर मुंबईतून दररोज पर्यटक आल्याने आणि परिसर मुंबईच्या अगदी जवळ असल्याने इथे लोकवस्ती वाढेल. ज्यामुळे मानवी मैला, घनकचरा येथील खड्यांमधे फेकल्या जाईल. परिणामी इंचा इंचावर जीवनाने भरलेली खारफुटी फक्त झाडांचा समूह मात्र राहणार आहे. ज्यामुळे येथे सापडत असलेले खेकडे, निवट्या, कालवे इतर सर्व सजीव नष्ट होऊन अलिबागची तीवर बाग मृत होईल. या मृत तीवर बागेतून मोठ्या प्रमाणात मानवी मैलावानी इतर घनकचरा गेल्याने परिसरात त्याची दुर्गंधी वाढेल. शिवाय इथून पुढे हा मैला समुद्रात गेल्याने तेथील मासेमारी देखील संपुष्टात येइल. ज्यामुळे अलिबागचे पर्यटन त्यावर अवलंबून असलेले रोजगार फार काळ टिकणार नाहीत, अशी भीती आहे.

पुढील भागात येथील अनियंत्रित पर्यटनामुळे जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामावर लिहायचं आहे. तूर्तास रजा घेतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!